Friday, January 17, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यातील मतदारसंघात व्हिव्हीपॅट स्लीप मोजणीत तफावत नाहीच

राज्यातील मतदारसंघात व्हिव्हीपॅट स्लीप मोजणीत तफावत नाहीच

निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी

मुंबई – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदानकेंद्रांच्या क्रमांकामधून लॉटरी पध्दतीने निवडलेल्या 5 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिन्सच्या स्लीप्सची मोजणी बंधनकारक आहे. या प्रक्रियेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ईव्हीएममधील प्रत्येक उमेदवाराच्या मतसंख्येशी व्हीव्हीपॅट स्लीप्सची संख्या पडताळणे हा ह्या प्रक्रियेचा उद्देश आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणीच्या वेळेस सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकूण 1,440 व्हीव्हीपॅट मधल्या स्लीप्सची अनिवार्य मोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 5 मतदान केंद्रांच्या क्रमांकाची सरमिसळ करून भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या समोर आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रे निवडण्यात आली. या प्रक्रियेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील 5 मतदान केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही, असे अहवाल महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे 36 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत.

ही प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच पार पडलेली असल्याने, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दस्तऐवजांवरही या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. व्हीव्हीपॅट स्लीप्सच्या मोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी, प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष सुरक्षेची काळजी घेऊन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला होता, आणि या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटिव्ही कव्हरेज तसेच चित्रिकरण करण्यात येऊन ते जतन केले गेले आहे.
मतमोजणीच्या संदर्भातील भारत निवडणूक आयोगाच्या विहित प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदारसंघाच्या 5 मतदान केंद्रांसाठीची व्हीव्हीपॅट स्लीपची गणना अनिवार्य असून, ती पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तसेच विजयी उमेदवार जाहीर करता येत नाही. राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -