रत्नागिरी : राजापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी समर्थनगर भटाळी रस्त्यावर राजापूर नगर वाचनालयासमोर रात्री, बाजारपेठ रस्त्यावर सकाळी बिबट्याचा स्वैर वावर नागरिकांना दिसून आल्याने घबराट पसरली आहे.
याच भागात काही महिन्यांपूर्वी एका महिला महसूल अधिकाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळी येथे बिबट्या नाहीच, असे ठासून सांगण्यात वन विभागाचे अधिकारी आघाडीवर होते. आता बिबट्याचा वावर लोकवस्तीत झाल्याने तेथील नागरिकांना अस्वस्थता आणि भीती पसरली आहे. या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने त्याबाबत ॲड. पराग हर्डीकर यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. ॲड. अभिजित ढवळे यांनी आपल्या अंगणात बिबट्याचे ठसे आढळून येत असल्याची माहिती दिली. ॲड. ढवळे यांच्याकडे असलेल्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी बिबट्याचा वावर असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
शहराच्या विविध भागात बिबट्याच्या वावराबाबत प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी वन विओभागाला कळवले असले, तरी मानवी वन विभागाकडून हालचाल झालेली नाही. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाला आर्थिक मदत देण्याबाबत शासन घोषणा करते. मात्र, नागरी वस्तीतील बिबट्याच्या वावराबद्दल सातत्यपूर्ण उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे आपला जीव वाचवण्याची जबाबदारी आपली, अशी आफत जनतेवर ओढवली आहे.