Saturday, January 18, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखअस्सल मालवणी हॉटेल ‘चैतन्य’ संचालक - सुरेखा वाळके

अस्सल मालवणी हॉटेल ‘चैतन्य’ संचालक – सुरेखा वाळके

शिबानी जोशी

कोकणातल्या मालवणसारख्या ग्रामीण भागात राहणारी एक महिला मुंबईत येऊन हॉटेलसारख्या ग्लॅमरस धंद्यात आपले पाय रोवते ही कोकणवासीयांसाठी खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. सुरुवातीला घरगुती स्वरूपात आणि नंतर हॉटेल चैतन्य सुरू केलं. आज दादर भागात खरेदीसाठी येणारा मराठी माणूस चैतन्यमध्ये खाल्याशिवाय जात नाही. कोणताही उद्योग यशस्वी करण्यासाठी उद्योजकाच्या डोक्यावर बर्फ, तोंडावर साखर हवी असं म्हटलं जात. या म्हणीवर चैतन्यच्या संचालिका सुरेखाताई पुरेपूर उतरतात. आज त्यांची मुंबईमध्ये तीन रेस्टॉरंटची चेन तयार झाली आहे. हॉटेल चैतन्य, कोहिनूर स्क्वेअर येथे कोस्ट अँड ब्लूम आणि अंधेरी जुहू इथे हॉटेल चैतन्य तसेच मालवणचं हॉटेल चैतन्य अशा चार हॉटेलमध्ये हजारो ग्राहक जेऊन तृप्तीचा ढेकर देऊन गेले आहेत. त्यांचा १४ वर्षांचा हा यशस्वी प्रवास…

माझी आजी, आई  घरात एखाद्या मुलीचं लग्न ठरलं तर तिला पहिला सल्ला असा  द्यायच्या की सासरच्यांना खूश ठेवायचं असेल तर  तो मार्ग मुखातून पोटात जातो. त्यामुळे या सर्वांना चविष्ट खाऊ घाल, तू  अर्धी लढाई जिंकशील. ज्या स्त्रियांच्या हाताला चव असते त्या घरच्यांना आणि बाहेरच्यांनाही चविष्ट पदार्थ खायला घालतात आणि  त्यांचा दुवा त्यांना आपसूकच मिळतो असं त्या सांगायच्या. अशाच हाताला चव असणाऱ्या सुरेखा वाळके यांचा मालवणमधील एक गृहिणी ते शिवाजी पार्क, दादर, अंधेरी सारख्या ठिकाणी अस्सल मालवणी जेवणाची रेस्टॉरंटची चेन तयार करण्यापर्यंतचा प्रवास खुमासदार आहे. मालवणमध्ये राहात असताना त्यांनी घरगुती स्वरूपात मालवणी पदार्थ तसंच माशाचे पदार्थ हाताने बनवून त्याची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली होती. त्या प्रत्येक पदार्थाचा मसाला स्वतः घरी बनवत असत.

कोकणातलं पाणी, चूल, भांडी आणि त्यांच्या हाताला असलेली चव यामुळे त्यांचे पदार्थ लोकप्रिय होऊ लागले आणि त्यांनी मालवणमध्ये हॉटेल चैतन्य सुरू केले. मालवणला येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणावर  हॉटेलमध्ये गर्दी करू लागले. त्याची लोकप्रियता वाढू लागली तरीही मुंबईत येऊन आपण उद्योजिका होऊ असं त्यांना कधी वाटलं नव्हतं; परंतु घरच्या काही परिस्थितीमुळे त्या उद्योग व्यवसायाकडे वळल्या आणि २०१० साली त्यांनी दादर येथे सुरुवातीला घरगुती स्वरूपात आणि नंतर हॉटेल चैतन्य सुरू केलं. आज दादर भागात खरेदीसाठी येणारा मराठी माणूस  चैतन्यमध्ये खाल्याशिवाय जात नाही. १९९० सालापासून ३३ वर्षे त्या रेस्टॉरंटच्या व्यवसायात आहेत. चैतन्य हॉटेलमध्ये आज अर्धा अर्धा तास वेटिंग असत, शनिवार, रविवार तर रांगा लागतात. कारण अस्सल मालवणी या ठिकाणी खायला मिळतं. दर्जा राखण्यासाठी  सुरेखा ताईंनी कोणतीही तडजोड कधीही केली नाही आणि आजही त्या करत नाहीत. सुरुवातीला मालवणच्या पदार्थांची चव येण्यासाठी त्यांनी मालवणहून पाणी देखील आणलं होतं. त्या मालवणमधूनच मासे, नारळ बारा महिने वापरतात. मालवणी जेवण म्हटलं की, सोलकढी ही लागतेच. सुरेखा ताई सांगतात की, आज मुंबईत अनेक मालवणी रेस्टॉरंट झाली आहेत; परंतु ९९% रेस्टॉरंटमध्ये कोकमचं आगळं वापरलं जातं. आम्ही मात्र खास मालवणमध्येच तयार केलेली आमसूल आणून सोलकढी करतो. त्यांच्या हॉटेलमध्ये सोलकढी एकदा प्यायलेला माणूस त्याची चव कधीच विसरू शकत नाहीत.

कोणताही उद्योग यशस्वी करण्यासाठी  उद्योजकाच्या डोक्यावर बर्फ, तोंडावर साखर हवी असं म्हटलं जातं, या म्हणीबर सुरेखाताई पुरेपूर उतरतात. व्यवसायात आपल्याबरोबरचे सहकारी, कर्मचारी यांचा देखील खूप मोठा वाटा असतो आणि म्हणूनच उद्योग जेव्हा यशस्वी होतो तेव्हा केवळ उद्योजकच यशस्वी  होत नाही, तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना देखील यशाकडे नेलं तर कर्मचारी देखील मनापासून काम करतात आणि तेच उद्योगाला पुढेही घेऊन जातात. त्यामुळे सुरेखा ताईंकडे सर्व कर्मचारी अतिशय समाधानाने आणि आनंदाने काम करताना आपल्याला दिसतात. सुरेखा ताईंचे असे म्हणणे आहे की, पदार्थ करत असताना देखील तो करणाऱ्याची भावना शुद्ध आणि आनंदी असावी त्यामुळे हॉटेलच्या किचनमध्ये कोणीही भांडायचं नाही असा एक नियम त्यांनी केला आहे.  आज त्यांची मुंबईमध्ये तीन रेस्टॉरंटची चेन तयार झाली आहे. हॉटेल चैतन्य, कोहिनूर स्क्वेअर येथे कोस्ट अँड ब्लूम आणि अंधेरी जुहू इथे हॉटेल चैतन्य तसेच मालवणचं हॉटेल चैतन्य अशा चार हॉटेलमध्ये हजारो ग्राहक जेवून तृप्तीचा ढेकर देऊन गेले आहेत. कामांसाठी एचआर, मार्केटिंग, सोशल मीडिया हे सर्व विभाग हाताळणारे कर्मचारी त्यांच्याकडे आहेत. त्यांचं म्हणणं हेच आहे आपण अस्सल

मालवणी रेस्टॉरंट चालवत आहोत त्यामुळे अस्सल मालवणी जेवणच द्यायचं, त्यात सरमिसळ करायची नाही. ग्राहकांना  युनिक खाद्यपदार्थ द्यायचे तरच ग्राहक पुन्हा नव्याने काहीतरी अनुभवू शकतो असं सुरेखाताई मानतात. सुरेखाताईंनी बोलत असताना सहज एक उदाहरण दिलं, कोथिंबीर वडी हा आपला मराठमोळा पदार्थ सर्वच मराठमोळ्या हॉटेलमध्ये मिळतो; परंतु त्यांनी त्याच पिठाला गुंडाळे करून पास्त्यासारखा आकार देऊन तळला आणि कोथिंबीर रोल या नावाने तो पदार्थ त्यांनी हॉटेलमध्ये ठेवला आणि त्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आज त्यांच्याकडे जवळ जवळ ३०० स्टाफ काम करत आहे. दादरमधील पहिलं हॉटेल चैतन्य सुरू झाल्यापासून लगेचच त्याला उत्तम प्रतिसाद मिळून ते नफ्यामध्ये चालत होतं तरी सुद्धा दुसरं हॉटेल काढण्याची त्यांनी घाई केली नाही कारण घाईघाईने धंदा वाढवण्यापेक्षा  आहे तोच धंदा आधी सेटल करून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला, तर पुढील धंद्यालाही ग्राहक शोधावे लागत नाहीत. नाव शोधत शोधत ग्राहक खायला येतात असं त्या म्हणतात. दादरच्या ‘चैतन्य’ची शाखा अंधेरी जुहू येथे सुरू झाल्याबरोबर त्या ठिकाणीही अस्सल मालवणी पदार्थ जेवायला रांगा लागत आहेत असं त्या अभिमानाने सांगतात. धंद्यात पैसा तर मिळतच असतो पण ग्राहकांचे समाधान, विश्वास आणि दर्जा खूप महत्त्वाचा असतो. तो राखला की, पुढचं काम सोपं असतं असा सल्लाही त्या देतात.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -