केदारनाथचा अविस्मरणीय प्रवास

  98

केदारनाथ मंदिराचेद्वार हे वर्षांतून फक्त ५ ते ६ महिने भक्तांसाठी दर्शनाला उघडण्यात येते. त्यामुळे मी आणि माझ्या हाफकिन महामंडळातील सहकारी मित्रांनी सहा महिने अगोदरच नियोजन करून केदारनाथचे दर्शन घ्यायचे ठरविले. कामगार प्रशिक्षण वर्गामुळे मी फक्त २२००० रूपये प्रति व्यक्ती या खर्चत १३ दिवसांची केदारनाथ, ऋषीकेश, हरिद्वार, बद्रिनाथ, मसूरी, धानोटी, कौसानी, अल्मेडा, राणीखेत, नैनिताल येथे दिनांक १४.१०.२०२४ मध्ये सहल आयोजित केली होती. आम्हाला विमान, बोट, ट्रेन, रोपवे अश्या अनेक वाहतुकीने प्रवास केल्याचा अनुभव आहे; परंतु हेलिकॉप्टरने प्रवास कधी केला नव्हता. म्हणून आम्ही केदारनाथ जवळील फाटा येतील थम्बी या हेलिपॅडची निवड केली. गौरीकुंड ते केदारनाथ मंदिर हे अंतर चालत जाण्यास १० ते १२ तास लागतात. प्रवास देखील अत्यंत खडतर आहे. हेलिकॉप्टरला केवळ ७ मिनिटे लागतात.


त्यामुळे आम्ही फाटा येथील थम्बी हेलिपॅड ते केदारनाथ मंदिर हा प्रवास हेलिकॉप्टरने करायचे ठरविले. ४ महिने अगोदरच ऑनलाइन पद्धतीने आम्ही हेलिकॉप्टर बुक केले. त्यामुळे आम्हाला फक्त प्रति व्यक्ती ६१२८ रूपये एवढाच खर्च आला. सकाळी ८ वाजता यंम्बीला गेल्यावर आम्हाला कळले की, अनेक पर्यटकांनी ऑफ लाईनने ५०००० रुपये देऊन देखील हेलिकॉप्टर बुकिंग मिळत नव्हते. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यावर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. खाली बर्फाचे उंच डोंगर दिसत होते. त्यावर पडलेल्या सकाळच्या सूर्यकिरणांनी ते डॉगर सोन्याचे वाटत होते. सात मिनिटांच्या हेलिकॉप्टर प्रवासात आम्हाला पृथ्वीवरील स्वर्ग पाहता आला. कॅमऱ्यामध्ये फोटो काढण्यापेक्षा आम्ही सर्व निसर्ग सौंदर्य आमच्या डोळ्यांत साठवून ठेवले. सकाळी ८:०७ वाजता आम्ही केदारनाथ येथील हॅलिपॅडला पोहोचलो. पुढे १ किलो मीटर अंतर पायी चालल्यावर केदारनाथ मंदिरात पोहोचलो. ३ तास रांगेत उभे राहिल्यावर केदारनाथ शिवलिंगाचे दर्शन झाले आणि साक्षात भगवान भोलेनाथ यांना भेटल्याचा अनुभव आला. केदारनाथचे शिवलिंग हे इतर शिवलिंगाप्रमाणे नसून ते बैलाच्या पाठीच्या आकृतीचे असलेले स्वयंभू पिंड आहे.


वर्ष २०१३ साली केदारनाथ येथे अतिवृष्टी झाली होती व महापूर आला होता, या महापुरात मंदिर देखील वाहून जातेय का? अशी एकवेळ आली होती; पण त्याच वेळी मंदिराच्या पाठीमागील उंच डोंगरातून एक मोठा उंच दगड पाण्याबरोबर वाहत आला आणि मंदिराच्या मागील बाजूस ५ फुटावर थांबला, विशेष म्हणजे त्या दगडाची लांबी मंदिराच्या लांबी एवढीच आहे. त्या मोठ्या दगडामुळे मंदिरावर आलेला पाण्याचा प्रवाह दोन भागांत विभागला गेला. त्या महापुरात मंदिर सुरक्षित राहिले. त्यावेळी मंदिरात जवळपास ५०० लोक अडकले होते. या लोकांचे जीव आणि मंदिराचे रक्षण या दगडाने केले. या दगडाला लोक "भीमशिला" म्हणू लागले आणि त्याची पुजा करू लागले. या भीमशिलेला जेव्हा मी स्पर्श केला तेव्हा अंगावर शहारे आले आणि मनामध्ये भगवान भोलेनाथांचा ‘ओम नमः शिवाय’ मंत्र गुंजायला लागला. केदारनाथचे दर्शन अविस्मरणीय होते. केदारनाथला थोड्या-थोड्या वेळात निसर्ग आपले रूप बदलतो. लगेच वातावरण खराब झाल्यामुळे हेलिकॉप्टर सेवा बंद झाली. त्यामुळे आम्ही सर्वांनी परतीचा प्रवास पायी करण्याचे ठरविले. परतीचा प्रवास फार खडतर होता धुके, रस्तालगत खोल दरी, चिखल, दगडी रस्ते, प्रचंड गारठवणारी थंडी आणि पाऊस यामधून चालत जायचे होते. परंतु भोलेनाथाचे नाव घेत आम्ही परतीचा प्रवास १० तासांत पार केला आणि सुखरुप गौरीकुंड या ठिकाणी आलो. तोपर्यंत रात्रीचे १२ वाजले होते.


भगवान केदारनाथांचे दर्शन घेतल्याने आमच्या शरीरात एक ऊर्जा संचारली होती. त्या उर्जेमुळेच आम्ही परतीचा खडतर प्रवास सुखरूप पार पाडू शकलो. केदारनाथ यात्रेचा प्रवास अविस्मरणीय व संस्मरणीय होता. आजही डोळे बंद केल्यावर भव्यदिव्य केदारनाथ मंदिर आणि महाकाय भिमशिला डोळ्यांसमोर येते.


-दिनेश नामदेव जगताप, हाफकिन संस्था वसाहत, परळ, मुंबई

Comments
Add Comment

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने