Friday, January 17, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यातील वाघांची संख्या वाढतेय

राज्यातील वाघांची संख्या वाढतेय

अमरावती: महाराष्ट्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार 2022 च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात जवळपास ४४६ वाघ आहेत. २००६ मध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या ही १०३ इतकी होती. २०१० च्या व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्रात वाघांची संख्या ही १६८ वर पोहोचली. २०१४ मध्ये महाराष्ट्रात एकूण १९० वाघ होते. पुढील चार वर्षात वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.

२०१८ च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात ३१२ वाघ होते. वाघांच्या संख्यावाढीचा आलेख पुढील चार वर्षे देखील कायम राहिला. २०२२ च्या व्याघ्र गणनेनुसार आज महाराष्ट्रात जवळपास ४४६ वाघ आहेत. राज्यात वाघांचे प्रमाण हे २३ टक्क्याने वाढत असल्याचे शुभ संकेत आहेत, असे महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी सांगितले.

व्याघ्र संवर्धनासाठी सज्ज होण्याची गरज :– आज वाघांच्या बाबतीत जगात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक असणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. १९०० मध्ये भारतात एकूण ४०,००० वाघ होते. १९७१ मध्ये दुर्दैवाने भारतात केवळ १८०० वाघ उरले होते. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाघांच्या मोठ्या प्रमाणात खालावलेल्या संख्येची गांभीर्याने दखल घेत भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ हे कलम लागू केले. तसेच १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प योजना जाहीर केली.

व्याघ्र प्रकल्पावर मोठी जबाबदारी : – व्याघ्र प्रकल्प योजनेमुळे वाघांसह जंगलातील इतर प्राण्यांचे संरक्षण व्हायला लागले. आता वाघांची संख्या वाढायला लागली असतानाच हे वाघ जंगलाबाहेर जाणार नाही, याबाबत व्याघ्र प्रकल्पावर मोठी जबाबदारी राहणार आहे. वाघ आणि मानवांचा संघर्ष होणार नाही, याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. वाघांची शिकार होणार नाही, याबाबत देखील व्याघ्र प्रकल्पासह वन विभागाला सज्ज राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे देखील यादव तरटे म्हणाले.

वाघांची ७० टक्के संख्या भारतात :- २०१८ मध्ये संपूर्ण जगात एकूण ३८९० वाघ आढळून आले आहेत. २०१८ मध्ये भारतात वाघांची संख्या ही २९६७ इतकी होती. आज 2023 मध्ये भारतात एकूण ३१६७ वाघ आहेत. या ३ हजार १६७ वाघांपैकी ४४६ वाघ हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या ही सर्वाधिक विदर्भात आहे. वाघांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. वाघांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास निश्चितपणे यशस्वी ठरेल, असा विश्वास देखील यादव तरटे यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -