कोपर्डी : आठ वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात मनाला हेलावणारी घटना घडली होती. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनकडून तिच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तेव्हा ‘तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन’, असा शब्द देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिला होता. त्यामुळे दिलेला शब्द पाळत आज मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नात हजेरी लावली.
शब्दांचे पक्के, असे आमचे नेते -प्रवीण दरेकर
भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी याबाबत फेसबुक आणि एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. यामध्ये ‘शब्दांचे पक्के… असे आहेत आमचे नेते…आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा’. या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंबीयांनी ती संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. सुजय विखे पाटील, राम शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विवाहाचे निमंत्रण होतं, त्यामुळे कोपर्डीत आलो. वधू -वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू -वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.