Tuesday, February 11, 2025
Homeसाप्ताहिककोलाजचूक तुझी, त्रास आम्हाला...

चूक तुझी, त्रास आम्हाला…

क्राइम – अ‍ॅड. रिया करंजकर

कुटुंब व्यवस्था ही दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती. सिंगल मदर-फादर अशा कौटुंबिक व्यवस्थेकडे आपला देश वाटचाल करत आहे. याचा काही परिणाम घरातील लोकांना आणि मुख्य म्हणजे लहान मुलांवर जास्त होत आहे.

राज हा चांगल्या गव्हर्नमेंट नोकरीला होता. नोकरी चांगली आहे. सर्व घरदार व्यवस्थित आहे. घरातल्यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे कुटुंबाने विचार केला की, राजचे लवकर लग्न करून दिले की आम्ही मोकळे झालो. मुलगा आपला संसार सांभाळेल आणि आपण आपले उरलेले आयुष्य आनंदात जगू. राजच्या आई-वडिलांनी त्याला मुलगी बघण्यास सुरुवात केली. एक मुलगी त्यांच्या पसंतीस उतरली. ती मुलगी थोडी कमी शिकलेली होती. राजच्या आई-वडिलांनी ठरवलं की लग्न झालं की आपण हिला पुढचे शिक्षण देऊ. मुलगी वयाने लहान होती. त्यामुळे लग्न झाल्यावर ती सहा-सहा महिने माहेरीच राहू लागली. राजच्या घरच्यांना वाटले की मुलगी लहान असल्यामुळे तिला इथे व्यवस्थित राहणं जमत नाहीये. थोडे दिवस गेले की ती आपोआप तिला सर्व समजायला लागेल.

राजच्या पत्नीचे नाव रश्मी असून तिला दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यामुळे राजने तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत बारावीपर्यंत तिला शिकवले. पुढे रश्मीला पार्लरचा कोर्सही करायला लावला. एकुलती एक सून म्हणून राज तिच्या सगळ्या गोष्टी पुरवत गेला. याच दरम्यान त्यांना एक गोंडस मुलगा झाला. एका मुलाची आई होऊनही रश्मीमध्ये काहीच बदल जाणवत नव्हता. ती सारखी माहेरी जाऊन राहायची. घरातील लोकांना काहीही न बोलता राजला सांगायची की, मी थोडे दिवस माहेरी राहणार आहे. मला सासरी राहायचे नाहीये. पण कोणत्या कारणाने राजपासून वेगळे व्हायचे हे रश्मीला समजत नव्हते. ती सासरच्या मंडळींशी भांडण करू लागली. या सगळ्याचं कारण होतं ते म्हणजे रश्मीने लग्नाच्या आधी आपल्या अफेअरबद्दल कोणालाच सांगितले नव्हते. रश्मीने अफेअरबद्दल घरात सांगताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

तिने लग्नाअगोदरपासून आपलं अफेअर असल्याचे सांगितले आणि तो मुलगा माझी अजूनही वाट बघतोय आणि मला त्याच्यासोबत जायचे आहे हे ती सांगून मोकळी झाली. तिला वाटले लग्न झाले की सासू-सासरे, नवरा माझा छळ करतील, मला मारतील पण तसे काहीच झाले नाही. कारण घरातल्या लोकांना नेमके काय करायचे तेच सुचत नव्हते. एवढे दिवस रश्मी सतत माहेरी जात होती त्याचे कारण सासरच्या लोकांना आता माहीत झाले होते.

सासू आणि नवऱ्याने तिच्यावर न रागवता तिला व्यवस्थित समजावून सांगितले तरी ती ऐकायला तयार नव्हती. रश्मी सासरच्यांशी सारखी भांडत असायची. मला मुलगा नको आहे, मला घटस्फोट हवा आहे अशी मागणी ती राजकडे करू लागली. शेवटी घरातल्या लोकांनी निर्णय घेऊन घटस्फोट घेण्याचे ठरवले. फॅमिली कोर्टात केस दाखल केल्यानंतर तिने सासरच्यांना अगोदरच सांगितले होते की, माझ्या अफेअरबद्दल कुठलाही मजकूर किंवा माझी बदनामी करायची नाही. पण ज्यावेळी कौन्सिलरकडे त्यांना बसविण्यात आले तेव्हा मात्र तिने पोटगीसाठी दावा केला. माझी एवढी वर्ष तुझ्याबरोबर राहून वाया गेली असल्याचा तिने दावा केला. दहा वर्षांचा मुलगा असूनही आपल्या मुलावर काय परिणाम होईल याचा तिने विचारही केला नाही. तिच्या अशा वागणुकीमुळे घरातल्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत होता.

तिला घटस्फोट पाहिजे होता. तिला तिच्या बॉयफ्रेंडबरोबर राहायचे होते. सगळ्या गोष्टीचा त्रास मात्र ती आपल्या सासरच्या लोकांना देत होती. त्याच्यासोबत राहण्यासाठी ती राजकडून घर तसेच पोटगी मागत होती. राजसारख्या मुलाचे आयुष्य बरबाद करून दुसऱ्या मुलाचे आयुष्य आबाद करायला रश्मी निघाली होती. लग्न करतेवेळी योग्य वेळ घेतला असता तर आज एक कुटुंब तरी वाचलं असतं. आपल्या एका चुकीमुळे रश्मी आपल्याच घरातल्या लोकांना त्रास देत होती. राज तिच्याविरुद्ध तक्रार करू शकत होता. आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल. तसेच आपल्या मुलावर या घटनेचा परिणाम होईल म्हणून तो शांत बसला. याचा चुकीचा फायदा मात्र रश्मी घेत होती.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -