गुरुनाथ तेंडुलकर
शनिवारचा दिवस… एक वाजता शाळेचे वर्ग सुटले. सर्व मुलं लगबगीनं आपापल्या घरी गेली. संध्याकाळी चार वाजता खेळाच्या कार्यक्रमाला आणि सांघिक कवायतींसाठी पुन्हा परत यावं लागणार होतं. सगळी मुलं आपापल्या घरी गेली. पण छोटा लालबहादूर मात्र शाळेच्या वाचनालयातच बसून राहिला. शाळा आणि घर यांच्यातलं अंतर तसं बरंच होतं आणि मुख्य म्हणजे मध्ये एक नदी ओलांडावी लागत असे. नदी ओलांडून पलीकडे जाऊन परत यायचं, तर नावेला जायला एक आणि पुन्हा परत यायला एक असे दोन पैसे खर्च होणार आणि पोहत जावं म्हटलं, तर फार वेळ मोडणार, म्हणून लालबहादूर वाचनालयात बसून राहिला…
वास्तविक त्याला खेळाच्या कार्यक्रमात आणि कवायतीमध्ये फारसा रस नव्हताच. पण शिक्षकांच्या जबरदस्तीमुळे त्याला जाणं भाग होतं. दुपारी बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत करायचं काय, म्हणून तो वाचनालयात शिरला. कपाट उघडून त्यानं एक पुस्तक घेतलं आणि तिथंच बाकावर बसून वाचून संपवलं. त्यानंतर दुसरं पुस्तक… तिसरं पुस्तक… एक, एक करीत त्यानं चार-पाच पुस्तकं वाचून काढली. वाचता वाचता वेळ कसा गेला काही कळलंच नाही. सहज म्हणून त्यानं वाचनालयातील भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. साडेतीन वाजले होते. म्हणजे अद्याप अर्धा तास शिल्लक होता. लालबहादूरने आणखी एक पुस्तक वाचायला घेतलं आणि… ‘चला वेळ संपला.’ वाचनालयाचा ग्रंथपाल म्हणाला आणि लालबहादूर भानावर आला.
‘किती वाजले?’ लालबहादूरनं विचारलं.
‘पाच वाजून गेले.’ ‘काय?’ त्यानं भिंतीवरच्या घड्याळावर नजर टाकली.
‘तिथं बघू नकोस. ते घड्याळ बंद पडलंय.’ ग्रंथपाल म्हणाला.
‘काय? पाच वाजून गेले? बाप रे म्हणजे आता…’ तो स्वतःशीच पुटपुटला.
धावत पळत लालबहादूर शाळेच्या मैदानावर पोहोचला. खेळ संपून कवायती सुरू झाल्या होत्या… तो तसाच कवायतीच्या रांगेत उभा राहिला. कवायत करताना मास्तरांकडे पाहिलं. मास्तरांची जळजळीत नजर बरंच काही सांगून गेली. कवायत संपली. मास्तर त्याच्याजवळ आले. ‘उशीर का झाला?’ मास्तरांच्या प्रश्नात खोचक धार होती. लालबहादूरनं सगळा प्रकार जसा घडला तसाच सांगितला. ‘अस्सं? म्हणजे आता तू खोटंसुद्धा बोलायला लागलास तर? तुला कवायत आणि मैदानी खेळ आवडत नाहीत हे मला ठाऊक नाही काय? खेळाचा तास चुकवण्यासाठी कुठे तरी भटकत होतास, आणि म्हणे वाचनालयात बसलो होतो, म्हणे घड्याळ बंद पडलं होतं… खोटं बोलतोस? तू काय मला मूर्ख समजलास? खोटारडा कुठला…’ ‘नाही गुरुजी, मी खरंच सांगतो.’ ‘मला काहीही ऐकायचं नाहीये. तू खोटारडा आहेस. कवायतीचा तास चुकवण्यासाठी वाट्टेल त्या थापा मारतोस. चल हात पुढे कर.’ लालबहादूरनं मुकाट्यानं हात पुढं केला. चार छड्या सपासप हातावर उठल्या. हात चुरचुरला. वेदना मस्तकात गेली.
‘आई गऽ’ लालबहादूर कळवळला. त्याच्या डोळ्यांतून पाणी आलं.
‘चल नीघ आता, आणि पुन्हा कधी खोटं बोलत जाऊ नकोस.’
‘नाही गुरुजी. मी खरंच सांगतो, मी वाचनालयातच होतो, भिंतीवरचं घड्याळ बंद… हवं तर तुम्ही…’ ‘उगाचच मला अक्कल शिकवू नकोस, नीघ आता.’ मान खाली घालून लालबहादूर माघारी फिरला आणि घरी परतला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. शाळेला सुट्टी होती. त्यानंतर सोमवारी जेव्हा लालबहादूर पुन्हा शाळेत गेला, त्यावेळी मास्तरांची आणि त्याची नजरानजर झाली. त्याचा ओठ दाताखाली मुडपला गेला. डोळ्यांत वेदना तरळली. मास्तर त्याच्याजवळ आले. लालबहादूरचा चेहरा कसानुसा झाला. ‘काय ? काय झालं?’ मास्तरांनी विचारलं. मास्तरांच्या नजरेला नजर भिडताच त्याच्या डोळ्यांतून अश्रूचे दोन थेंब ओघळलेच. ‘अजून हात दुखतोय का?’ मास्तरांचा स्वर थोडा मऊ झाला होता. मास्तरांनी वाचनालयातलं घड्याळ खरोखरीच बंद असल्याची खात्री करून घेतली होती. मास्तरांनी पुन्हा विचारलं, ‘अजून हात दुखतोय का?’ ‘नाही गुरुजी.’ ‘मग तुझ्या डोळ्यांत पाणी का?’ ‘गुरुजी, तुम्ही मारलेल्या छड्यांचं मला काहीच वाटलं नाही. हात थोडा वेळ दुखला, चुरचुरला आणि दुखायचा थांबला. बरा झाला. त्यावेळी उठलेले वळ दुसऱ्या दिवशी नाहीसे झाले. पण गुरुजी, आपण मला खोटारडा म्हणालात ना, त्याचं जे वाईट वाटलं ते अजून बरं होत नाहीये. मला मैदानावर पोहोचायला उशीर झाला. आपण कारण विचारलंत त्यावेळी मी खरं खरं कारण सांगितलं, तरीही आपण मला खोटारडा म्हणालात याचंच वाईट वाटतंय. गुरुजी, आपण अजूनही वाचनालयात जाऊन खात्री करून घ्या हवी तर. मी तुम्हाला खरंच सांगितलं आणि तरीही आपण मला खोटारडा ठरवलंत.’ बोलता बोलता लालबहादूर एकाएकी रडू लागला. मनाला झालेली जखम डोळ्यांवाटे भळाभळा वाहत होती. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातली ही एक घटना.
शरीराच्या जखमा लवकर भरतात. मनाच्या जखमा भरायला वेळ लागतो. अनेकदा तर त्या कधीच भरल्या जात नाहीत. वरून भरल्या तरी आत कुठंतरी खोलवर त्या जखमा ठुसठुसत राहतात कायमच्या. या सूडाच्या प्रवासामागे होते काही कटू शब्द… जिव्हारी झोंबणारे. जखमी करणारे… म्हणूनच एका तत्त्ववेत्त्याने म्हटलंय, ‘शब्द हे शस्त्रांहून अधिक तीक्ष्ण असतात आणि म्हणूनच फार जपून वापरावे लागतात. शस्त्रांच्या जखमा बऱ्या होतात. शब्दांच्या जखमा कायम ठुसठुसत राहतात.’ म्हणूनच आपण सर्वसामान्य माणसांनीही बोलतांना आपल्या शब्दांची धार आधी स्वतः तपासून घ्यायला हवी. आपल्या शब्दांनी कुणी जखमी, तर होणार नाही ना? याची खात्री करूनच मग बोलावं. जखम झाल्यानंतर, सॉरी म्हणून मलमपट्टी करण्यापेक्षा आधी मुळात जखमच होणार नाही, कुणी दुखावलाच जाणार नाही, यासाठी शब्द नीटपणे निवडून पारखून नंतरच वापरावेत. इतरांच्या शब्दांनी जसे आपण दुखावले जातो, तसेच आपल्या शब्दांनीही इतर कुणीतरी दुखावलं जाऊ शकेल याचं भान ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.