स्नेहधारा – पूनम राणे
आईने एक खेळणे आणले होते. ते स्प्रिंगचे होते. चावी दिली की, टाळ्या वाजवत उभे राहायचे आणि थोड्या अवधीत खाली कोसळायचे. बराच वेळ ते बालक त्या खेळण्याशी खेळत असे. एके दिवशी त्या खेळण्याशी खेळत असताना, आई म्हणाली, ‘‘हे बघ बाळा, तुझ्याही आयुष्यात कधी कधी असे भुईसपाट होण्याचे प्रसंग येतील.” मात्र भिऊ नकोस. हिमतीने लढा दे. तुझी ऊर्जा वाढेल. तुझा आत्मविश्वास वाढेल.
खरं म्हणजे, या लहान वयात आईचे हे वाक्य कृतीतून समजवल्याने या मुलांच्या डोक्यात पक्के बसले आणि “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” या उक्तीनुसार या मुलाच्या आयुष्यात विविध प्रसंगातून मानवतेचा संस्कार दिसून येऊ लागला.
दुसरा असाच प्रसंग. दिवाळीचा सण होता, बाबांनी दोन्ही मुलांच्या हातावर काही रक्कम ठेवली आणि फटाके घेऊन येण्यास सांगितले. एकाने फटाके आणले आणि दुसरा मुलगा रस्त्यातून जात असताना त्याला एक गरीब भिकारी दिसला, त्याने त्याच्या हातावर ती रक्कम ठेवली. भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्याचा आनंद या मुलाला झाला.
हिवाळ्याच्या दिवसात असेच एकदा आईसोबत बाजारात जात असता या छोट्या बाळाने थंडीने कुडकुडत असणारा भिकारी रस्त्याच्या कडेला पाहिला. स्वतःच्या अंगावर असणारी शाल काढून भिकाऱ्याच्या अंगावर लपेटली. परमेश्वर काही माणसांना या पृथ्वीवर पाठवताना वात्सल्याची झालर देऊन, स्वतःच्या रूपातच प्रकट होत असतो.
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू, असे म्हणणारे, माणसातला देव म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे. अर्थात बाबा आमटे ही सर्व उदाहरणे त्यांचीच.
मुलांनो, लहानपणापासूनच आईला प्रत्येक कामात मदत करणे, दळण दळणे, सडा रांगोळी घालणे, भुकेलेल्या, गांजलेल्या दीनदलितांना मदत करणे. इत्यादी कामे आवडीने करत.
तुळशीराम नावाच्या महारोग्यास पाहून बाबांचे हृदय पिळवटून निघाले आणि त्याच दिवशी महारोग्यांचे मातृत्व स्वीकारण्याचे ध्येय निश्चित झाले.
विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांचे आदर्श होते. विनोबा त्यांना नेहमीच सांगत, ‘‘आपण निष्ठेने काम करावे. आज चालताना अडकून पडाल, पण याच अनुभवाने पुढे धावू लागाल, आपल्या हातून पुढे फार मोठे कार्य होणार आहे!” तू पुढे चाल, जग आपोआप तुझ्या मागे येईल.” विनोबांचे शब्द त्यांच्यासाठी ऊर्जा होती.
बाबांनी कुष्ठरोग्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनंदवन’ नावाची संस्था स्थापन केली. तिचे उद्घाटन विनोबा भावे यांच्या हस्ते केले. श्रम हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. कुष्ठरोग्यांना गोपालन, माळी काम, सुतारकाम, लोहारकाम शिकवले. स्वावलंबन आणि स्वकष्टाचा आनंद कुष्ठरोग्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. असंख्य हात मदतीसाठी पुढे आले. लता मंगेशकर यांनी संगीताचा कार्यक्रम करून ३४ लाख रुपये बाबांना अर्पण केले. तसेच पु. ल. देशपांडे यांनी एक लाख रुपये देणगी दिली.
बाबा म्हणत, ‘‘महारोग शरीराचा नव्हे तर समाज मनाचा महारोग अधिक भयंकर असतो.” हात, हे उगारण्यासाठी नसतात, तर उभारण्यासाठी असतात… कोणतेही भव्य स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी रक्त, घाम आणि अश्रू यांचा त्रिवेणी संगम झाला पाहिजे. तसेच डोळ्यांत अपार करुणा, हातात औषध, हृदयात प्रेम आणि मनात निष्ठा ठेवून रोगाने पछाडलेल्या अनाथ अपंग, असहारा वृद्धांना जगण्याचा प्रकाश त्यांनी दिला. अखेर ते परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त करताना म्हणत, ‘‘मी परमेश्वराकडे केवळ सूर्यकिरणांची अपेक्षा ठेवली होती, त्याने चक्क माझ्या अंगणात सूर्यच पाठवला.
या वाक्याची प्रचिती जग अनुभवत आहे. बाबांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.
मुलांनो, बाबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यात शिस्त, जबाबदारी, आत्मविश्वास, समाजाबद्दल कृतज्ञता ठेवून आपणही काही अंशी मानवतेचं बीजारोपण आपल्या जीवनात नक्कीच करू शकतो. आधुनिक युगात त्याची नितांत गरज आहे.