सतीश पाटणकर
कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये एक तरी ग्रामदैवतेचं देवस्थान पाहायला मिळते. प्रत्येक रत्नागिरीकरांसाठी ते श्रद्धास्थान असते. रत्नागिरीचे श्रीदेवभैरी हे ग्रामदैवत. कोकणातील समुद्र किनारपट्टीपासून ते अगदी सड्यापर्यंत पसरलेल्या रत्नागिरी शहरामध्ये स्थित असलेले श्रीदेव भैरी ग्रामदेवतेचे मंदिर हे इतर मंदिरांप्रमाणे पुरातन कला जपलेले आहे. शंकराच्या मंदिराप्रमाणेचं या मंदिराची रचना असून उतरत्या छपरावर, मातीची कौले आजही मंदिराचे वैविध्य टिकवून आहेत.
भैरी देवस्थानचा सर्व परिसर वेगवेगळ्या सुशोभित झाडांनी तसेच जुन्या डेरेदार वृक्षांनी वेढलेला आहे. मंदिराच्या आवारात पाण्याचे मोठे तलाव आहेत. त्यांची विशेष रचनात्मक बांधणी असलेल्या पायऱ्या मंदिराच्या पाचशे वर्षांच्या इतिहासाचे दावेदार आहेत. या मंदिराला लाभलेल्या ऐतिहासिक महत्त्वामुळे रत्नागिरी शहराच्या १२ वाड्याच नाहीत, तर शहरात प्रवेश करणारा प्रत्येकजण इथे नतमस्तक होतोच. येथील लोकांची श्रीदेव भैरीवर अफाट श्रद्धा आहे. भैरीबुवाचे लक्ष अख्या रत्नागिरीवर तसेच बारवाड्यावर असून, प्रत्येकाच्या हाकेला तो धावून येतो अशी सर्व कोकणवासियांची ठाम श्रद्धा आहे. पूर्वी असे म्हटले जायचे की, श्रीदेव भैरी ग्रामप्रदक्षिणेला सफेद घोड्यावर बसून, शुभ्र वस्त्र परिधान करून अगदी राजासारखा जात असे. जरी प्रत्यक्ष दर्शन नाही झाले तरी ठरावीक वेळ झाली की घोड्यांच्या टापांचा आवाज रस्त्यावरून वाऱ्याच्या वेगाने गेल्यासारखा ऐकू यायचा. दूर गेल्यावर पांढरी सावली जातेय असा भास व्हायचा. कोणीही काही संकटात असले आणि अगदी उशिरा एकट्याने घरी जायची वेळ आली तरी भीती वाटू नये म्हणून संरक्षणासाठी भैरी बुवाचा धावा करत असत. तेव्हा सुद्धा घुंगरूकाठीचा आवाज ऐकायला येत असे आणि घरी सुखरूप पोहोचल्यावर आवर्जून देवाचे आभार मानले जायचे.
रत्नागिरी शहराला आज काळाच्या ओघात नवरूप आलं असलं, तरी दैवत इथल्या प्रत्येक रत्नागिरीकरांसाठी श्रद्धास्थान असते. रत्नागिरीचे श्रीदेव भैरी हे त्यापैकीच एक ग्रामदैवत. रत्नागिरीच्या खालच्या आळीत सुमारे ३५० वर्षांपूर्वीचे श्रीदेव भैरी हे रत्नागिरीच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. भैरव हे शंकराचेच एक रूप. हे मंदिर राजस्थानातील गुजरांनी बांधले असावे, असे काही जाणकार सांगतात. १७३१ च्या सुमारास कान्होजी आंग्रेंचा मुलगा सेखोजी आरामारासह रत्नागिरीत आला. त्याच्याबरोबर पाच गुजर नामक कुटुंबे होती. यांनीच शहरात ही मंदिरे उभारली. त्याकाळी गावाचा कारभार पाहणाऱ्या सावंत-खोतमंडळींकडेच गावाचा आणि मंदिराचा सारा कारभार होता. १९७६ पर्यंत या मंदिराचा कारभार सावंत-खोत मंडळींकडून चालवला जात असे. मात्र, १९६७ नंतर या मंदिरात पब्लिक ट्रस्ट स्थापन झाली आणि तेव्हापासूनच ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा कारभार चालतो.
मंदिरात प्रवेश करताच आपल्याला दुरूनच श्रीदेव भैरीचे दर्शन होते. या मंदिरातच तृणबिंदुकेश्वराचे मंदिर आहे. प्रथम तृणबिंदुकेश्वर आणि अन्य पाच मंदिरांचे दर्शन करून मगच भैरीचे दर्शन घेण्याची इथे प्रथा आहे. भैरीच्या या मंदिरात पहाटेपासून अगदी रात्री उशीरापर्यंत रत्नागिरीकरांची गर्दी असते. रत्नागिरीकर सकाळी नोकरी व्यवसायावर जाण्यापूर्वी किंवा परतताना इथे माथा टेकून पुढे जातात. या मंदिरात वर्षभर विविध सण जल्लोषात साजरे होत असले, तरी शिमगोत्सवात, फाल्गुन शुक्ल पंचमीच्या रात्री मंदिराचा संपूर्ण परिसर रत्नागिरीकरांनी भरून गेलेला असतो. संपूर्ण कोकणातल्या शिमगोत्सवात श्रीदेव भैरी बुवाचा शिमगोत्सव मोठा समजला जातो.
कोकण आणि कोकणातील शिमग्याचे नाते काही अतूटचं आहे. शिमग्याच्या उत्सवासाठी अगदी परदेशाहूनही कोकणवासीय हजेरी लावतो. त्यामध्ये श्रीदेव भैरीचा शिमगोत्सव, पालखी खेळवणे, मिरवणूक, गावप्रदक्षिणा, नाक्या नाक्यावर पालखीच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले भाविक, वर्षातून एकदा देव आपल्या घरी येणार ही कल्पनाच खूप आल्हाददायी असते. प्रत्येक रत्नागिरीकरांसाठी, पालखीच्या आगमनाच्या वेळी सर्वत्र केलेली सजावट, रोषणाई, रस्त्यावर काढलेल्या दुतर्फा रांगोळ्या, श्रीदेवभैरीचे औक्षण करण्यासाठी सुवासिनींची होणारी लगबग, प्रत्येक घरामध्ये बोलले जाणारे नवस, स्वीकारले जाणारे उलपे, प्रसाद, नैवेद्य, गाऱ्हाणी या सगळ्या गोष्टींचे सुख फक्त आणि फक्त एक रत्नागिरीकरचं घेऊ शकतो.
गावागावातील होणाऱ्या पालख्यांच्या भेटी, पालखी नाचविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात. रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या वर्षातून एकदा वाजत गाजत श्रीदेव भैरीच्या भेटीला येतात. या सर्व पालख्यांची भेट भैरी मंदिराच्या आवारातील मिऱ्या गावात होते. भैरीच्या आवारात होणारी ही देवांची भेट अंगावर रोमांच आणणारी असते. भेटीनंतर भाविक पालख्या खांद्यावर घेऊन नाचवतात. शिमगोत्सवावेळी पालखीतील विराजमान ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. इथूनच ग्रामदेवता ग्राम प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. पारंपरिक निशाण अबदागीर यांसह ही पालखी रात्रभर मानपानाप्रमाणे वाड्यावस्त्यांमध्ये फिरते. बारा वाड्यातील २२ जातीजमातींचे लोक हा उत्सव एकत्र येऊन साजरा करतात.
शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे शिमगोत्सवातील होळीमध्ये अगदी मुस्लीम समाजाचाही मान जपला जातो. फाल्गुन शुक्ल पंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुरमाडाची मोठी होळी तोडली जाते. आपले मान-मरातब, पदेसारी विसरून रत्नागिरीकर ही होळी आपल्या खांद्यावर घेऊन होळीच्या पारंपरिक स्थानावर घेऊन येतात. ग्रामदेवतेचा हा उत्सव कोकणी माणसाला एकीचे महत्त्व समजावून सांगतो. कसलेही मोठे आव्हान असले, तरी एकत्र आलात-राहिलात, तर यशस्वी व्हाल, हेच जणू हे ग्रामदैवत यातून पटवून देतात. भैरी बुवा हा रत्नागिरीचा रखवालदार असल्यामुळे इथला प्रत्येक माणूस या उत्सवात सामील होतो.