स्वकियांशी लढण्याची सज्जता करण्यात मानसिकदृष्ट्या कमी पडलेल्या पार्थाला श्रीकृष्णाने ‘गीता’ रूपाने केलेला उपदेश आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही कर्तव्य श्रेष्ठ मानत टिकून कसे राहायचे, याविषयी केलेले विवेचन आज कित्येक योजने उलटल्यानंतरही आपल्या कामी येणारे आहे. म्हणूनच आजही आपण गीता जयंती साजरी करतो. त्याच बरोबरीने येणारा दत्त जयंतीचा मंगल काळही आपल्या आध्यात्मिक जाणिवा उंचावून प्रभूकृपेचा आनंद देऊन जातो.
ऊर्मिला राजोपाध्ये
या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गीताजयंती आणि दत्तजयंती या दोन्ही मंगलमय दिवसांना आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. स्वकियांशी युद्ध करतेवेळी संभ्रमावस्था अनुभवणाऱ्या पार्थाला भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे मार्गदर्शन केले आणि केवळ त्याचाच नव्हे, तर समस्त मानवजातीला वारंवार पडणाऱ्या समस्यांच्या निराकरणाचा मार्ग दाखवला. दुसरीकडे दत्तात्रेयांनीही भाविकांवर वरदहस्त ठेवला. त्यांचेच हे स्मरण.
माणसाला वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शकाची गरज असते आणि वेगवेगळ्या रूपात ती पूर्णही होत असते. मातापित्यांच्या पंखाखालून दूर होत मोकळ्या जगात विहार करताना गुरुजनच नव्हे, तर ग्रंथरूपानेही ती पूर्ण होत असल्याचा अनेकांचा अनुभव असेल. वाचन आपल्याला वैचारिक समृद्धी देतेच, खेरीज जीवनाकडे, जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही अधिक सुस्पष्ट करते. म्हणूनच उत्तम मार्गदर्शक, गुरू, समुपदेश मिळवणारी व्यक्ती जगण्याची विद्या आत्मसात करून इतरांपेक्षा अनेक पातळ्यांवर पुढे जाताना दिसते. असे असताना साक्षात भगवंताने केवळ आपल्यालाच नव्हे, तर प्रत्येक मानवाला दिलेल्या शिकवणीची महती काय वर्णावी…! स्वकियांशी लढण्याची सज्जता करण्यात मानसिकदृष्ट्या कमी पडलेल्या पार्थाला श्रीकृष्णाने ‘गीता’ रूपाने केलेला उपदेश आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही कर्तव्य श्रेष्ठ मानत टिकून कसे राहायचे, याविषयी केलेले विवेचन आज कित्येक योजने उलटल्यानंतरही आपल्या कामी येणारे आहे. म्हणूनच आजही आपण गीता जयंती साजरी करतो. त्याच बरोबरीने येणारा दत्त जयंतीचा मंगल काळही आपल्या आध्यात्मिक जाणिवा उंचावून प्रभूकृपेचा आनंद देऊन जातो. म्हणूनच मार्गशीर्षातील या दोन्ही दिवसांचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते.
महाभारताचा काळ मागे सरला असला तरी कुटुंबातील वैरभाव, समज-गैरसमजातून उद्भवणारे कटू प्रसंग आणि प्रसंगी आपल्याच माणसांसंदर्भात घ्यावी लागणारी कठोर भूमिका काही सरलेली नाही. एकत्र कुटुंब पद्धतीची सद्दी संपूनही मोठा काळ लोटल्यानंतरही कौटुंबिक, सामाजिक वातावरणात समोर येणारे अनेक पेचप्रसंग आपल्याला गोंधळवून टाकतात. द्वंद्वात अडकलेल्या अशा प्रत्येक जीवासाठी आजही भगवद््गीता हा खंबीर आधार ठरतो आणि अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांमधून निर्माण झालेली गीता आपलीही संभ्रमावस्था दूर करते. कौरवांविरुद्ध युद्धास उभे ठाकण्याची वेळ येताच अर्जुनाची मन:स्थिती फारच नाजूक होती. युद्धभूमीवर रथ नेल्यावर आपले आप्तस्वकीय पाहून अर्जुनाच्या मनात प्रश्न उभे राहिले. मात्र अशा परिस्थितीतही भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य त्याच्या मनात निर्माण झाले. कोण चूक आणि कोण बरोबर या प्रश्नाने पार्थाचे मन, अंत:करण आपण अविचार तर करत नाही ना, या विचाराने ग्रासले होते. पितृवध, गुरुवध, बंधुवध, सुहृदवध यातून मला काय मिळणार, आपण करायला निघालो आहोत ते योग्य की अयोग्य, अशा विचारांचे जाळे त्याच्या मनात पसरत होते.
दुर्योधन अत्याचारी आहे, पण त्याच्या बाजूने लढणारे सर्व माझे प्रियजनच आहेत. द्रोणाचार्य भीष्मांच्या अंगाखांद्यावर तर आपण लहानाचे मोठे झालो. अशा ज्येष्ठ-श्रेष्ठांबरोबर मी कसे युद्ध करू, शस्त्र कसे उगारू, अशा मन:स्थितीत अर्जुनाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कोणी तरी हवे होते. या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर केलेला उपदेश म्हणजे गीता हे जीवनाचे सार आहे. म्हणूनच गीतेला आजच्या युगातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा दिवस भगवद्गीता जयंती म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भगवद्गीता भारतीयांच्या तना-मनात कोरलेली आहे. गीता ही धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक इतिहासाचे सारच आहे. हे सार सर्वांना नीट कळावे म्हणून ज्ञानेश्वरांनी संस्कृतमध्ये असणारी गीता प्राकृत भाषेत आणली.
‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। माकर्मफल हेतुर्भूर्मा ते सड्गोडस्त्व कर्मणि॥’
अर्थात सतत चांगले कर्म कर. फळाची अपेक्षा करू नको. इतरांना मिळणाऱ्या धनावर दृष्टी ठेवू नकोस, हे श्रीकृष्णाने सांगितलेले विचार सध्याच्या काळात उपयुक्त सिद्ध होणारे आहेत.
‘उद्धेरेदात्मनात्मानं नात्मानमव सादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन:॥’
म्हणजेच माणसाने नेहमी स्वत:चा उद्धार करावा, म्हणजे स्वत:च स्वत:चा उद्धार करावा. निराश होऊ नये. बुद्धीचा वापर न केल्यामुळे शत्रुत्व निर्माण होते असे सांगणारी भगवद्गीता आजही आपल्याला नवी प्रेरणा देते. वेद-उपनिषदे यांचा महान ज्ञानसागर भगवद्गीतेत सामावला आहे. बाळ गंगाधर टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून भगवद्गीतेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आधुनिक काळातही आपण गीतेचे तत्त्वज्ञान वापरले पाहिजे. पण आपण पूर्वीच्या युद्धपद्धती, महाभारतातील युद्धनीती-नियमांचे आचरण याबाबत कितपत विचार करतो हा प्रश्नच पडावा. गीतेत सुखाचे तीन वर्ग केले आहेत. सात्त्विक, राजस आणि तामस. प्रथम विषासारखे अवघड वाटते पण नंतर गोड असते, तेच सुख सात्त्विक. आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेपासून हे सात्त्विक सुख मिळते. राजस सुख प्रथम अमृतासारखे असते, पण शेवटी विषासारखे असते. तामस सुख हे निद्रा, आळस आणि प्रमास यापासून उत्पन्न होते. शिवाय ते पारंभी आणि शेवटी माणसाला मोहात पाडते. या सुखात माणूस गुंतून पडतो. सुख आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू. सुख कितीही मिळाले तरी कमीच वाटते तर दु:ख मिळाल्यावर आपल्याला सतत दु:खच मिळत असल्याची भावना अधिक प्रबळ होत जाते. म्हणूनच निष्काम बुद्धीने प्रयत्न, कष्ट आणि कर्म केले पाहिजेत. माणसाला कर्मे सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र, फळाची आशा न करता सतत चांगले कर्म केले पाहिजे. कामासाठी, कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा, हाच संदेश गीतेने आपल्याला दिला आहे. लोकहिताची कामे कोणत्या बुद्धीने केली जातात, याला अधिक महत्त्व आहे. त्याचबरोबर मनात कोणतीच अभिलाषा न ठेवता दिलेलेे दान हेच खरे दान आहे, हाच संदेश गीता देते.
अहिंसा किंवा सत्य हे सर्व नीतीधर्म प्राणीमात्रांच्या हितासाठी आहेत. लोकांच्या कल्याणासाठीच धर्मशास्त्र आहे. संसार करत इतरांप्रमाणे जगातील सर्व व्यवहार विरक्त बुद्धीने करावेत असे गीता सांगते. म्हणजेच ‘कर्मयोग’ हीच गीतेची शिकवण आहे. धर्माला (समाजाला) ग्लानी येते तेव्हा तेव्हा त्यांचा उत्कर्ष करण्यासाठी, मी युगायुगात जन्म घेतो आणि जनहिताची कामे करतो. ती करताना माझ्या मनात आसक्ती नसते. त्यामुळे मी केलेल्या कोणत्याही कर्माचे पाप-पुण्य मला लागत नाही. निष्काम कर्म करणे हा एक श्रेष्ठ प्रतीचा यज्ञच होय, असे गीता सांगते. अनेक युगे, वर्षे लोटली तरी भारतीयांच्या मनातला गीतेविषयीचा आदर कायम आहे. पुढेही तो असाच राहणार आहे. गीतेने आपल्याला जगण्याचे तत्त्वज्ञान दिले. त्यामध्ये ज्ञान आहे, भक्ती आहे, पातंजल योग आहे, संन्यास आहे, वैराग्यही आहे. अशा या पूर्ण गीतेत, प्रत्येक अध्यायात एका साखळीतील अनेक दुव्यांप्रमाणे हा कर्मयोग आपल्याला प्रत्येक ठिकाणी सुसंबद्ध केलेला दिसतो.
या दिवसाबरोबरच मार्गशीर्षात पार पडणारा दत्तजयंतीचा सोहळाही आध्यात्मिक आनंद देणारा ठरतो. सर्वदूर पसरलेल्या दत्तसंप्रदायातील भाविकांसाठी ही मोठी पर्वणी असते. दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया यांचे पुत्र. ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या त्रिमूर्तीसमान पुत्र मिळावा म्हणून अनसूयेने कठोर तपस्या (तपस्या) केली होती. सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या पुरुष त्रिमूर्तीच्या पत्नींना अनसूयाचा हेवा वाटला आणि त्यांनी त्यांच्या पतींना तिच्या सद्गुणांची चाचणी घेण्यास सांगितले. त्यानुसार तिन्ही देव अनसूयेकडे साधूंच्या वेशात आले आणि परीक्षा होईल अशा प्रकारे तिच्याकडे भिक्षा मागितली. अनसूयाने त्या स्थितीतही शांत राहून एक मंत्र उच्चारला आणि तिन्ही ऋषींवर पाणी िशंपडून त्यांना बाळ बनवले आणि नंतर त्यांना दूध पाजले.
अत्री आश्रमात परतल्यानंतर तिन्ही बाळांना मिठी मारली आणि तीन डोके आणि सहा हात असणाऱ्या एकाच बाळामध्ये त्यांना रूपांतरित केले. तिकडे तिन्ही देव परत न आल्याने त्यांच्या पत्नी चिंताग्रस्त झाल्या आणि त्या अनसूयेकडे गेल्या. त्यांनी तिची क्षमा मागितली आणि आपापल्या पतींना परत पाठवण्याची विनंती केली. अनसूयाने विनंती मान्य केली. मग त्रिमूर्ती त्यांच्या नैसर्गिक रूपात अत्री आणि अनसूया यांच्यासमोर प्रकट झाली आणि त्यांना दत्तात्रेया नावाचा पुत्र दिला. आजही या देवतेची मनोभावे पूजा करणारा, उपासना करणारा मोठा वर्ग आहे. दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांची मंदिरे उत्सवाचे केंद्र होतात. भक्त यथोचित उपासना करत धूप, दिवे, फुले, कापूर यांनी भगवान दत्तात्रेयाची पूजा करतात. सदाचाराचा मार्ग साधण्यासाठी घरोघरी आणि मंदिरात भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तींची पूजा केली जाते. आताही त्यानिमित्ताने मंदिरे सजली आहेत आणि लोक भगवान दत्तात्रेयाला समर्पित भजन आणि भक्तिगीतांमध्ये मग्न आहेत. काही ठिकाणी अवधूत गीता आणि जीवनमुक्त गीता देखील वाचल्या जातात. अशा प्रकारे हे दोन्ही दिवस मोठ्या भक्तिभावात साजरे होतात.