श्रीनिवास बेलसरे
मनोजकुमारने एका सिनेमात मदनपुरीच्या तोंडी एक प्रॉफेटिक वाक्य टाकले होते. “भारत का इमानदार मजदूर, इमानदार बिझिनेसमन, इमानदार फौजी, और इमानदार पुलिस सब खत्म हो जायेगा!” आज त्या भयंकर वाक्यातील फक्त ‘इमानदार फौजी’ हे दोन शब्द वजा केले, तर ती भविष्यवाणी खोटी ठरली असे म्हणता येईल का? हा प्रश्न आहे! अर्थात मनोजकुमारने ते वाक्य थोड्या वेगळ्या अर्थाने टाकले होते, कारण त्याच्या बहुतेक सिनेमात त्याचेच नाव ‘भारत’असायचे.
सिनेमा होता १९७४ चा ‘रोटी, कपडा और मकान’! निर्माता, लेखक, दिग्दर्शक, नायक सबकुछ मनोजकुमार. सोबत होते जीनत अमान, शशी कपूर, अमिताभ बच्चन, मौसमी चॅटर्जी, प्रेमनाथ, धीरज कुमार, कामिनी कौशल, मदन पुरी, अरुणा ईरानी, सुलोचना, मनमोहन, रजा मुराद, राज मेहरा, आगा आणि असित सेन. त्याकाळी देशभर प्रचंड बेकारी होती. सुशिक्षित बेकारांचा प्रश्न गंभीर होता. महागाईने जनता त्रस्त होती. सर्वत्र पसरलेली अनैकता, श्रीमंत वर्गाची चैनबाजी, त्यांनी केलेली सामान्य माणसाची लूट हे सगळे शिगेला पोहोचले होते. मनोजकुमारसारख्या संवेदनशील कलाकाराला यावर काही तरी व्यक्त व्हावेसे वाटणे स्वाभाविक होते. त्यातून जन्माला आलेला सिनेमा म्हणजे ‘रोटी कपडा और मकान.’
वडिलांच्या सेवानिवृत्तीमुळे घराची जबाबदारी भारतवर (मनोजकुमार) येऊन पडते आणि कथेला सुरुवात होते. त्याला दोन भाऊ आणि एक लग्नाला आलेली बहीण आहे. पदवीधर असूनही नोकरी मिळत नाही! मनोजची प्रेयसी असलेल्या झीनत अमानला शशी कपूरकडे नोकरी लागते. सुंदर शीतल शशी कपूरला आवडते. तिचे मनोजकुमारवर मनापासून प्रेम असले तरी तिला श्रीमंती, भौतिक सुख, यांचे आकर्षण असते. त्यातून हळूहळू तिच्यात आणि शशी कपूरमध्ये प्रेमाचे नाते निर्माण होऊ लागते. या त्रिकोणातून कथा गुंतागुंतीची होत जाते. अनेक नाट्यमय घटना घडून गेल्यावर झीनतला पश्चाताप होतो. देशद्रोह्यांविरुद्ध सुरू असलेल्या मनोजच्या कामात ती त्याला मदत करते. त्यातच तिचा गोळी लागून मृत्यू होतो आणि शेवटी त्याच्या प्रेमात पडलेल्या मौसमीशी त्याचे लग्न होते. अशी ही काहीशी सुखांत शोकांतिका! यातले टाळ्या घेणारे चपखल संवाद आणि प्रेमनाथने केलेली प्रामाणिक सरदाराची भूमिका स्मरणात राहते. त्यावर्षी ‘सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता’ म्हणून प्रेमनाथचे नामांकनही झाले होते. केवळ २५ वर्षांच्या नाजूक मौसमी चॅटर्जीवरून तर नजर हटू नये इतकी ती मोहक दिसते.
लक्ष्मी-प्यारेंनी कर्णमधुर संगीत दिलेल्या सहा गाण्यांपैकी तीन वर्मा मलिक यांनी, तर तीन संतोष आनंद यांनी लिहिली होती. मलिकसाहेबांनी १९७५ च्या बिनाकाला एक विक्रम केला होता. त्या वर्षीच्या सर्वात लोकप्रिय गाण्यात त्यांची दोन गाणी सर्वोत्तम ठरली. जानीबाबू कव्वाल, मुकेश, लतादीदी आणि नरेंद्र चंचलने गायलेले ‘बाकी कुछ बचा तो महंगाई मार गयी’ हे पहिले, तर लतादीदीने गायलेले ‘हाय हाय ये मजबुरी, ये मौसम और ये दुरी’ दुसरे आले! सिनेमाला तीन फिल्मफेयर मिळाली होती. मनोजकुमारला सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून, सर्वश्रेष्ठ गीतकार संतोष आनंद यांना ‘मैं ना भुलूंगा, मैं ना भुलूंगी’साठी सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचे आणि महेंद्र कपूरला ‘और नहीं बस और नहीं, गम के प्याले और नहीं’ या गाण्यासाठी सर्वश्रेष्ठ पुरुष गायक म्हणून फिल्मफेयर मिळाले. याशिवाय सिनेमाला विविध ८ नामांकने मिळाली. ‘रोटी, कपडा और मकान’ त्यावर्षीचा सर्वात जास्त मिळकत करणारा सिनेमा ठरला! मनोज आणि झीनतवर चित्रित झालेल्या, संतोष आनंद यांच्या त्या भावुक गाण्याचे शब्द होते-
इन रस्मों को,
इन कसमों को,
इन रिश्ते नातों को,
मैं ना भुलूंगा,
मैं ना भुलूंगी…
प्रेमाच्या अतितरल अवस्थेत प्रेमीजन एकमेकांना अनेक वचने देत असतात. ते वय आणि ती मन:स्थितीच अशी असते की, मिळालेले प्रेम कसेही करून आयुष्यभरासाठी सुरक्षित करून ठेवावेसे वाटते. जीवलगाने न मागताच त्याला आयुष्यभराच्या साथीचे वचन दिले जाते. एकमेकांशिवाय जगातले सगळे व्यवहार जणू अडथळा वाटतात. त्यातूनच शब्द येतात –
‘चलो जग को भूलें, खयालों में झूलें,
बहारों में डोलें, सितारों को छूलें,
आ तेरी मैं माँग संवारूं तू दुल्हन बन जाये. माँग से जो दुल्हन का रिश्ता मैं
ना भुलूंगी…’
जगाला विसरून, चांदण्यात हरवून जाण्याची रंगीबेरंगी स्वप्ने आयुष्यात परत कधीच पडत नाहीत ही मानवी जीवनाची शोकांतिकाच आहे. झीनत जेव्हा ‘इन रिश्ते नातों को मैं ना भुलूंगी’ म्हणते तेव्हा मनोजचा कॅमेरा बरोबर तिच्या बोटातील त्याने दिलेल्या अंगठीवर जातो इतके त्याचे गाण्यातील प्रत्येक शब्दावर लक्ष असायचे.
संतोष आनंद यांची गाणी माणसाला भावुक करून हुरहूर लावतात. ते म्हणतात ‘काळाच्या पुरात आयुष्य तर वाहून जाणारच आहे. मनापासून, समरसून जगलेले क्षणच फक्त आपल्या हाती उरणार आहेत. प्रिये, मी शेवटचा श्वास बनून जावे आणि तू जीवन! श्वासाच्या जीवनाशी असलेल्या नात्यासारखे आपले नाते बनावे.’ केवढी काव्यमय कल्पना!
‘समय की धारा में, उमर बह जानी है,
जो घड़ी जी लेंगे, वही रह जानी है,
मैं बन जाऊँ साँस आखिरी,
तू जीवन बन जाये,
जीवन से साँसों का रिश्ता मैं ना भुलूंगी…’
जीवनातले सगळे ऋतू दोघांबरोबर अनुभवायचे आहेत. त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. एकेक क्षण उत्कटतेने अनुभवायचा आहे. त्यासाठी त्यांना जगापासून दूर जाऊन कुठेतरी लपावेसे वाटते.
बरसता सावन हो, महकता आँगन हो,
कभी दिल दूल्हा हो, कभी दिल दुल्हन हो.
गगन बनकर झूमें, पवन बनकर घुमे,
चलो राहे मोड़ें, कभी ना संग छोड़ें,
कहीं पे छुप जाना है, नजर नहीं आना है.
अंतिम कडवे तर कहर आहे. प्रेमाच्या जुनूनमध्ये दोघे प्रेमी म्हणतात दिवस येतील, जातील, आपल्याला काय त्याचे, कुठेतरी जाऊन राहू, जीवनाचे दिवस काढू! मी मनालाच मंदिर करून टाकेन आणि प्रिया, तू त्यातली पूजा होऊन जावेस.
‘कहीं पे बस जाएंगे, ये दिन कट जाएंगे,
अरे क्या बात चली, वो देखो रात ढली, ये बातें चलती रहें, ये रातें ढलती रहें, मैं मन को मंदिर कर डालूँ तू पूजन बन जाये, मंदिर से पूजा का रिश्ता मैं ना भुलूंगी…’ तारुण्यातील प्रेमाच्या अशा अतिउत्कट, स्वप्नवत अनुभवातून पुन्हा एकदा जायचे असेल, तर जुन्या गाण्यांना पर्याय नाही हेच खरे!