डाॅ. स्वाती गानू
आजकाल ‘पीअर प्रेशर’ हा शब्द वारंवार आणि विशेषतः टीनएजर्सच्या, काॅलेजात, हाॅस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांबाबत ऐकू येत असतो. पालकही यामुळे चिंतेत असतात. ज्या गटात मुले वावरत असतात त्यांच्याशी वागताना, मते मांडताना मुलांनाही खूप आव्हानांना सामोरे जावे लागते. गटात राहायचे असते पण काही अशा गोष्टी असतात की, ज्यांना बळी पडायचे नसते म्हणून नको तो पीअर ग्रुप असेही त्यांना वाटत असते. यामुळे मुले अतिशय तीव्र तणावातून जात असतात. अशा या पीअर प्रेशरला कसे हाताळायचे हे मुलांना सांगण्याकरिता पालकांनी हे जाणून घ्यायलाच हवे. पीअर प्रेशर किंवा प्रभाव हे कधी येते तर जेव्हा तुम्ही काही करता कारण तुम्हाला तुमच्या ग्रुपकडून मान्यता हवी असते. त्या ग्रुपमध्ये तुमची किंमत व्हावी, तुम्हाला मानसन्मान मिळावा, तुमचा भाव वधारावा असे तुम्हाला वाटत असते. ‘पीअर प्रेशर’ हे सकारात्मक असतं आणि नकारात्मकही.
हे पीअर प्रेशर हाताळणे, त्याच्याशी जुळवून घेता येणे म्हणजे नेमके काय? तर स्वत्व टिकवणे आणि हे करत असतानाच ग्रुपमध्ये टिकून राहणे. पीअर ग्रुपच्या प्रेशरमुळे जे करावे लागते पण जे करायची तुमची इच्छा नसते ते असते ‘पीअर प्रेशर किंवा पीअर इनफ्लुएन्स’. आपल्या इच्छेविरुद्ध जी गोष्ट करावी लागते ते असतं ‘पीअर प्रेशर’. या वयात मुलांवर आपल्या ग्रुपप्रमाणे वागावे असा प्रभाव असतो. काही वेळेस हे ‘पीअर प्रेशर’ सकारात्मक असतं जसे की, प्री टीन्स आणि टीनएजर्स हे आपल्या ग्रुपमुळे चांगल्या गोष्टी करण्याबाबत अधिक ठाम आणि आग्रही बनतात. नवीन गोष्टी करून पाहायला उत्सुक असतात. शालेय कार्यक्रमात जास्त रस घेतात. पण हे नकारात्मकही असतं. काही टीनएजर्स मुले अशा गोष्टींची निवड करतात ज्यात त्यांना स्वतःला अजिबात रस नसतो. उदा. असामाजिक वागणे, शाळा बुडवणे.
आता पाहू या की, पीअर प्रेशरचे परिणाम काय दिसून येतात?
१) आपल्या ग्रुपमधील मुलांप्रमाणेच कपडे घालतात. तशीच हेअर स्टाईल, मुली ज्वेलरी घालणे पसंत करतात.
२) पीअर ग्रुपमध्ये आवडणारे संगीत ऐकणे, सेम टीव्ही शोज पाहणे त्यांना आवडते.
३) पीअर ग्रुपमध्ये बोलताना ज्या शब्दांचा उपयोग केला जातो ते शब्द वापरतात.
४) धोकादायक गोष्टी करतात. नियम तोडतात.
५) शाळेत खूप अभ्यास करतात किंवा अजिबात अभ्यास करत नाहीत.
६) डेटिंग, शारीरिक गोष्टी करण्यात तसेच धूम्रपान, मदिरापान यात गुंततात.
●पीअर प्रेशर आणि पीअर ग्रुपचा दबाव हा मोठं होण्याचा एक भागच आहे.
‘स्व’ टिकवून ठेवत पीअर प्रेशर अथवा पीअर ग्रुपचा प्रभाव याचा तोल सांभाळत मोठे व्हायचे, पण कसे? आणि हे जमवायला मुलांना शिकवायचे कसे?
तुमचे मूल जर टीनएजर असेल तर त्याचे आपल्या ग्रुपकडून प्रभावित होणे अगदीच सहज आहे. पण हे अतिच होत असेल, ग्रुपमध्ये टिकून राहण्यासाठी मुले जर आपल्या नीतिमूल्यांशी तडजोड करत असतील तर पालकांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मुलांवर ग्रुपकडून प्रेशर आणला जाऊन धोकादायक गोष्टी करायला त्यांना भाग पाडले जात असेल आणि जर ते चुकीच्या गोष्टींना ‘नाही’ म्हणू शकत नसतील, तर ही चिंता अधिक वाढत जाते.
पण जर तुमचे मूल त्या ग्रुपसारखे कपडे घालत असतील, सारखेच संगीत ऐकत असतील तर मात्र ते काही असामाजिक, धोकादायक गोष्टी करत नाहीत. मुलाला जर आपल्या गटात स्वतःची मतं, मूल्ये पाळणं आवडत असतील तर त्यांच्यावर ग्रुपचा, इतरांचा प्रभाव पडण्याची शक्यता कमी असते. ते गटातील गोष्टींचे अनुकरण करतील पण इतरांचे करणार नाहीत. खरं म्हणजे पालकांचा प्रभाव मुलांच्या मूल्यांच्या बांधणीत, भविष्यात जे निर्णय घ्यायचे असतात त्यात, तसंच त्यांच्या जडणघडणीत सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो.
पालकांच्या प्रभावाने आणि स्वच्या तीव्र जाणिवेने पीअर प्रेशर आणि ग्रुपकडून येणाऱ्या प्रभावाबाबत नेमकं कुठे थांबायला हवं ही लक्ष्मणरेषा मुलांना कळायला लागते. याकरिताच प्री टीन्स आणि टीनएजर्सना हे पीअर प्रेशर आणि पीअर ग्रुपचा प्रभाव मॅनेज करण्यासाठी मदत करायला हवी.
त्यासाठी पालकांना या गोष्टी करता येतील.
१) तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवा. नकारात्मक पीअर प्रभाव सांभाळण्यासाठी आत्मविश्वास मदत करेल. जर तुमची मुलं काॅनफिडन्ट असतील तर ती स्वतःला सुरक्षित राखू शकतात. ते योग्य निर्णय घेऊ शकतात. जी परिस्थिती आणि माणसं त्यांच्यासाठी योग्य नसतात त्या गोष्टी ते टाळू शकतात. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना नवनवीन गोष्टी हाताळण्याकरिता प्रोत्साहन देऊ शकता. यामुळे कठीण परिस्थितीतही यश प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्न करतील. अवघड कामं केल्याबद्दल आपण त्यांची प्रशंसा करायला हवी हे आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तुम्हीसुद्धा आत्मविश्वास कसा वाढवावा यासाठी मुलांसमोर ‘रोल माॅडेल’ म्हणून असणे उत्तम होईल. आत्मविश्वासाची भावना निर्माण करणे ही पहिली पायरी आहे.
२) स्वतः विषयी दयाळू होणे, इतरांसारखेच स्वतःलाही मायेने वागवणे, तितक्याच काळजीने, समजून घेऊन वागवणे, स्वतःबद्दल तसा विचार करणे, सेल्फ कम्पॅशन करणे हे मुलांना जमले तर मुले पीअर ग्रुपचा प्रभाव, त्यातून येणारा ताण, चिंता सांभाळू शकतील. तुमच्याशी मुलांच्या असलेल्या एका मजबूत नात्यामुळे मुलांना वाटेल की, आपल्या आई-वडिलांचे आपल्यावर खूप प्रेम आहे.
३) मुलांशी संवादाचे मार्ग खुले राहू देत. मुलांशी जोडलेले, कनेक्टेड राहिलो तर आणि जर पीअर प्रेशरमुळे त्यांना अनकंफर्टेबल वाटले तर ती आपल्या पालकांशी मनमोकळेपणाने
बोलू शकतील.
४) ‘नाही’ म्हणण्याचे विविध प्रकार, मार्ग सुचवा.
जर तुमच्या मुलाला एखादी गोष्ट करायची नसेल आणि त्याच्यावर ते करण्याबाबत दबाव टाकला जात असेल तर ‘नाही’ कसे म्हणायचे, याला कसे तोंड द्यायचे याचे विविध मार्ग मुलांना माहीत करून द्यायला हवेत. उदाहरणार्थ पीअर ग्रुपमधील मुले जर ड्रग्ज घेण्याबाबत दबाव टाकत असतील तर नो थँक्स, माझा दमा वाढेल याने किंवा मला याचा वास आवडत नाही असे म्हणायचे हे मुलांना सांगा.
५) मुलांना हे पीअर प्रेशर हॅन्डल करण्याचे मार्ग सांगता येतील.
आपण धोकादायक परिस्थितीत सापडत आहोत, असे मुलांना वाटले तर त्यांनी तुमच्याशी कनेक्ट व्हावे आणि मदत मागावी हे मुलांना जरूर सांगा. ते त्यांच्यासाठी बॅकअप असेल. ‘कोडेड मेसेज’ मुलांबरोबर बसून ठरवून घ्या. म्हणजे मित्रांसमोर मुलांना अवघडलेपण वाटणार नाही. उदाहरणार्थ पालकांनी सांगितले की, आजोबांची तब्येत बरी नाही याचा अर्थ पालकांना आजोबांकरिता भेटायला जायचंय. तसेच मुलाने जर मदत मागितली तर त्याला पालकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. मुलांना हा विश्वास वाटायला हवा की, मी अडचणीत आलो तर पालक नक्कीच मदत करतील.
५) मुलांना सोशल नेटवर्क वाढवायला प्रोत्साहन द्या. मुलांना जर तुम्ही विविध माध्यमांतून मित्र जोडण्याची संधी दिली. उदा. स्पोर्ट्स, फॅमिली ॲक्टिव्हिटीज, क्लब्ज यातून मित्र जोडता येईल. त्यामुळे अनेक पर्याय मुलांना उपलब्ध होतील आणि पीअर प्रेशरमुळे मुले जर अडचणीत आली तरी नवे मित्र असतील ज्यातून एक सपोर्ट मिळेल. जेव्हा तुम्ही मुलांवरच्या पीअर प्रेशर आणि प्रभावामुळे काळजीत असाल तेव्हा हे करू शकता.
मुलांना मित्र करायला प्रोत्साहन दिले आणि घरात येणे-जाणे सुरू केले तर तुम्हाला मुलांचे मित्र कळतील. मग तुम्हाला हे तपासून पाहता येईल की तुमच्या मुलाचे मित्र त्याच्यावर नकारात्मक पीअर प्रेशर, प्रभाव तर टाकत नाहीत ना? हा प्रश्न मुलाला सतावत तर नाहीय ना? आपल्या मुलांचे मित्र त्याच्यावर नकारात्मक प्रभाव टाकत आहेत, असे जाणवत असल्यास अजिबात जजमेंटल न होता मुलाशी बोला, त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या.मुलांना यातून बाहेर पडायला मदत करा.तुम्ही जर मुलांच्या मित्रांबाबत खूप जास्त गुंतागुत केली, फार जास्त प्रेशर मुलांवर टाकलंत, जजमेंटल झालात तर उलटा परिणाम होऊ शकतो. मुले वारंवार त्या मुलांच्या मागे लागतील. मुलांना अशा मुलांबरोबर असतोस तेव्हा जास्त मारामारी करतोस असे म्हणण्याऐवजी तुला नवे मित्र शोधण्याची गरज आहे असे म्हणणे योग्य ठरेल. मुलांशी अशी तडजोडही करता येईल. उदाहरणार्थ त्याच्या आवडीचा हेअर कट, कपडे निवडण्याचे स्वातंत्र्य त्याला देऊ या. म्हणजे आपण पीअर ग्रुपशी कनेक्टेड आहोत याचे समाधान मुलांना मिळेल. या वयातील मुलांना ह्या कनेक्टेड राहिल्याने आपण या गटाचे घटक आहोत ही बिलाँगनेसची भावना निर्माण होते. आपल्यालाही काही किंमत आहे असे वाटते. त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. प्री टीन्स आणि टीनएजर्सना सामाजिक आणि भावनिक कौशल्य शिकण्यास जसे की इतरांचे विचार, भावना, मनःस्वास्थ्य समजून घेणे याची संधी मिळते. म्हणूनच मुलांना पीअर ग्रुपच्या वाईट प्रभावापेक्षा हे मर्यादित स्वातंत्र्य देणे आपल्याला परवडेल.
●पीअर प्रेशर आणि पीअर प्रभाव याबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज केव्हा असते?
जर तुमच्या मुलाचे मूड स्विंग्ज, वागण्यात बदल, खाण्यापिण्यात, झोपण्याच्या पॅटर्नमध्ये बदल दिसून येत असतील, तर त्याच्या मित्रांमुळे होत आहेत असं जर वाटत असेल तर मुलाशी सीरियसली बोलण्याची वेळ आली आहे असं समजा.
काही बदल हे प्री टीन्स, टीनएजर्स यांच्यात अगदी नाॅर्मल आहेत. पण हे मात्र वाॅर्निंग सिग्नल्स आहेत.
१) खराब मनोवस्था, सतत डोळे भरून येणे, निराश वाटणे.
२) आक्रमकता, असामाजिक वागणे जे तुमचा मुलगा कधीच वागत नाही.उदाहरणार्थ : मारामारी, पोलीस कम्प्लेंट, चोरी.
३) कारण नसतानाही वागण्यात अचानक होणारे बदल.
४) झोपेत विघ्न येणे, रात्री उशिरापर्यंत जागणे, लवकर जाग येणे.
५) खाणे कमी होत जाणे किंवा अति खाणे.
६) शाळेत जायला नाखूश असणे.
७) आवडत्या गोष्टींमधून स्वतःला बाहेर ठेवणे.
८) आयुष्य जगण्यात काही अर्थ नाही.गिव्ह अप करणे.
हे दिसत असेल तर मुलाशी बोला. जर तुमच्या मुलाचा मूड दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खराब असेल, तर किंवा नेहमीच्या गोष्टी तो एन्जॉय करत नसेल तर त्यांना मानसिक आरोग्य परत मिळवण्यासाठी नक्कीच मदतीची
गरज आहे.