कथा – प्रा. देवबा पाटील
एक दिवस रात्री झोपताना जयश्रीने तिच्या आईला विचारले, “झोपेत आपणास स्वप्ने कशी पडतात गं आई? सकाळी पडलेले स्वप्न खरे घडते म्हणे.”
“मनी वसे ते स्वप्नी दिसे.” आईच्या आधी तिचे बाबाच बोलले, “बेटा, माणसाच्या मनाचे बहिर्मन व अंतर्मन असे दोन भाग असतात. बहिर्मनाला बाह्यमन किंवा व्यक्त मन असेही म्हणतात, तर व अंतर्मनाला सुप्तमन किंवा अव्यक्त मन असेही म्हणतात. झोपताना बहिर्मन हे झोपते म्हणजे आराम करते त्यामुळे त्याचे कार्य तात्पुरते थांबते. पण अंतर्मन हे जागेच असते व ते सक्रिय असते. अंतर्मन जास्त क्रियाशील झाल्यास गाढ झोप न लागता ते अस्वस्थ राहते व झोपेत स्वप्ने पडतात. आपण दिवसा जे काय पाहतो, ऐकतो, काही बोलतो, मनात ज्यावर काही विचार करतो, ते आपल्या मनात विशेषकरून अंतर्मनात तसेच राहते व तेच आपणास रात्री झोपेत स्वप्नात दिसते. आपल्या काही गोष्टी दिवसा करायच्या राहून जातात, काही अगोदरच्या, काही दिवसांपूर्वीच्या, महिन्यांपूर्वीच्या अपूर्ण राहिलेल्या असतात. ह्या गोष्टी आपल्या अंतर्मनात कायम राहिलेल्या असतात. त्या आपल्याला स्वप्नात दिसतात व बऱ्याचदा पूर्णही होतात नि आपण आनंदित होतो. पण पहाटेचे स्वप्न खरे ठरते वा स्वप्न भविष्यसूचक असते याला काहीच शास्त्रीय आधार नाही. तसेच स्वप्नांचा शकून अपशकुनांशीही काहीच संबंध नाही. ती एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे.”
“बाबा, तुम्ही म्हणाले की, “मनी वसे ते स्वप्नी दिसे.” पण काही माणसे झोपेत बोलतात, तर काही माणसे झोपेत चालतातसुद्धा असे आपण बऱ्याचदा
ऐकतो. हे कसे घडत असेल मग?”
जयश्रीने विचारले.
बाबा सांगू लागले, “जयू ताई, शरीराच्या ज्या क्रियांवर किंवा हालचालींवर आपल्या मनाचा ताबा असतो त्यांची आपणास जाणीव होत असते; परंतु काही शारीरिक क्रिया या आपोआपच घडत असतात. जसे श्वासोच्छ्वास करणे, उभे राहणे, चालणे अशा काही क्रिया या आपल्या शरीराकडून इतक्या सहजगत्या व आपोआप होत असतात की, त्यांची आपणास जाणीव सुद्धा होत नाही, त्याविषयी आपणास काहीच कळत सुद्धा नाही. आपल्या जागृतावस्थेत चालण्या-बोलण्याच्या क्रिया या सतत व सहजगत्या होणाऱ्या असल्याने आपल्या खूप अंगवळणी पडलेल्या असतात. त्या आपसूकच घडतात, त्यांच्यासाठी स्वतंत्र वेगळे असे काहीच प्रयत्न करावे लागत नाहीत; परंतु कधी कधी मात्र या क्रिया काही माणसांकडून झोपेतही होत असतात. त्याचे कारण असे आहे की, कधी कधी मानसिक अस्वस्थतेमुळे माणसाचा मेंदू व शरीरही अर्धवटच झोपतात. म्हणजे कधी कधी मनाच्या बैचेनीमुळे शरीराचे अवयव अर्धजागृतावस्थेत असतात.”
“मी तुला थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे झोपेत जरी माणसाचे बाह्यमन झोपते तरी आतील सुप्तमन जागृत असल्यामुळे माणसाला झोपेत स्वप्ने पडतात. स्वप्नांतील प्रसंगांमध्ये जर बोलण्याची किंवा चालण्याची कृती असली, तर ह्या अंतर्मनाच्या आदेशानुसार शरीराचे ते संबंधित अवयव ते काम करतात. म्हणूनच काही जण झोपेत बोलतात, तर काही चालतात सुद्धा; परंतु या गोष्टीची बहिर्मनाला कल्पना नसते कारण ते झोपलेले असते. त्यामुळे त्या लोकांना जागे झाल्यावर झोपेत केलेल्या कृतीची आठवण राहत नाही. संमोहनामध्ये सुद्धा अंतर्मनाला सूचना देऊनच संमोहित व्यक्तीकडून काही कार्य करून घेतले जाते म्हणून संमोहनातून बाहेर आल्यावर त्या व्यक्तीला तिने केलेल्या कामाची आठवण राहत नाही. म्हणूनच संमोहन करणाऱ्या व्यक्तीच्या दहा हात दूरच राहावे.”
“अजबच आहे बाबा मनाचे हे कार्य.” जयश्री उद्गारली.
“हो बेटा, म्हणूनच म्हणतात की कुणाच्या मनाचा थांग लागणे फार कठीण असते. असो. कुणाच्या मनाचा थांग शोधत बसण्यापेक्षा आपल्या मनाला उचित वळण लावणे व आपले जीवन घडविणेच योग्य असते. आईने तसे तुझ्या मनाला चांगले वळण लावलेलेच आहे. आता तुझे जीवन घडविणे तुझ्याच हातात आहे. ताई, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपले व्यायाम, पूजा-प्रार्थना, वाचन व कर्तव्य, या चौरंगी गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. जे या चार गोष्टींचे जीवनात दररोज नियमितपणे पालन करतात त्यांचे जीवन चौफेर यशस्वी होत त्यांच्या आयुष्याला आरोग्य, बुद्धिमत्ता, मनोबल व साफल्य असे चार चंद्र लागतात. तू सुद्धा आईप्रमाणे चांगली पुस्तके वाचनाची सवय लाव. वाचनाने बुद्धीचा विकास होतो.
कष्ट करणे हे जसे प्रत्येकाचे कर्तव्य असते तसे अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य असते. आपापल्या कर्तव्यानेच जीवनाची खूप प्रगती होते. दररोज सकाळी अर्धा तास केलेल्या व्यायामाने व संध्याकाळच्या अर्ध्या तासाच्या खेळाने शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते. रोजच्या नियमित पूजेने मनाचे सामर्थ्य वाढते व इच्छाशक्ती प्रबळ होते. जीवनभर बाळा हे माझे शब्द लक्षात ठेव नि आचरणात आण. तू होतकरू, अभ्यासू, हुशार व कर्तृत्ववान आहेस हे आम्हाला दिसत आहेच. ईश्वर तुला नेहमी तुझ्या ‘जयश्री’ नावाप्रमाणे सदैव विजयीच करेल ‘श्री’ची म्हणजे लक्ष्मीची कृपा सदैव तुझ्यावर राहील असा आमचा दोघांचाही तुला आशीर्वाद आहे. चला, आता. उद्याच्या उज्ज्वल दिवसासाठी आपण आता शांततेने झोपू या.” तिचे बाबा म्हणाले व तिघेही झोपण्यासाठी आपापल्या अंथरुणावर गेले.