मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
जीवन ही अशी गोष्ट आहे की, प्रत्येकाची कथा, व्यथा वेगळी. तरी त्यात ऊन, सावलीसारखा आनंद येतो. मनात झिरपून जातो.
‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ असे जगद्गुरू तुकोबा महाराज म्हणतात, खरंच आहे! ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ हे आनंदाचे झाड आपण आपल्या अंगणात लावले की, त्याचा सडा दुसऱ्याच्या अंगणात निश्चितच पडतो. जसे आपल्या हातांनी कुणाला सुगंधी फुले दिली तर त्याचा सुगंध आयुष्यभर आपल्या हाताला राहतो. तसेच आनंदाच्या वाटा म्हणजे रस्ता, मार्ग, पथ. वाटा म्हणजे वाटणेही होईल. हा आनंद वाटायचा असतो असाही त्याचा एक अर्थ होतो. आनंद दिल्याने वाढतो असे आपण सर्वांनीच अनुभवले असेलच. उदा. रस्ता क्रॉस करताना एखाद्या अंध, अपंग व्यक्तीला आपण रस्ता ओलांडताना सहकार्याचा मायेचा हात दिला. तर नक्कीच त्याचाही आणि आपला आनंद द्विगुणित होईल.
तसेच आहे दिव्यांग, वृद्ध, अंध, अपंग, अबाल दिन दुर्बल निराधार केंद्रात आपण भेट दिली आणि त्यांचे दुःख जाणून घेतले तर निश्चितच तेही क्षणभर का होईना आनंदी होतात. त्यांच्या जीवनामध्ये आपण चैतन्य आणू शकतो. हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडताना पाहून आपलाही आनंद वाढत जातो. भली दांडगी आपण दोन हात, दोन पाय असलेली माणसं. नीट चालता बोलता येत असतानाही आपली कामं करताना कुचराई करतो. आपली नकारक घंटा सतत चालूच असते. माझे असेच, माझे तसेच रडगाणं. नेमका फोकस कशावर करावा? हे हातून निसटून जाते आणि वेळ काही कोणासाठी थांबत नाही. ती गेलेली वेळ पुन्हा मिळतही नाही. आयुष्याच्या चित्रपटाला जसे वन्समोर नाही. तसेच आहे हातातून निसटून गेलेल्या क्षणांना सुद्धा वन्समोर नाही. मग अशावेळी एक-दोन मिनिट शांत डोळे मिटून स्वतःला विचारा! अरे हीच माणसे आहेत त्यांना आपली गरज आहे. महिन्यातून एक-दोन तास त्यांच्यासाठी आठवड्यातून त्यांच्यासाठी भेट द्या. त्यांच्याशी खेळा, गप्पा मारा, वाचा, संगीत, गाणी, योगा, भजनी मंडळ घेऊन त्यांच्याकडे गायन पार्टी करा. त्यांना आवडी-निवडीचा खाऊ, जेवण, नाश्ता, फळे, औषधे, अन्न, वस्त्र द्या. अर्थातच हे सारे देत असताना आपापल्या ऐपती, कुवतीप्रमाणे आपण फूल न फुलाची पाकळी देत राहा. सूर्य होता आले नाही तरी सूर्यफूल व्हावे.
सूर्य होता आले नाही तरी एखादं काजवा मिणमिणता दिवा बना. त्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करा. त्यांना जे जे देता येईल तितके भरभरून दान करण्याची आपल्यात सवय आली की आपलाही आनंद वाढतच जातो. तोच आनंद त्यांना जगायला लावतो. नवी दिशा मिळते. आशेची नवी पालवी फुटते. नवी उमेद आणि नवी वाट देतो. हीच आहे आनंदाच्या वाटा त्यातली पहिली पायरी! दुसरी पायरी आहे की, त्यांच्यासाठी जास्तीत जास्त त्यांच्या जीवनामध्ये अामूलाग्र परिवर्तन आणून चांगले परिणाम करण्यासाठी उद्युक्त होणे. उपक्रम आयोजित करणे, जीवन उपयोगी, गृहपयोगी काही सामान वाटप करणे. त्याचप्रमाणे त्यांची छोटीशी सहल आयोजित करणे. त्या सदस्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून ते साजरे करणे. त्या निराधार आश्रमाच्या वतीने संमतीने साजरी करावे. त्यांच्यासाठी यथोचित कार्य करणे, आपल्या शैक्षणिक त्यांना ध्यानस्थ बसण्यासाठीची जागा निर्माण करणे, त्यांच्यासाठी खेळाचे, मनोरंजनाचे, विरंगुळ्याचे साहित्य देणे, छोट्याशा स्पर्धा भरवून त्यांना मनोरंजन वाटेल अशी प्रोत्साहनपर बक्षिसे, पारितोषिक, गुणगौरव आयोजित करणे. परिवार व घरापासून दूर असलेल्या या दु:खीजनांस आपल्यात सामावून घेणे. यालाच “आनंद वाटा” म्हणावे.
“ जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले” या संत उक्तीप्रमाणे. आपण माणूस म्हणून नि:स्वार्थी, निरपेक्ष, सत्कार्य करावे. हा आनंदाचा मार्ग सगळ्यांना सुखाच्या सर्वोच्च स्थानी घेऊन जातो. काय मंडळी घ्याल ना शोध? आपल्या आजूबाजूच्यांच्या आयुष्यात अंधार आहे त्यांचा. त्यांच्यासाठी पसायदान होऊन जगा. दूरीतांचे तिमिर जावो… त्यांच्यावर स्नेहाचा, मायेचा वर्षाव झाला तरच जगण्याचे बळ त्यांना प्राप्त होईल आणि मनाची शक्ती येईल, मनोबल वाढेल, धैर्य वाढेल. दुःखी कष्टी परिवारातून दूर अशा या एकटेपणावर किंवा एकाकी आयुष्यावर फुंकर मारून त्यांचे दुःख कमी करा. तो देताना थोडासा जरी आनंद आपल्या वाट्याला आला तर बघा! एक सहवास, विश्वास, परोपकार आणि सेवा हाच आहे
जीवन प्रवास.