नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड
तू त्या शेखरच्या फार पुढे पुढे करतेस.” नवरा रागे रागे म्हणाला.
“हो. करते.”
“मला ते बिलकुल आवडत नाही.” तो कुरकुरला.
“मला तसं करावं लागतं.”
“अगं पण का?”
“कारण तुम्हीच आहात.”
“मी?”
“हो. तुम्ही !”
“मी कसा काय कारण बुवा?”
“धड नोकरी करीत नाही.”
“मी करतो गं.”
“पण कुणाशी पटवून घेता येत नाही.”
“मला संताप आवरत नाही ना!”
“ हेच तर नडतं ना !”
“अगं पण!”
“शेखर आपल्यात राहतात.”
“तीच मोठी चूक झालीय माझ्या हातून.”
“कशी काय?”
“अगं किती घसटून चालतो तो.”
“पण मी किती घसरते, ते सांगा.”
“तसा तू फाजीलपणा करीत नाहीस म्हणा.” त्याने कबूल केले.
“मग झालं तर ! माझं मन साफ आहे.” “तिचा स्वर स्वच्छ होता.”
शेखर खरे तर तिच्या नवऱ्याचा मित्र होता. ही जागा शेखरचीच होती त्याने मोठ्या मनाने मित्राला आपल्या घरात सामावून घेतले होते. खरे तर भाडे बिडे न देता ती आणि तिचा नवरा दोघे खुशाल मुक्त राहत होते. तिच्या नवऱ्याला संतापी स्वभावाने कुठली नोकरी धड टिकवता येत नव्हती. नुसती हुशारी असून चालत नाही. संयम हवा. उलट उत्तरं देऊ नयेत. बॉस कसा सहन करेल?
“काय समजतोस तू स्वत:ला? अरे, तुझ्यापेक्षा मी कितीतरी हुशार आहे. डिस्टिक्शनमध्ये पदव्युत्तर पदवी आहे मिळविली मी. थर्डक्लास तू!” असे कोणते बोल बॉस सहन करेल हो?
मग गच्छंती ! नोकरी गमावणे ! हे वारंवार घडू लागले होते.
पण ती शहाणी होती. “ मी नोकरी करते.” ती नवऱ्यास म्हणाली
“नको. लोक काय म्हणतील? मला नाकर्ता समजतील.”
“लोक काय ? अशीही नावं ठेवतातच. लोक हसतील. यवढंच ना?”
“हो. हसतील लोक.”
“हसतील त्याचे दात दिसतील, असं आपण लहानपणी म्हणायचो, खरं ना?”
“आठवतं.”
“बॉस रागवला, तर सरळ दुर्लक्ष करा.”
“असा कसा दुर्लक्ष करू?”
“तुमच्या मनाला त्रास होतो ना?”
“हो. खूप होतो.” … “म्हणून म्हणते, कान बंद करा.”
“तू कुठून कुठे आलीस गं?”
“कुठून कुठे आले मी?” तिने सरळपणे विचारले.
“विषय काय चालला होता? अं? तू नोकरी करण्याचा.”
“काय चुकलं त्यात? जगातल्या पाऊणवाट बायका नोकऱ्या करतात.”
“पण मला त्यात कमीपणा वाटतो. मी कुठे तरी कमी पडतो, म्हणून बायकोला नोकरी करावी लागते, ही अपराधीपणाची भावना मनभर दाटून येते.”
“ हा तुमचा गैरसमज आहे. तो मनातून काढून टाका.” “असं कसं?”
“हो असंच.” तिनं नवऱ्याच्या गळ्यात हात टाकले. गालावर ओठ टेकले, तसा तो विरघळला.
“तू म्हणजे अशी आहेस ना !”
“तुम्ही पण असे अगदी वेडे आहात.”
“शेखर बद्दल संशय घेतलांत.”
“तो वागतोच तसा !” “माझ्या मनात पाप नाही अजिबात.”
“अगं पण त्याच्या मनांच काय? त्याच्या मनात पाप असलं तर ?
मी कसं सहन करू?”
“हे बघा, मी तुमचं मंगळसूत्र गळ्यात घातलं आहे. त्या काळ्या मण्यांशी माझं जीवन जोडलंय मी. उद्या त्याने अंतर कमी केले, तर एकाची दोन तोंड करीन मी त्यांची.” तिचा चेहरा इतका तेजस्वी दिसत होता की तो गप्पच झाला.