Monday, February 10, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकशापोटी, प्रेमापोटी...

कशापोटी, प्रेमापोटी…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

मागून आवाज येतो… दोन घास खाऊन जावं बाहेर जाताना… खरंच… असं प्रेम करणारं, हक्क दाखवणारं कोणीतरी नक्कीच असावं प्रत्येकाच्या आयुष्यात!!

या दोन घासात एका ऊर्जा असते दिवसभर काम करण्याची…. तन आणि मन शांत ठेवण्याची!!
दोन घास स्वतःच्या व कुटुंबाच्या पोटात पडण्यासाठी मेहनत करावी लागते, तेव्हा कुठे मिळतात…
लहानपणी बाळाला चिऊ काऊची गोष्ट सांगत भरवलेल्या दोन घासांची उतराई कधीच होऊ शकत नाही… मोठं झाल्यावर सुद्धा आईच्या हातचे दोन घास खायला जीव व्याकुळ असतो नेहमीच… ही आनंदाची पुंजी आयुष्यभर जपावी!
मजुरी करणारी माय दिवसभर रक्ताचं पाणी करते… झोका आभाळी टांगला… परिस्थिती त्या बाळाची दोन घासाची भूक भागवते, तेव्हा तिच्या पोटात दोन घासाची भूकही शिल्लक राहात नाही.

घरी येणाऱ्या पाहुण्याला “अतिथी देवो भव’’ म्हणत दोन घास तरी खाऊनच जा असा प्रेमळ आग्रह करत तृप्त करून पाठवायचं… ही आपली संस्कृती! पाठीला पोट लागलेल्या व्यक्तीला दोन घास खायला देण्याइतकं समाधान नाही… त्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं यासारखं सुदैव नाही!

कोणी आजारी असेल त्यास जरी प्रेमाने दोन घास भरवले तर औषधा इतकेच सकारात्मक परिणाम दिसतात, तसेच म्हातारपणी देखील प्रेमाने दोन घास भरविणाऱ्या हातांची गरज असते… कष्ट केलेल्या देहाला आराम व समाधान मिळविण्यासाठी!

अनाथाश्रम व वृद्धाश्रम येथे प्रेमाने दोन घास भरवणाऱ्यांचे कर्म फार महान असते… त्यांना खरंच मनापासून सलाम!!
आईच्या हातचे ऊन ऊन घास मिळविण्यासाठी माहेरवाशीणीचा जीव नेहमीच आसुसून जातो…
माहेरपणाला आलेल्या लेकीला मग दोन घास जरा जास्तच जातात… तन मन सुखावतं तिचं… मायच्या ममतेनं!!
चिमणी पिल्लांना चोचीने दोन घास भरवते हे बघताना मन सुखावतं…
घासातला घास द्यावा तो…
“ मायनंच’’…!!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -