Friday, December 12, 2025

Bangladesh : आसाममधील हॉटेल्समध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी

Bangladesh : आसाममधील हॉटेल्समध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी

आसाम : बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारतात अनेक ठिकाणी निषेध केला जात आहे. यातच आता, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले जोवर बंद होत नाहीत, तोवर कोणत्याही बांगलादेशी नागरिकाला आपण आपल्या सेवा देणार नाही, अशी घोषणा आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल्सनी घेतली आहे.

या जिल्ह्यांतील हॉटेल्समध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी 

आसाममधील बराक खोऱ्यातील कछार, श्रीभूमी (पूर्वीचे करीमगंज) आणि हायलाकांडी (Hailakandi) या ३ जिल्ह्यांमध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बराक व्हॅली हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबुल राय शुक्रवारी (6 डिसेंबर 2024) पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या परिस्थितीत जोवर सुधार होत नाही आणि हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोवर आम्ही शेजारील देशाच्या कोणत्याही नागरिकाला बराक खोऱ्यातील ३ जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे ठेवणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. हा आमचा निषेध व्यक्त करण्याचा मार्ग आहे.”

हिंदूंवरील अत्याचाराचा विरोध 

पुढे ते म्हणाले, “देशात पुन्हा एकदा स्थिरता परत येईल, यासाठी बांगलादेशातील नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत. परिस्थितीत सुधारणा झाली, तरच आम्ही आमच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो." गेल्या काही दिवसांपूर्वी, बजरंग दलाने सिलचर येथे आयोजित जागतिक प्रदर्शनाच्या आयोजकांना शेजारील देशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बांगलादेशी उत्पादनांची विक्री करणारे २ स्टॉल बंद करण्यास सांगितले होते आणि त्यांची मागणी मान्य करण्यात आली होती.

या शिवाय, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघही (RSS) १० डिसेंबर २०२४ रोजी दिल्लीच्या सिव्हिल सोसायटीच्या बॅनरखाली बांगलादेश दूतावासावर मोर्चा काढणार असल्याचे वृत्त आहे.

Comments
Add Comment