युवराज अवसरमल
सानिका मोजर ही नवोदित अभिनेत्री सध्या खूप चर्चेत आहे. ‘लय आवडतेस तू मला’ या कलर्स वाहिनीवरील तिची भूमिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. सानिकाचा जन्म मुंबईतील परळचा, शाळा दादरची आय. ई. एस. हायस्कूल (पोर्तुगीज चर्च मागील). तिचे सार बालपण दादर, परळ, प्रभादेवी येथे गेले. शाळेत अगदी ज्युनिअर, सीनिअरला असल्यापासून तिने सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर रुईया कॉलेजमधून तिने विज्ञान शाखेत पदवी (मायक्रोबायलॉजी) प्राप्त केली. ती भरतनाट्यम नृत्य शिकली. कॉलेजमधील डान्स इव्हेंट तिने अटेंड केला. ती लहानपणापासून अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहत होती. लहानपणी तिने ॲक्सिस बँकेची जाहिरात केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाची जाहिरात केली. गॉड नोज नावाची एक शॉर्टफिल्म देखील तिने केली होती. ती फिल्म फेस्टिवलला गेली होती. पॉकेटमनी नावाचा एक चित्रपट तिने केला होता.
तिने मॉडेलिंग देखील केले. गौरी- गणपती विसर्जन होते. त्यादिवशी तिने ऑडिशन करून पाठविले. दुसऱ्या दिवशी तिला ऑफिसला बोलावले गेले, लूक टेस्ट झाली. परत ऑडिशन झाले आणि तिला ‘लय आवडतेस तू मला’ ही मालिका मिळाली. या मालिकेतील भूमिकेविषयी विचारले असता ती म्हणाली की, या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेचे नाव सानिका आहे. ती साताऱ्याची दाखविली आहे. तिला तिच्या वडिलांविषयी खूप प्रेम असते. त्यांच्यासाठी ती काहीही करायला तयार असते. तिची मोठी बहीण असते, तीच दुसऱ्या गावातील मुलाशी प्रेम असते; परंतु दोन्ही गावांतील भांडणामुळे ती आत्महत्या करते. या गोष्टीची खंत तिच्या मनामध्ये सतत असते. ती स्टेट लेव्हलची ॲथलिट आहे. महत्त्वाकांशी आहे. तिचे ध्येय ठरलेले आहे. तिला वडिलांच्या नजरेमध्ये मोठे व्हायचे आहे. तिच्यासाठी कुटुंब फार महत्त्वाचे आहे. पुढे ती सरकारला निवडणार का ? जो तिच्या विरुद्ध गावातील आहे.
वडिलांना निवडणार का? दोन्ही गावातील तिरस्कार कमी होणार का ? ती दोन्ही गावे एकत्र येणार का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. ही मालिका सुरू झाल्यानंतर तिला प्रेक्षकांच्या कोणत्या प्रतिक्रिया मिळाल्या असे विचारले असता ती म्हणाली की, काही जण म्हणतात तुझे डोळे खूप सुंदर आहेत. तुझा अभिनय खूप छान आहे. तू दिसतेस खूप छान. तू महाराष्ट्राची नवीन क्रश आहेस. मालिका खूप छान आहे. गोष्ट खूप छान आहे. मालिकेत पात्रांची निवड खूप छान केलेली आहे. मालिकेतील तुझी आई खरोखर तुझी आई आहे का? तुम्ही खरोखरच माय-लेकी आहात का? एकूणच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. सानिकाला नृत्य करायला खूप आवडते, चित्र काढायला आवडते. हल्ली तिला रिल बनविण्याचा छंद निर्माण झाला आहे. सानिकाला भविष्यातील वाटचालींसाठी हार्दिक शुभेच्छा!