महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. भाजपाकडून सर्वप्रथम मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांचाच हक्क होता. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात भाजपाचे नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. भाजपामध्ये महाराष्ट्रात अनेक नेते आहेत, पण ते त्या त्या जातीपुरते, समाजापुरते, भागापुरते, मतदारसंघापुरते मर्यादित असलेले नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकदा नव्हे तर अनेकदा भाजपा पक्षसंघटना बांधणीच्या निमित्ताने, मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार सांभाळण्याच्या माध्यमातून अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जीवनपट संघर्षातूनच उभारी घेतलेला आहे. आरएसएसचा एक मर्यादाशील, संयमशील, विनयशील, बुद्धिवान व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व असलेला कार्यकर्ता अशी देवेंद्र फडणवीस यांचा संघ परिवारात गेल्या अनेक वर्षांपासून परिचय आहे. भाजपामध्ये गोपीनाथ मुंडे हे जसे तळागाळातून सर्वोच्च स्थानी विराजमान झालेले नेतृत्व होते, तशीच काहीशी वाटचाल ही देवेंद्र फडणवीसांची झालेली आहे. नगरसेवक, महापौर, आमदार ते मुख्यमंत्री अशी राजकीय वाटचाल फडणवीसांची राहिली असून पक्षसंघटनेतही सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रदेश अध्यक्ष अशी वाटचाल फडणवीस यांनी केलेली आहे. ऑक्टोबर १९९९ साली झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार म्हणून सर्वप्रथम निवडून आले आहेत. त्यानंतर सलग सहा वेळा ते आमदार म्हणून सभागृहात आले आहेत. आमदार, गटनेता, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी त्यांची वाटचाल राहिलेली आहे.
महाराष्ट्र राज्याचे ते २१ वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले असले तरी फारच कमी मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास मिळालेली आहेत. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा नंबर लागतो. एक कडवट हिंदुत्ववादी अशी त्यांची प्रतिमा असून काळ अनुकूल असो वा प्रतिकूल, सत्तेसाठी, पदासाठी त्यांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड न केल्याने एक हिंदू नेता अशी राज्यात त्यांची प्रतिमा आहे. सहा वेळा आमदार बनलेले देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. मतदान २० नोव्हेंबरला, मतमोजणी २३ नोव्हेंबरला झाली. २५ नोव्हेंबरला सभागृहाची मुदत संपत आली होती. महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही सरकार बनविण्यास तसेच मुख्यमंत्री ठरविण्यास होत असलेला विलंब पाहून महाराष्ट्राच्या राजकीय चावडीवर निरर्थक गप्पांना पर्यायाने अफवांना उधाण आले होते. पण आता मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडून त्यांनी शपथविधी घेतल्याने सर्व अफवांना, चर्चांना पूर्णविराम मिळाला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री झाल्याने या तीन नेत्यांमुळे महायुती आता सत्तेवर विराजमान झाली आहे. शपथविधी घेताच कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या तासाभरात मंत्रिमंडळाची बैठक घेत आपले सरकार हे आगामी पाच वर्षांत केवळ कागदोपत्रीच नाही तर प्रत्यक्षातही गतीमान सरकार राहणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले.
मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री झाल्यावर तातडीने आरोग्य मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या फडणवीस यांनी आगामी काळातही महाराष्ट्रीय जनतेच्या आरोग्यासाठी सरकार हात आखडता घेणार नसल्याचे संकेत फडणवीस यांनी आपल्या कृतीतून दिले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची निवड झाली असली तरी मंत्रिमंडळ ठरविताना, मंत्रीपदाचे वाटप करताना, खात्यांचे वाटप करताना, मंत्री निवडताना महायुतीच्या तीनही मातब्बरांना अग्निदिव्याचा सामना करावा लागणार आहे. मागील सभागृहात भाजपाचे जवळपास १०५ आमदार असतानाही अनेकांना मंत्रीपद मिळाले नव्हते. त्यातच एकनाथ शिंदे व अजित पवारांकडून चांगल्या खात्यावर दावा केला जात असल्याने मंत्रीपद मिळाले तरी मनासारखे खाते मिळेल का, असा सूर भाजपाच्या आमदारांकडून आळविला जात आहे. त्यातच भाजपा आमदारांची व त्यांना समर्थंन देणाऱ्या आमदारांची संख्या १३७ आहे.
मागील सरकारमध्ये भाजपाच्या अनेकांना मंत्रीपद मिळाले नव्हते. तोच प्रकार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्येही आहे. मागील मंत्रिमंडळात शिंदेंच्या सहकाऱ्यांनाही मंत्रीपदापासून इच्छा असूनही लांबच राहावे लागले होते. तोच प्रकार अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्येही सुरू आहे. महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. कोणाला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचे आणि कोणाला डावलायचे, हा विषय महायुतीसाठी त्रासदायी विषय बनणार आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिदे, अजित पवार हे मुत्सद्दी व मुरब्बी नेते असल्याने त्यांना मंत्रिमंडळ ठरविताना फारशा अडचणी येवू नयेत. महायुतीचे संख्याबळ २३५ असल्याने विधानसभेत कारभार हाकताना फडणवीस सरकारला फारशा अडचणी येणार नाहीत. जनतेच्या फडणवीस सरकारकडून फार मोठ्या आशा-अपेक्षा आहेत. त्यामुळेच विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर मतपेटीतून भरभरुन प्रेम केले आहे, याची त्यांना जाणिव आहे. लाडक्या बहीणींना दर महिन्याला आर्थिक मदत, बळीराजाच्या समस्या निवारणासाठी पुढाकार, बेरोजगारी निर्मूलन, कंपन्या-कारखान्यांचे, उद्योगांची वाढती संख्या ही सर्व आव्हाने आ वासून राज्यापुढे आहेत. त्याचे निवारण फडणवीस सरकारला करावे लागणार आहे. अर्थात फडणवीस, शिंदे, पवार हे नेते यातून मार्ग काढून महाराष्ट्राला पुढे नेतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.