भालचंद्र कुबल
दशावतार या लोककलेशी निगडीत आजमितीला बरीच माहिती उपलब्ध आहे. या लोककलाप्रकारावर बरेच संशोधन सुरू असल्यामुळे किंवा त्यातील विषयानुरूप संशोधन झाल्यामुळे निदान ही लोककला महाराष्ट्रात ज्ञात तरी आहे; परंतु त्या ज्ञात असण्यालाही काही मर्यादा आहेत. नवी पिढी या लोककलाप्रकारात स्वतःचे योगदान देऊन हा वारसा जपण्याच्या दृष्टीने पावले टाकील तेव्हा दशावतारी नाटकांना चांगले दिवस येतील, असा आशावाद बाळगण्यास हरकत नाही. मागील तीन लेखांमध्ये सामान्यजनांना समजेल अशी दशावताराबाबतची माहिती व महती सांगणारे लेख प्रकाशित केले होते. त्याच मालिकेतला हा अजून एक लेख. यातील माहिती वजा अनुभव खरे तर एकामागोमाग एक अशा चढत्या क्रमाने यायला हवे होते; परंतु या लेखांचे नियोजन तसे अस्ताव्यस्त असल्याने हिच लेखमाला पुनर्मुद्रीत करायची झाल्यास त्याचे योग्य संपादन करावे लागेल.
भारतात नाटक हा पाचवा वेद मानला जातो. इंद्र हा देवांचा राजा. नेहमीची नृत्ये पाहून इंद्रादी देवांना कंटाळा आला आणि त्यांनी भरतमुनींना नृत्याशिवाय वेगळा करमणुकीचा प्रकार निर्माण करावा अशी विनंती केली आणि त्या विनंतीस मान देऊन भरतमुनींनी ज्या लोककलेची निर्मिती केली त्याला ‘नाट्य’असे म्हणतात. ॠग्वेदातून ‘भाष्य’ अथर्ववेदातून ‘भावविशेष’ यजुर्वेदातून ‘कथा’ आणि सामवेदातून ‘गायन’ घेऊन त्या सर्वांचा एकत्रित तयार झाला तो ‘नाट्यवेद’. यानंतर पुढे नाट्यकलेत प्रगती होत गेली. भास, अश्वघोष, कालिदास, भवभूती, हर्ष, पाणिनी, दंडिन, व्यास यासारख्या महान नाटककारांनी नाट्यकलेला अधिकाधिक समृद्ध केले. दक्षिण कोकणात नाटक हा करमणूक प्रधान मनोरंजन प्रकार वाढीला किंवा जोपासला किंवा प्रसारीत होण्यास कारणीभूत ठरला, तो दशावतार हा लोककलाप्रकार. महाराष्ट्रात केवळ आणि केवळ तळ कोकणाने नाटक जपले व संवर्धित केले, त्यालाही जबाबदार कोकणातल्या प्रत्येक मनात रुजलेला दशावतार हा नाट्य प्रकार. या नाट्यप्रकाराबाबत मूलभूत माहिती मी वाचकांसमोर ठेवली असली तरी तांत्रिक बाबींबाबत मी फारसे भाष्य केलेले नाही. त्यातील महत्त्वाचे अंग म्हणजे संगीत. दशावतार नाटकात संगीत, गीतगायनाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. दशावतारी नाटकामध्ये त्यातील सगळे कलाकार मिळून गीतांची, पदांची रचना करतात.
संपूर्ण नाटक हे हार्मोनियम आणि झांज यावर अवलंबून असते. सोबतच विविध पात्रांच्या प्रवेशावेळी झांज आणि हार्मोनियम यांच्या एकत्रित वादनातून उत्कृष्ट पार्श्वसंगीताची निर्मिती केली जाते. याबाबत दशावतारी कंपनीला अनेक वर्षे हार्मोनियमची साथ करणारे माधवराव गावकर सांगतात, ‘पूर्वी दशावतारी गायक नट प्रसंगानुरूप स्वतः गाणी तयार करून म्हणत असत; पण अलीकडे सुशिक्षित कलावंतांचा भरणा दशावतारी कंपनीत झाल्यामुळे लोकांना आवडणारी चित्रपटगीते, नाट्यगीते दशावतारात गाऊ लागले. लढाईचा पारंपरिक नाच मागे पडत असून, त्याची जागा आधुनिक नृत्याने घेतली. त्यामुळे दशावतार टीकेचा विषय होऊ लागला आहे. हल्लीच मी अनेक मराठी सिरीयल्सच्या शिर्षकगीतांचाही भरणा झाल्याचे ऐकतो आहे. “माझा होशिल का?”, आभाळमाया, जुळुनी येती रेशीमगाठी, तुझ्यात जीव रंगला आदी मालिकांची शिर्षकगीते दशावतारी नाटकांत सुपर हिट ठरली आहेत.
पारंपरिक दशावतारी नाटकांतील संवाद अथवा स्वगते काही उदाहरणा तथा नमुन्यादाखल :
नमुना क्रमांक १ :
‘या या अवंतीपुरात पाऊल टाकताच मनाला किती सौख्य व समाधान होत आहे, केव्हापासून महालात बसून महाराजांची वाट पाहते आहे. पण त्यांचं का बरं येणं होत नाही ?. आम्हां आर्य स्त्रियांना पतीवाचून गती नाही’
ही वाक्ये एखादा स्त्रीपार्टी, कुठल्याही उत्तररंगातील आख्यानात घेताना आढळेल.
नमुना क्रमांक २ :
‘आव्स हेची खेल्लोरी, बापूस झट्याळो।
बहीण ना ह्याका, भाऊस षड्याळो
फाड्फाड्या कानाचो, एक दिस्ता सुळो
लाडवांच्या खाणाक्, मोदकांच्या खाणाक्
भारी हुळहुळो ।।
थय थय नाचता, पोरगो शिवल्याचो
बसाक दिलो ह्याका राजा उंदराचो
मोरया म्हणा हो …मोरया …’
अशा प्रकारच्या मालवणी भाषेतील गणेशस्तुती आणि आरतीसुद्धा या दशावतारी नाटकात रंग भरते. सर्व कलाकार, संगीत गायक, वादक व इतर सर्व असे मिळून साधारण वीस ते पंचवीस जणांचा गट असतो. सर्व कलाकार नाटक ही सामूहिक जबाबदारी कर्तव्यासारखी पार पाडत असतात. कलाकार मंडळी स्वतःच्या नाटक कंपनीसाठी कोणत्याही प्रकारचे काम करायला तत्पर असतात. ते स्वतःचे जेवण बनवण्यापासून, स्वतःचे सामान डोक्यावर उचलून नेणे ते नाटकासाठीचे संवाद तयार करणे, त्याचा सराव, दिग्दर्शन ते अगदी स्वतःच मेकअप करेपर्यंत सर्व कामे हे कलाकार स्वतःच पार पाडतात. कारण मागच्या लेखात उल्लेखिल्याप्रमाणे या नाट्यास संहिता नाही म्हणून या नाट्यास दिग्दर्शकही नाही. दशावतारी नाटकाची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास, प्रत्येक पात्राची मोठमोठी स्वगते, स्पष्ट उच्चार, कमावलेले आवाज, पुरुषांनी साकारलेली ‘स्त्री’ भूमिका आणि संगीत नृत्यमय लढाया! दशावतारी नाट्यात नेहमी देवांनी दानवांशी केलेला संघर्ष, त्यातून दृष्ट प्रवृत्तीचा झालेला नाश आणि अंतिम विजय सत्याचाच होतो याचे दर्शन होते. येथे पात्र परिचय केला जात नाही. शंकर, विष्णू ही पात्रे रंगभूषेवरून, वेशभूषेवरून ओळखू येतात.
नाटकाचा नायक-राजा किंवा खलनायक, राक्षस, त्यांच्या पत्नी त्यांचा उल्लेख पल्लेदार स्वगतामधूनच करतात. त्यामुळे प्रारंभीचे स्वगत समोरील प्रेक्षक कानात प्राण एकवटून ऐकत असतात आणि त्यानुसार मनात कथानकाची बांधणी करतात. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे युद्धाच्या वेळी हे कलाकार विशिष्ट पदन्यास करत युद्ध करतात. हे पदन्यास मात्र विशिष्ट कलाकारांकडून ते शिकून घेतात. हा पदन्यास म्हणजे या नाटकाचा मूळ गाभा आहे. ज्या कलाकाराला हा पदन्यास जमला त्याला अर्धे नाटक जमले. देव आणि दानव यांच्यात नृत्य स्वरूपात लढाई होते, तीसुद्धा पाहण्यासारखी असते.
दशावतारी नाटकांबद्दलच्या बऱ्याच जाणकार मंडळींच्या मतानुसार आता दशावतारी नाट्यात बदल होत आहे. त्याचा ढाचा, रूप, रंग बदलत आहे. तो बदल एक पारंपरिक लोककला म्हणून दशावतारी कलेला मारक ठरणार आहे. दशावतारी नाटकात आता ट्रिक-सीन येऊ घातलेत. प्रकाश योजनेचे साह्यही आता दशावतारी नाटके घेऊ लागली आहेत. ‘मागणी तसा पुरवठा’ हे तत्त्व जरी मान्य केले, तरी लोककलेबाबत याला क्षमा नाही. पूर्वी नट आपल्या मूळ कंपनीशी बांधील असत. त्यामुळे सादरीकरणाला एक प्रकारचा भक्कमपणा येत असे. आता काही वेळा संयुक्त दशावतार सादर होतात; पण त्यात कंपनीचा ठसा उमटलेला दिसून येत नाही. अलीकडे सुशिक्षित तरुण एक छंद म्हणून दशावतारात येऊ लागलेत. कथादेखील ‘पुराणे’ सोडून काल्पनिक होऊ लागली आहे. दशावतारांची नावे नाटक, सिनेमा या नावांवरून पडू लागली आहेत. काही तरुण बक्षिसाच्या लोभाने दशावतारात न शोभणारे विनोद करू लागले आहेत.
वास्तविक दशावतारी नाटक रंगमंचावर सादर होणारे नसून, मंदिराच्या गाभाऱ्यात सादर होणारे नाटक आहे. त्याचे पावित्र्य आणि मूलस्रोत जपणे आवश्यक आहे. आता दशावतारी नाट्यमंडळींची पूर्वीची हलाखीची परिस्थिती पालटून त्यात बदल झालेला आहे. ‘रातचो राजा, सकाळी कपाळावर बोजा’ ही म्हण आता दूर गेली. कलाकार सुमो, टेम्पो या वाहनांतून प्रवास करू लागले आहेत. बहुतेक सर्व दशावतारी नाट्यमंडळांकडे स्वतःच्या गाड्या आल्या आहेत. ही आपणास अभिमानाची बाब आहे. पत्र्याच्या ट्रंकांची जागा चांगल्या सूटकेसने घेतली; पण जुन्या अभिनयपूर्ण सादरीकरणापासून दशावतार आता फार दूर गेलेला आहे, पण वेळ गेलेली नाही.
कालानुरूप बदल कुठल्याही कलाकृतीला चुकलेले नाहीत, दशावतार ही लोककलाही त्याला अपवाद नाही. फक्त कलात्मक स्थित्यंतरे कुठल्या प्रकारची असावीत, यावर मात्र ज्येष्ठ दशावतारींचा आणि अभ्यासकांचा अंकुश असणे गरजेचे आहे. या लेखांतील अनेक संदर्भ सुरेश शामराव ठाकुर, मालवण सिंधुदुर्ग आणि अनघा पंडीत, देवगड, सिंधुदुर्ग यांनी लिहिलेल्या संशोधनात्मक लेखांवर आधारीत आहेत. बरीच माहिती वृत्तपत्रातील मर्यादित जागे अभावी दिलेली नाहीत; परंतु भविष्यात दशावतार या विषयावरील विस्त्रूत लिखाणात त्या गोष्टी अंतर्भूत केल्या जातील, या आश्वासनासह ही लेखमाला आवरती घेतो.