Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजविधिमंडळ विशेषमहत्वाची बातमी

Abu Azmi : tata bye bye खतम! उबाठावर आरोप करत समाजवादीचा महाविकास आघाडीला राम राम

Abu Azmi : tata bye bye खतम! उबाठावर आरोप करत समाजवादीचा महाविकास आघाडीला राम राम

मुंबई : यंदा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये असलेल्या मित्र पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु आहे. महाविकास आघाडीला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीने आघाडीची साथ सोडली आहे. शिवाजीनगर- मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू आझमी यांनी ही घोषणा केली आहे. तसंच यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव का झाला? यावरही अबू आझमी यांनी खुलासा केला आहे.



अबु आझमी काय म्हणाले?


महाविकास आघाडीमध्ये एकजूट नव्हती. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा समन्वय महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळाल नाही. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकवाक्यता गरजेची आहे. कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढत असेल तर त्याला आपला नेता- उमेदवार समजलं गेलं पाहिजे. पण कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता, असं अबु आझमी म्हणालेत.


यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पराभूत का झाली? यावर भाष्य करताना आझमी म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळालं. जागा वाटपावेळीसुद्धा आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळाली. याचमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असं अबू आझमी यांनी सांगितलं.


शिवसेनेच्या आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर अबू आझमी यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कायम असेल. उद्धव ठाकरे यांनी सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा विचार मांडला नाही. त्यामुळे आमचा त्या भूमिकेला विरोध आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवायचं की त्यांना शिवसेनेसोबत राहायचं की नाही, असं अबू आझमी म्हणाले आहेत.



अबु आझमी यांनी घेतली आमदारकीची शपथ


महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीतील निकालावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. पण अबू आझमी यांनी मात्र विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत आता फाटाफूट झाली आहे. अबू आझमी आणि भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख हे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडीचं संख्याबळ २ ने कमी झालं आहे.


Comments
Add Comment