मेघना साने
संयुक्त महाराष्ट्राच्या काळात आचार्य अत्र्यांच्या टांकसाळीतून पडणारी शब्दांची नाणी जेव्हा खण्ण खण्ण करत श्रोत्यांसमोर वाजली जायची तेव्हा सभाच्या सभा जिंकल्या जायच्या…’’ ॲडव्होकेट राजेंद्र पै आपल्या खड्या आवाजात व्याख्यान देत होते. “महाराष्ट्राला ‘महाराष्ट्र’ हे नाव आचार्य अत्र्यांनीच दिले. ‘सिनिअर सिटिझन्स क्लब, ठाणे नॉर्थ’ने आचार्य अत्रे यांच्या आठवणी या विषयावर भाषण देण्यासाठी आचार्य अत्रे यांचे नातू अॅडव्होकेट राजेंद्र पै यांना आमंत्रित केले होते. ठाण्यातील हितवर्धिनी सभागृह ज्येष्ठ नागरिकांनी फुलून गेले होते. आचार्य अत्र्यांची भाषणे ऐकलेले, ‘मराठा’चे वाचन केलेले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा काळ अनुभवलेले लोक श्रोते म्हणून उपस्थित आहेत याची राजेंद्र पै यांना कल्पना होती. क्लबचे अध्यक्ष सुरेश गुप्ते यांनी सुरूवातीला पै यांचे स्वागत केले. तेव्हा ‘अत्र्यांच्या आठवणी सांगून त्यांचे ऋण व्यक्त करण्याची मला संधी मिळत आहे.’ असे म्हणूनच पै यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.
या व्याख्यानात त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. साने गुरुजींचे निधन झाले तेव्हा अत्रे यांनी ‘मृत्यूचे चुंबन घेणारा कवी’ या शीर्षकाचा अग्रलेख ‘मराठा’त लिहिला होता. गुरुजींच्या चितेला नमस्कार करून त्यांनी शब्द दिला होता की, साने गुरुजीलिखित ‘श्यामची आई’ पडद्यावर आणेन. त्याप्रमाणे त्यांनी ‘श्यामची आई’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. परीक्षकांमध्ये एकही मराठी माणूस नव्हता. तसेच या पारितोषिकाचेही हे पहिले वर्ष होते. त्यामुळे हे महाराष्ट्राला अभिमानास्पद होते. हे सुवर्णकमळ स्वीकारायला अत्रेसाहेब दिल्लीत गेले. त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांनी हे सुवर्णपदक स्वीकारले. त्यावेळी अत्रे यांची कन्या शिरीष पै यांना मातृत्व प्राप्त होणार होते. अत्रेसाहेब राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना म्हणाले, “मला जर नातू झाला तर त्याचे नाव मी राजेंद्रप्रसाद ठेवीन.” त्याप्रमाणे शब्द पाळून शिरीषच्या मुलाचे नाव त्यांनी राजेंद्र ठेवले.
राजेंद्र पुढे ॲडव्होकेट झाला आणि फार मोठ्या केसेस त्याने लढल्या. ॲडव्होकेट राजेंद्र यांनी आपल्या भाषणात अत्र्यांच्या शिक्षणक्षेत्रातील अभिनव कार्याचा पट मांडला. आचार्य अत्र्यांनी काढलेल्या ‘नवयुग वाचनमाले’तून मंगेश पाडगावकर, शांता शेळके यांसारखे अनेक विद्यार्थी घडले आणि पुढे लेखक, कवी झाले. त्यावेळची रटाळ पाठ्यपुस्तके वाचण्याऐवजी ‘नवयुग वाचनमाले’ला लोकांनी पसंती दिली. मुलांना त्यात संस्कारमय गोष्टी वाचायला मिळायच्या. अत्र्यांची ‘दिनूचे बिल’ ही कथा तर प्रसिद्धच आहे. या कथेचे फ्रेंच भाषेत भाषांतर झाले आहे. बालकवींची ‘आनंदी आनंद गडे’ ही कविताही आचार्य अत्र्यांनीच पाठ्यपुस्तकात आणली. इंग्रजी लेखकांचेही ते वाचन करीत असत. हॅन्स अँडरसनच्या बालकथा, परीकथा मुलांनी वाचाव्यात असे त्यांना वाटत होते. मुलांमध्ये भावभावना निर्माण होण्यासाठी त्यांना शोककथा सांगणे आवश्यक आहे असे ते म्हणत.
कवी, शिक्षक, नाटककार, उत्तम वक्ता, लेखक, संपादक, चित्रपट निर्माता अशा विविध भूमिका ज्यांनी जीवनात यशस्वीपणे पार पाडल्या ते आचार्य अत्रे स्वतःच्या कारकिर्दीबद्दल म्हणतात. “माझ्या एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय उमलला. म्हणून एका व्यवसायाचे सामर्थ्य दुसऱ्या व्यवसायाला आलं. पण व्यवसाय हे काही माझे जीवन नव्हे, तर जीवन हा माझा व्यवसाय आहे.” जीवनाला व्यवसाय म्हणणाऱ्या आचार्य अत्र्यांनी आयुष्यातून भरभरून वेचलं आणि समाजावर उधळलं. आपल्या श्रोत्यांच्या भोवती आपल्या भाषणांतून एक सचोटीचे आवरण उभं केलं. सत्याच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला. आचार्य अत्रे ‘मराठा’मधून टीकाही करत. अनेक लेखक, पुढारी हे देखील त्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरत. अगदी आचार्य विनोबा भावेसुद्धा त्यातून सुटले नव्हते. पण एकदा काही कामानिमित्त ते वर्धा येथे गेले असता अत्र्यांनी विनोबांच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली. त्या दिवशी विनोबांचे मौन होते. पण अत्रे भेटले तेव्हा त्यांनी अत्र्यांचे हात हाती घेतले. त्या पुण्यस्पर्शाने आचार्य अत्र्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
ते म्हणाले, “ माझं चुकलं. मी तुमच्याबद्दल वाईट लिहिलं. असं लिहायला नको होतं.” विनोबांनी पाटीवर एकच वाक्य लिहिलं, “ज्याच्याजवळ अनुराग आहे त्याला राग करण्याचा हक्क आहे.” अत्र्यांचं विनोबांवर प्रेम होतं म्हणूनच त्यांनी राग व्यक्त केला असं विनोबांना म्हणायचं होतं. एका मोठ्या माणसाने दुसऱ्या मोठ्या माणसाजवळ आपली चूक कबूल करण्याचे उदाहरण महाराष्ट्रात विरळेच! आचार्य अत्रे हे त्यांच्या उच्च दर्जाच्या विनोदासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी विनोदाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला होता. पाश्चात्य विनोदकार वाचून काढले होते. राजकारणातले विनोद हे अब्राहम लिंकन आणि विन्स्टन चर्चिल यांच्या लिखाणातून वाचले होते. ‘विनोदाची गाथा’ या आपल्या पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचे शीर्षक आहे ‘विनोदाचे व्याकरण’. विनोदाची निर्मिती कोण करू शकतं याबद्दल अत्रे म्हणतात, “ज्यांनी आयुष्याचे बरे-वाईट आणि कडू-गोड अनुभव घेतले आहे, ज्यांच्या अंतःकरणातून मानवजातीविषयी सहानुभूतीचा जिवंत झरा एकसारखा वाहत आहे आणि सर्व मानवजात सुखी व्हावी, आनंदी व्हावी अशी ज्यांच्या अंतःकरणाला दिवस-रात्र तळमळ लागून राहिली आहे अशा उमद्या आणि दिलदार माणसाला विनोदाचा साक्षात्कार होतो.” राजेंद्र पै यांनी आपल्या व्याख्यानाने अत्र्यांचा काळच ज्येष्ठ नागरिकांसमोर उभा केला. आजचे राजकारण पाहता ‘आज अत्रे हवे होते’ असे म्हणत सारे घरी गेले!