Saturday, July 5, 2025

मनोरंजनाची ‘स्टार’ दुपार...!

मनोरंजनाची ‘स्टार’ दुपार...!

राज चिंचणकर


दूरचित्रवाणीवरच्या मालिकांच्या विश्वात संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळेला अधिक महत्त्व आहे. ‘प्राईम टाइम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळेत मालिका प्रसारित होईल, असे शक्यतो पाहिले जाते; कारण या वेळेत अधिक प्रेक्षकवर्ग मालिका पाहण्यासाठी उपलब्ध असतो. पण ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आताच सुरू झालेली ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवीन मालिका चक्क दुपारी प्रसारित होत आहे. मंगेश कदम व निवेदिता सराफ असे लोकप्रिय कलावंत असलेल्या या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रौढ वयातली पात्रे या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत. अर्थात, विषयाला अनुसरून ते तसे असणे योग्यच आहे. मात्र ही मालिका ‘प्राईम टाइम’च्या ऐवजी दुपारच्या वेळेतच का प्रसारित केली जात असावी आणि यामागे काय उद्देश असावा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.


‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेच्या ठरवून दुपारी केल्या जाणाऱ्या प्रसारणाबाबत या वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड सतीश राजवाडे यांच्याशी संवाद साधला असता, ते ‘प्राईम टाइम’चा समज खोडून काढतात. सतीश राजवाडे म्हणतात, “आमचा ‘स्टार प्रवाह दुपार’ हा बऱ्याच वाहिन्यांच्या प्राईम टाईमपेक्षा मोठा आहे. दुपारच्या वेळेत मालिका पाहणारा रसिक प्रेक्षक अजिबात कमी नाही. त्यामुळे दुपारी सुद्धा सशक्त करमणूक आमच्या वाहिनीवर रसिक प्रेक्षकांना मिळत असते. आता ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ यासारखा व एवढा मोठा विषय दुपारी सादर केला जात आहे; कारण ही मालिका या वेळेत पाहण्यासाठी घराघरांतले आई-वडील उपलब्ध असतील.


‘स्टार प्रवाह दुपार’ हा लहान प्लॅटफॉर्म नाही. आज रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे स्टार प्रवाह दुपारी सुद्धा यशस्वी होत आहे. आमची ही नवीन मालिका म्हणजे केवळ एक मालिका नसून, तो एक संवाद आहे; जो आपण समाजाबरोबर, रसिक प्रेक्षकांबरोबर आणि आपापसांत सुद्धा साधू शकतो. जसे आज माझे आई-वडील आहेत, तसाच मी उद्या आई-वडील असणार आहे आणि हे चक्र सुरूच राहणार आहे. आपले आई-वडील जे आपल्याला घडवतात, त्यांनी आता जरा आराम करावा आणि आपण फ्रंटसीटवर येऊन ड्राईव्ह करावे, अशा पद्धतीचा संवाद आपण समाजाबरोबर साधू शकतो का; असा एक विचार यामागे आहे”.

Comments
Add Comment