नाशिक : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांनी वयाच्या ८४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
ब्रेनस्ट्रोकचा (Brainstroke) झटका आल्याने पिचड यांची तब्येत अत्यवस्थ होती. त्यांच्यावर नाशिकच्या ९ पल्स रूग्णालयात उपचार सुरु होते. मधुकर पिचड यांच्यावर मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती आणखी खालावली, त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
भावपूर्ण श्रद्धांजली
आमच्या संगमनेर-अकोले तालुक्याचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना आमच्या भागाच्या विकासासाठी पिचड साहेबांच्या योगदानाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
विशेषतः संगमनेर-अकोले तालुक्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी… pic.twitter.com/2jGeC5a6UN— Satyajeet Tambe (@satyajeettambe) December 6, 2024
मधुकर पिचड यांचे शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजोर येथे उद्या, शनिवारी संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी १० वाजता देवठाण या गावी जाईल. त्यानंतर साडेदहा वाजता पक्ष कार्यालयत ठेवण्यात येईल. दुपारी १ वाजताच्या सुमारास अकोला कॉलेजमध्ये त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर राजौरी येथील मधुकर विद्यालयात पिचड यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर पुढील विधींसाठी राजौरी येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात येणार असल्याची माहिती पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांची राजकीय कारकीर्द कॉंग्रेस पक्षातून सुरू झाली. महाविद्यालयात असतांनाच आदिवासी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आंदोलनात सक्रीय सहभागी झाले होते. १९६१ मध्ये त्यांनी हा लढा दिला होता. त्यानंतर पिचड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेथे त्यांनी प्रदेशाध्यक्षपद भूषवले. त्यांनी आदिवासी विकास, वन आणि पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिचड यांनी आपल्या मुलासह प्रवेश केला. पण, २०१९ च्या निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला.
पिचड यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे घरवापसीची चर्चा रंगली होती. पण, मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने त्यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात दाखल केलं होतं. त्यांच्यावर दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. आज दुपारी पिचड यांची प्रकृती खालावली. संध्याकाळी त्यांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. पिचड यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.