देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. बाविसाव्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत प्रवेश करणारे देवेंद्र महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतातले दुसरे सर्वात तरुण महापौर होते. पुढे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि आता पुन्हा एकदा त्याच पदी विराजमान होऊन त्यांनी आपल्या वाटचालीतील एक वर्तुळ पूर्ण केले आहे. या सगळ्यात त्यांच्या अंगीचे काही गुण विशेषत्वाने नोंद घेण्याजोगे आहेत…
विवेक घळसासी
देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली, ते विधिमंडळातील भाजपाचे नेते झाले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे अधिकृत उमेदवारही झाले. देवेंद्र मुख्यमंत्री होण्यामागे बरेच संदर्भ आहेत. या संदर्भातील पहिली गोष्ट म्हणजे गेल्या दहा-बारा वर्षांमध्येच नव्हे तर २५-३० वर्षांपासून जातीय विषाणूंनी महाराष्ट्रातील सामाजिक जीवन गढूळ करण्याचे खूप मोठे कारस्थान झाले. दुर्दैवाने ते यशस्वीही झाले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सभ्य-सुसंस्कृत होतेच, पण इथे फार पूर्वीचा पण मनावर चरा ओढून गेल्यामुळे अगदी ताजा राहिलेला एक प्रसंग आठवतो. त्यावेळी पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून एका गांधीवादी, खादीधारी, जीवनभर व्रतधारी असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याने यशवंतरावांना तात्याराव गुर्जर यांचे नाव सुचवले. ते ऐकून तिथे यशवंतराव काही बोलले नाहीत, पण बैठक पार पडल्यानंतर त्या गांधीवादी कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, ‘कोणाचे नाव सुचवायचे असते, हे कळते का तुम्हाला?’असो. शरद पवारांच्या कारकिर्दीत राज्यात जातीय द्वेष उफाळून आला. ‘पुणेरी पगडी’चा होणारा उल्लेख असो वा त्यांच्या जातीकडे निर्देश करणारी विखारी टीकाटिप्पणी करणे असो. असे अनेक प्रसंग समाजाने पाहिले.
गेल्या दहा वर्षांमध्ये तर या द्वेषाचा अतिरेक झाला. दु:खाची बाब म्हणजे राजकीय व्यासपीठांवर अगदी भाजपाच्या वक्त्या वा नेत्यांकडूनही जातीपातीचे राजकारण तापवण्याचा प्रयत्न झालेला दिसला. अशा वातावरणात देवेंद्र यांच्यावर अतिशय वैयक्तिक, खालच्या पातळीवर मते व्यक्त होत होती. त्यामुळे संवेदनशील आणि सुसंस्कृत माणसाला प्रगतिशील, शिवरायांचा; शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणत्या पातळीवर जावू लागला आहे, याची चिंता वाटत होती. यात भर घालणारी आणि प्रभावी ठरणारी तामसी प्रवृत्ती माध्यमांच्या रूपाने समोर येत होती. त्यातला आणखी एक पदर यूट्युबर्सचा होता. यापैकी कोणाकडूनही कोणाविषयीच आदरार्थी संबोधन वापरले जात नव्हते. माध्यमांनी वक्त्या-प्रवक्त्यांनी या सगळ्यांचा कडेलोट केला आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात ‘भ’ची बाराखडी आणणाऱ्या एका व्यक्तीने राज्याची रोजची सकाळ गलिच्छ करून टाकली. मधल्या काळात आरक्षणाच्या निमित्ताने वातावरण आणखी ढवळून निघाले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याची सूत्रे देवेंद्र गंगाधरपंत फडणवीस यांच्या हातात पुन्हा आली आहेत. ही महाराष्ट्रासाठी, इथल्या सुसंस्कृत लोकांसाठी, राष्ट्रीय संतांसाठी, युवक-युवतींसाठी महत्त्वाची बाब आहे, याचा विचार आता व्हायला हवा. हे पाहताना संबोधनातील एक सुखद बदल नक्कीच सांगावासा वाटतो. तो असा की, सगळेजण आधी त्यांना ‘देवेंद्रजी’ म्हणत होते. पण आता अखिल भारतीय पातळीवर ते ‘देवाभाऊ’ झाले आहेत. संघाचा स्वयंसेवक, विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, घरातील जनसंघ-भाजपाची परंपरा पाळणारा मुलगा आणि पक्षात आल्यानंतर बुथ लेव्हलपासून काम सुरू करणारा एक तळमळीचा माणूस हा सगळा प्रवास त्यांच्या वाटचालीला वळण देणारा आहे. यातील निरागसता लोकांना भावते. ही निरागसता राजकारणात वावरताना त्यांच्यासाठी एक ढालसुद्धा झाले. बाविसाव्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत प्रवेश करणारे देवेंद्र महाराष्ट्रातलेच नव्हे, तर भारतातले सर्वात तरुण दुसरे महापौरही झाले. पुढे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि आता पुन्हा एकदा त्याच पदी विराजमान होऊन त्यांनी आपल्या वाटचालीतील एक वर्तुळ पूर्ण केले. देवेंद्र कोणाच्या ‘गुड बुक्स’मध्ये असल्याने मुख्यमंत्री झालेले नाहीत. मोदींच्या कृपेमुळे, अमित शहांच्या लोभामुळे, वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे त्यांना हे पद मिळाले नसून स्वत:ला सिद्ध करून त्यांनी ते मिळवले आहे. हा ध्येयाचे सतत स्मरण ठेवणारा राजकारणी आहे.
अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांमध्ये क्वचितच दिसणारी पण देवेंद्र यांच्यामध्ये आढळणारी एक बाब म्हणजे वैचारिक स्पष्टता. यंदा भाजपाने गाठलेला १३२ चा आकडा खूप मोठा असून यात त्यांचेही मोठे यश आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी केलेले भाषण आपण ऐकले. इथे वैचारिक स्पष्टता सिद्ध करणारे त्यांचे एक वाक्य लक्षात घेण्याजोगे वाटते. युतीधर्म असताना चार गोष्टी मनासारख्या होतात, तर चार गोष्टी होत नाहीत. त्यामुळेच त्या पोटात घेऊन पुढे जाता आले पाहिजे असे सांगत ते पुढे म्हणाले की, सत्ता टिकून राहण्यासाठी हे करायचे नसते तर एक मोठे ध्येय गाठण्यासाठी हे करणे गरजेचे ठरते. हे मोठे ध्येय अर्थातच २०२९ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे, स्वत:च्या ताकदीवर, पूर्ण बहुमताची सदस्यसंख्या मिळवून जिंकणे हे आहे. म्हणूनच या ‘लार्जर इंटरेस्ट’चा मुद्दा भाजपाचे कार्यकर्ते, नव्याने निवडून आलेले सगळे आमदार यांनी लक्षात घेतला तर त्यांचे सभागृहातील आणि मतदारसंघातील वागणेही पुढच्या पाच वर्षांमध्ये भाजपाला एकट्याला बहुमत आणि हिंदुत्वाला सकारात्मकता मिळवण्याच्या दिशेने ठरेल.
देवेंद्र यांचे अवधान असे की, त्यांनी आपल्या भाषणात संविधानाच्या ७५ वर्षांची, अहिल्यादेवींच्या ३००व्या जयंतीपर्वाची तसेच बिरसा मुंडा यांची आठवण करून दिली. म्हणजेच हे संदर्भ देत त्यांनी अनेकांना आपल्याजवळ केले. अर्थातच ही बाब त्यांच्या वैचारिक स्पष्टतेची आणि संघटन कौशल्याची ओळख देणारी आहे. त्यांनी अजित पवारांना जवळ केल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. पण अजित पवार बरोबर असण्याचा आणि त्यांना स्वतंत्रपणे इतक्या जागा मिळण्याचा न बोलता, न कशाची वाच्यता करता किती मोठा लाभ होऊ शकतो, हे मधल्या काळाने दाखवून दिले. ही बाबही त्यांच्या वैचारिक स्पष्टतेचा दाखला देणारी आहे.
देवेंद्र यांनी कधीही सार्वजनिक जीवनातले संकेत सोडत नाहीत. त्यांनी कोणाविषयी ‘अरे-तुरे’ केलेले आपण ऐकलेले नाही. मतभेद ठाम मांडतील पण ‘शरद पवारांना काय कळतंय…’ असे वाक्य ते कधीच बोलणार नाहीत. गेल्या अडीच वर्षांत सर्वांनीच ती जोखली आहे. विरोधकांनी त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर उतरून टीका केली. पण देवेंद्र यांनी त्यांना कृतीतून उत्तर दिले. अत्यंत धूर्तपणे त्यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून तर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर काढले. हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना सार्वजनिक जीवनातून रोखायचे असेल तर खरा कार्यकर्ता आणि सच्चा हिंदुत्ववादी शिवसैनिक यांना सन्मानाने बाहेर काढले पाहिजे, हे त्यांनी ओळखले होते. दुसरीकडे स्वार्थ, जातीपाती, नातीगोती, परिवारवादाचे राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट बाहेर काढण्याचे महत्त्वही त्यांनी जाणले होते. म्हणूनच धूर्तपणे निर्णय घेत त्यांनी हे काम केले.
संसदपटू म्हणूनही ते मोठे आहेत. त्यांना यासंबंधीचे पुरस्कारही मिळाले आहेत. खरे तर त्यांना पाहून मला रामभाऊंचीच (म्हाळगी) आठवण येते. देवेंद्र हे प्रमाण असल्याखेरीज कोणताही प्रहार करत नाहीत, हे अत्यंत महत्त्वाचे. या सगळ्या गुणांमुळेच त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास दिसतो. आता आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारा आणि समोरच्याला जशास तसे पण सभ्यतेचे संकेत न मोडता उत्तर देणारा लोकांच्या मनातील असा नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला आहे. शरद पवारांचा दबदबा संपवणारे हे नाव आता नव्याने सत्तेच्या केंद्रस्थानी आले आहे. त्यामुळेच त्यांच्या या नव्या कार्यकाळात विकास, विकासशील उपक्रम-योजना आणि सामाजिक समतेविषयीचा प्रामाणिक आग्रह बघायला मिळेल तसेच त्यांची राजवट संस्मरणीय होईल यात शंका नाही.