मुंबई: राहुल गांधी यांनी ईव्हीएमवर दोषारोपण करण्याऐवजी आत्मचिंतन केले तर भविष्यात काँग्रेसला अधिक जागा जिंकता येतील असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते आज, शुक्रवारी एका मुलाखतीत बोलत होते.
यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, विरोधक ईव्हीएमला दोष देण्याचे काम करत आहेत. झारखंडमध्ये विरोधक जिंकले तिथे त्यांनी ईव्हीएमला दोष दिला नाही. परंतु, महाराष्ट्रामध्ये हारल्यानंतर ते ईव्हीएमला दोष देत आहेत. तर लातूरमध्ये अमित देशमुख जिंकतात तेव्हा ईव्हीएमला दोष देत नाहीत, पण धीरज देशमुख हारल्यानंतर लगेच विरोधक ईव्हीएमला दोष देतात. ईव्हीएम वर दोषारोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी जर आत्मचिंतन केले तर, भविष्यात त्यांना जास्त जागा जिंकता येतील असे फडणवीस यांनी सांगितले.
भविष्यातील राज्याच्या योजनांबाबत फडणवीस म्हणाले की, ‘ग्रीन एनर्जी, नदी जोड प्रकल्पावर माझा भर राहणार आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायमचे दुष्काळमुक्त करू शकतात. राज्याच्या विकासाठी हाती घेण्यात येणारे सगळे प्रकल्प वेगाने पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच ‘मुंबईतील मढपासून विरारपर्यंत सी-लिंक तयार करण्याची योजना आहे. यासाठी जपानी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. मुंबईकरांचा प्रवास कमी करण्यासाठी आणि ट्रॅफिकपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 375 किमीचे मेट्रोचे काम होणार आहे. मेट्रोमुळे मुंबईकरांचे तीन तास वाचणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.