Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडीविधिमंडळ विशेष

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी आमदार कालिदास कोळंबकर

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी आमदार कालिदास कोळंबकर

मुंबई : महायुती सरकारचा गुरूवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी शुक्रवारी राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून आमदार कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.


यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने सांगता झाली.


विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. ७, ८ आणि ९ डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशना दरम्यान हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष पद भूषवणार आहेत. पुढील तीन दिवसीय अधिवेशनात कोळंबकरांकडे हंगामी अध्यक्ष पदाची जबाबदारी राहील. पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांना ते शपथ देतील. ९ डिसेंबररोजी नव्या अध्यक्षाची निवड होईल. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल.

Comments
Add Comment