मुंबई: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघादरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना डे-नाईट असेल. हा सामना गुलाबी बॉलने खेळवला जाणार आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या सामन्याला सुरूवात होत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकच गुलाबी बॉलने कसोटी सामना खेळवण्यात आला. यात भारतीय संघाला ८ विकेटने पराभव सहन करावा लागला होता. हा सामना डिसेंबर २०२०मध्ये अॅडलेडमध्येच झाला होता. आता दोन्ही संघादरम्यान हा दुसरा गुलाबी बॉल कसोटी सामना खेळवला जाईल.
भारत-ऑस्ट्रेलिया दोघांचा गुलाबी बॉल कसोटीत पराभव
पहिला कसोटी सामना नोव्हेंबर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवण्यात आला होता. यात कांगारूंच्या संघाला ३ विकेटनी विजय मिळाला होता. यानंतर इतिहासात आतापर्यंत १० संघादरम्यान एकूण २२ डेनाईट कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक सामने ऑस्ट्रेलियानेच १२ गुलाबी बॉल कसोटी सामने खेळले आहेत त्यापैकी ११ जिंकलेत तर एका सामन्यात पराभव झाला आहे.