अमरावती : गोष्ट पदार्थाचे खास असतेच; पण आता भारतीय पदार्थ व चीनमधील खास पदार्थांना एकत्र करून फ्यूजन टेस्ट बनविली जात आहे. तसेच, मराठमोळी लग्नातील सुरुची भोजनात पिझ्झा व पास्ताचाही शिरकाव झाला आहे. हेच यंदाच्या लग्नसराईचे वैशिष्ट्य ठरत आहे. खवय्येही या नवीन चवीचा मनसोक्त आनंद घेत आहेत.
लग्न किती थाटामाटात करा, डोळे दिपविणारी भव्य-दिव्य सजावट, संगीत पार्टी, महागडे रिटर्न गिफ्ट सर्व काही करा त्याचे कौतुक होणारच; पण जेवणाची भट्टी जमली नाही, तर सर्वांचा हिरमोड होऊ शकतो. शेवटी लग्न सोहळ्याची संपूर्ण मदार ‘जेवणा’वरच असते. जेवण फक्कड असेल, तर वधूपक्षाचे व केटरर्सचे पाहुण्यांकडून कौतुक होते. देशी-विदेशी व्यंजनांचा घेता येतो आस्वाद
शहरात शाही लग्न सोहळे पार पडत आहेत. यात देशी-विदेशी पदार्थांचे २७ पेक्षा अधिक प्रकार व ३९ पेक्षा अधिक काउंटर खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे. यात युरोपियन, मेक्सिकन, जपानी, चिनी देशातील प्रसिद्ध पदार्थांचे स्टॉल आहेत. थंडीचे दिवस लक्षात घेऊन स्ट्रीम फूड व लाइव्ह काउंटर फूड स्टॉलला मागणी वाढली आहे.
आता यात केटरर्सनी आणखी नावीन्य आणले आहे. दोन देशांतील प्रसिद्ध पदार्थ एकत्र करून नवीन डिश तयार केली जात आहे. दक्षिण भारतातील पदार्थ व त्यात चायनीज पदार्थ मिक्स करणे किंवा इटालियन व चायनीज पदार्थ मिक्स केल्याने फ्यूजन टेस्टचा आनंद पाहुण्यांना मिळत आहे.