जिंद : हरियाणामधील जिंद जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या गावात PUBG गेम खेळण्यावरून कौटुंबिक वाद झाला. यानंतर २२ वर्षीय महिला बेपत्ता झाली. २६ नोव्हेंबर रोजी ही महिला घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली. महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे की, त्याची पत्नी मूळची बिहारची असून, त्यांचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.
तक्रारीनुसार, महिलेला PUBG गेम खेळण्याची आवड होती, मात्र तिच्या सासूने तिला हा गेम खेळण्यास मनाई केली होती. या किरकोळ वादानंतर ही महिला रागाच्या भरात घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही. पतीने पोलिसांना सांगितलं की, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास पत्नीने घराच्या भिंतीवरून उडी मारली आणि निघून गेली. तेव्हापासून तिचा शोध लागत नाही. या घटनेनंतर पतीने पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कुठेही सापडली नाही.
ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपास अधिकारी सुशीला यांनी सांगितलं की, पोलीस महिलेचा शोध घेत असून लवकरच तिचा शोध घेतला जाईल. याप्रकरणी स्थानिक लोकांकडेही चौकशी केली जात आहे. कौटुंबिक वादांमुळे वाढलेला तणाव आणि डिजिटल गेम्सच्या प्रभावावरही या प्रकरणामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
PUBG गेमचं आजच्या तरुणाईला व्यसन लागलं आहे. यामुळे अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. परंतु आता घडलेली ही घटना काहीवेळा कौटुंबिक नातेसंबंध आणि छोटे-छोटे वाद किती गंभीर परिणामांना कारणीभूत ठरतात याचं एक उदाहरण आहे. पोलीस आता या महिलेच्या शोध घेत आहेत.