ऋतुजा केळकर
रोबर सहा वर्षांपूर्वीची गोष्ट. अर्थतज्ज्ञ लेखक कवी आणि बरेच काही अशा माझ्या गुरूंना म्हणजे मी त्यांचा एकलव्य आहे बरं त्यांनी खरं तर माझं गुरूपद जबरदस्तीने स्वीकारलयं यांना चंद्रशेखर टिळकांना त्यांच्या घरी त्यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने भेटण्यास गेले होते. अत्यंत विचारवंत, जबरदस्त यशस्वी आणि ज्ञानाचे भांडार अशा सरांशी बोलताना मला प्रकर्षाने जाणवले ते त्यांचा अत्यंत नम्र स्वभाव. आचार-विचारांच्या फळांनी वाकलेल्या या ज्ञानाच्या गुलमोहराच्या सावलीत बसल्याची अनुभूती मला आली. त्या दोन तासांत सरांनी आयुष्याच्या मरुद्यानात आनंदाचे झुळझुळणारे झरे कसे जिवंत ठेवायचे ते मला शिकवलं आणि मीही अधाशासारखे त्यांचे प्रत्येक शब्द नि शब्द हृदयात जपून ठेवले. अशा काही आठवणी काही व्यक्ती आपल्या आयुष्यावर खोलवर छाप सोडून जातात की, मग एखाद्या वळणावर तेच प्रसंग, त्याच व्यक्ती, त्याचं आठवणी जगायला बळ देऊन जातात.
जसा विद्रुप पायाचा मोर सप्तरंगी पिसारा बाळगून असतो तशी आयुष्यात काही वळणे अशी येतात की, आपण आता हरलो असे वाटत असताना हे सप्तरंगी पिसारेच आपल्या मनमोराला नृत्य करायला भाग पाडतात. कसे आहे ना की, प्रपंचाच्या पाशात आपणच आपल्याला जेरबंद केलेले आहे. मग या बंधनांचा जाच तो का व्हावा? मृगजळामागे धावावे तसे आपण यश, समृद्धी तसेच पैसा या पाठी छाती फुटेपर्यंत धावतचं असतो ना? मग त्यामध्ये विसाव्याकरिता आपल्याला वळणावळणावर भेटलेल्या या नितळ पानांतील लसलसत्या केवड्यांचे बकुळगंधच नवनवे मार्ग सुचवतात. नव्याने नवनवीन दिशा दाखवतात. जेव्हा जेव्हा माणसाचे शिक्षण संपले असे माणूस म्हणतो तेव्हा तेव्हा त्याची सर्वार्थाने प्रगती थांबते असे मला वाटते, कारण माझ्या मते प्रत्येक दिवस नव्हे प्रत्येक क्षण हा माणसाला काही ना काही नवे शिकवून जातो. म्हणजे असे बघा “मडकं आणि घट यात फरक तो काय? दोघंही मातीचेच तर बनलेत! आकार-उकारानेही सारखेच! पण मडकं हे मयतावर फोडतात तर घटाची पूजा होते. म्हणजेच त्यांना बनवणारी माती किंवा हात जरी एक असले तरी स्थानपरत्वे त्यांचे महत्त्व त्यांचा वापर बदलतो. म्हणजेच आपण त्याचा कसा वापर करतो त्यावर सारे अवलंबून आहे. तसेच आपल्या आयुष्यात आपल्याला एखादी व्यक्ती हवी असेल, तर सर्वप्रथम आपण त्याला त्याच्या आयुष्यात हवे आहोत का? हे तपासून घेणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यात एखादी पोकळी राहिली ना तरी चालेल पण नगाला नग म्हणून ती पोकळी भरून नका. कारण सुखाच्या मृगजळामागे धावता धावता आपल्याच मनाचे कंगोरे बोथट होऊन नात्यांचा स्मरण सोहळा एक नासके डबके होणार नाही ना याची काळजी घेणे गरजेचे असते.
आठवणींचेही असेच असते. आपल्यानंतर जर कुणी आपली आठवण मोरगोंदणी शिंपल्यांप्रमाणे मनाच्या इंद्रधनूवर कोरून ठेवावी असे वाटत असेल ना तर बुद्धिमत्ता तसेच पैसा, प्रतिष्ठा यांची गुर्मी प्रथम त्यागा. कारण बरेचदा या गुर्मीत उद्दामपणे आपण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय याचे भान आपल्याला राहत नाही. मग बरेचदा त्यानेच आपली बरीचशी नाती धुसर होतात. नव्हे अगदी सरळ सरळ सांगायचे तर तुटतात. मी तर म्हणेन कठोर बोलण्याची वेळ आली तर भारूडाचा वापर करा. भारूडात कसे हसत-खेळत व्यंगाने समोरच्याची चूक दाखवली जाते ! तसेच करा पाहा जनमानसात तुम्ही कायम असा आनंदाचा डोह व्हाल की, ज्याच्यामुळे इच्छा – वासनांनी घट्ट झालेली मुठ तृप्तीच्या हिऱ्या-मोत्यांच्या राशीत परिवर्तित होईल आणि त्याचाच निरामय प्रकाश हा तुम्हाला अखेरीस निजधामाला आणून सोडेल मग ऋतुचक्रातून पुढे जाता जाता आपण सहजपणे गुणगुणू शकाल,
“आनेवाला पल…
जानेवाला हैं…
हो सकते तो इसमें…
जिंदगी बिता दो …
पल ये जो जानेवाला हैं…”