Tuesday, February 11, 2025
Homeमनोरंजनस्वामींनी महामारीला पळवले

स्वामींनी महामारीला पळवले

विलास खानोलकर

सर्व सेवेकऱ्यांसह श्री स्वामी समर्थांची स्वारी थोरल्या मणुरातील यल्लम्माच्या देवळात उतरली. त्यावेळी येथे महामारीचा उपद्रव फार होता. इतका की रोज दहा-पंधरा माणसे महामारीने मरत. गावच्या पाटलांनी श्री स्वामींकडे येऊन प्रार्थना केली की, ‘महाराज, माझा मुलगा हनुमंत हा शरपंजरी पडला आहे. त्याचा घटकेचा भरवंसा नाही. तरी श्री स्वामींनी कृपा करून मुलास गुण द्यावा.’ गावातील इतर लोकांनीही रडून रडून आकांत मांडला होता. आप्पा पाटलाच्या मुलाचा प्राण जाऊ लागला, तेव्हा पाटील श्री स्वामी चरणांवर येऊन कोसळले. तेव्हा चोळाप्पा समर्थांस म्हणाला, ‘महाराज, हा प्रसंग आम्हास पाहवत नाही, लवकर देवळात जावे. मुलगा निरोप घेऊन चालला. आता येथे बसणे चांगले नाही.’ समर्थ म्हणाले, ‘त्यास कोण निरोप देतो? कडुनिंबाचा पाला मुलाच्या सर्व शरीरास लावा आणि पाण्यात वाटून तोंडात घाला.’ अशी श्री स्वामींची सूचना ऐकून पाटलाने कडुनिंबाचा पाला आणून अंगास लावला व तोंडात घातला. त्यासरशी मुलगा चलनवलन करू लागला. सर्वांना आनंद झाला. दुसरे दिवशी पाटलाने श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा करून सर्व सेवेकऱ्यांस भोजन घातले. दुसऱ्या दिवसांपासून समर्थ कृपेने गावातील महामारीचा उपद्रव बंद झाला.

या लीला भागात श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसह थोरल्या मणूरला पोहोचले तेव्हा महामारीच्या (पटकीच्या) रोगाने गावात थैमान घातले होते. दररोज दहा-पंधरा माणसे दगावत होती. सर्व गावच भयभीत झाला होता. तेव्हा आता रोगावर नियंत्रण मिळविणाऱ्या सोयी-सुविधा व औषधोपचार उपलब्ध नव्हते, लोक महामारीच्या रोगापुढे हतबल झाले होते. श्री स्वामी समर्थाचे त्या गावात यल्लम्मा देवीच्या मंदिरात उतरणे हाच मोठा दिलासा-आधार होता. गावच्या आप्पा पाटलांचा मुलगा ‘हनुमंता’ हाही महामारीच्या रोगाच्या तडाख्यात सापडला होता. पाटील श्री स्वामींकडे येऊन मुलास वाचविण्याबद्दल विनवीत होते. गावभर निर्माण झालेल्या महामारीच्या हाहाकारामुळे गावकऱ्यांनी रडूनरडून आकांत मांडला होता. हनुमंताची अखेरची अवस्था पाहून चोळाप्पा श्री स्वामींस यल्लम्माच्या देवळात परतण्याविषयी सुचवित होता; परंतु श्री स्वामी समर्थ हे तर तमाम रयतेच्या सुख-दुःखात सदैव सामील होणारे. त्यांचे दुःख, यातना अथवा पीडा दूर करणारे, त्या सर्वांनाच वाऱ्यावर सोडून चोळप्पाचे ऐकून यल्लम्माच्या देवळात येऊन स्वस्थ बसणे, हे श्री स्वामींना रुचणारे नव्हते. खेद याचा वाटतो की, श्री स्वामींच्या निकट आणि सतत सेवेत राहणाऱ्या चोळाप्पास श्री स्वामींचा आचार-विचार-धर्म, तत्त्वज्ञान आणि सामर्थ्य याचे कसे आकलन झाले नाही? कसे होणार? तोही तुमच्या-आमच्या सारखाच घर-प्रपंच असणारा एक साधासुधा प्रापंचिक. राग-लोभ-मोह-माया-मत्सर-द्वेष या सारख्या षड्रिपूत गुरफटलेला. त्याला काय किंवा तुम्हा-आम्हाला काय ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री स्वामी

समर्थ कसे कळावेत?’ आपण सर्वच मर्यादित परिघात वावरणारे. त्यांनी हनुमंताला तर वाचवलेच. कसे? ते सर्व लीलेत आले आहे; परंतु महामारीग्रस्त थोरल्या मणूर गावालाही वाचवले. सर्वांना आनंदित केले. या लीला कथा भागाचा अजूनही एक मथितार्थ आहे. श्री स्वामी समर्थ सदेह अक्कलकोटात व आजूबाजूच्या पंचक्रोशीत वावरत होते. त्या मागासलेल्या काळातही अनेकांना बरे करीत होते. गावा-गावांना महामारी, पटकीसारख्या महाभयंकर रोगांपासून वाचवित होते.
सद्यस्थितीतही निर्गुण-निराकार स्वरूपात वावरणारे श्री स्वामी समर्थ अनेकांच्या वेदना दुःख-अडी-अडचणींचे निवारण करतात. ‘मैं गया नहीं जिंदा हूं’ चा प्रत्यय आणून देतात. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हे ब्रीद खरे करून दाखवतात. पण कुणासाठी ते हे सर्व करतात? जे शुद्ध, निर्मळ, निर्मोही वृत्तीचा आचार-विचार आणि व्यवहार ठेवतात. निष्ठापूर्वक त्यांची उपासना करतात. त्यांना स्वामी मदत करतात.

स्वामीकृपेची अष्टपदी
स्वामी आले मणूर गावी
महामारीची साथ होती गावी ||१||
पाटलाचा पोरगा झाला अस्वस्थ
स्वामी वदे भिऊ नको रहा स्वस्थ ||२||
भयंकर यम करणार नाही काही
स्वामी वाचवण्यास उभे दिशा दाही ||३||
इतर गावात अनेकजण गेले
पाटील पोराला नाही नेले ||४||
द्या त्याला कडुलिंबाचा प्रसाद
मीच देतो यमाला प्रसाद ||५||
पोरगा हनुमंत वाचला जीवानिशी
स्वामीरुपी प्रभूराम धावला झटदिशी ||६||
भक्त सदा वंदा स्वामीपदा
स्वामी येतील घेऊन गदा ||७||
स्वामी वाचवतात सदा सदा
जय स्वामी समर्थ तुम्ही वदा ||८||

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -