Monday, February 10, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखदिव्यांगजनांची सेवा, स्वाभिमानाचे अमृत दशक

दिव्यांगजनांची सेवा, स्वाभिमानाचे अमृत दशक

नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

३ डिसेंबर, खऱ्या अर्थाने एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण हा दिवस संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय ‘दिव्यांग दिवस’ म्हणून साजरा करते आहे. हा दिवस दिव्यांगजनांचे धैर्य, त्यांचे आत्मबळ, त्यांच्या कर्तृत्वाला वंदन करण्याची आपल्या सगळ्यांना मिळालेली एक खास संधीच आहे. भारतासाठी तर हा दिवस एखाद्या पवित्र दिवसाप्रमाणेच आहे. दिव्यांगजनांचा सन्मान करण्याची वृत्ती आपल्या भारताच्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये अगदी घट्ट रुजलेली आहे. आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या लोककथांमधून देखील प्रत्येकाच्या, दिव्यांग सहकाऱ्यांच्या सन्मानाची भावना रुजलेली दिसून येते. त्याच अानुषंगाने रामायणात देखील एक श्लोक आहे.

‘उत्साहो बलवानार्य, नास्त्युत्साहात्परं बलम्।
सोत्साहस्यास्ति लोकेऽस्मिन्,न किञ्चिदपि दुर्लभम्।’

या श्लोकाचा मूळ अर्थ असा की, ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे, ऊर्जा आहे. त्यांच्यासाठी या जगात अशक्य असे काहीही नाही. आज आपल्या भारतासाठी आपले दिव्यांगजन याच उत्साहाने देशाचा सन्मान आणि स्वाभिमानाची खरी ऊर्जा बनू लागले आहेत. खरे म्हणजे या वर्षासाठी तर हा दिवस अधिकच विशेष म्हणावा असाच आहे. याच वर्षी भारताच्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताचे संविधान आपल्या सगळ्यांना समता आणि अंत्योदयासाठी काम करण्याची प्रेरणा देत आले आहे. आपल्या संविधानातून मिळत असलेल्या याच प्रेरणेच्या आधारावर मागच्या १० वर्षांमध्ये आपल्या सरकारने दिव्यांगजनांच्या प्रगतीमय वाटचालीसाठी एक मजबूत पाया घातला असल्याचे मला आवर्जून सांगावेसे वाटते. या दहा वर्षांमध्ये देशात दिव्यांगजनांसाठी अनेक धोरणे आखली गेली आणि सोबतच अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेतले गेले आहेत.

या दृष्टीने सरकारने घेतलेल्या निर्णयांकडे आपण पाहिलेत, तर तुम्हाला सहज लक्षात येईल की, हे निर्णय म्हणजे आपले सरकार सर्वसमावेशक, संवेदनशील आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणारे असल्याचे दर्शवणारेच निर्णय आहेत. याच मालिकेचा एक भाग म्हणूनच आजचा दिवस हा आपल्या दिव्यांग बंधु-भगिनींप्रती आपल्यातल्या समर्पण भावनेला पुन्हा एकदा दृढ करण्याचा दिवस देखील झाला असल्याचे म्हणता येईल. मी जेव्हापासून सार्वजनिक आयुष्यात उतरलो, त्या वेळेपासूनच, मी प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक प्रसंगात दिव्यांगजनांचे जगणे सुलभ व्हावे, यासाठी कायम प्रयत्न केले आहेत. आपल्या देशाच्या पंतप्रधानांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तर मी या सेवेला राष्ट्रीय संकल्प असेच स्वरूप देण्याच्या दिशेने काम केले. म्हणूनच तर ज्यावेळी २०१४ मध्ये माझ्या नेतृत्वात पहिल्यांदा सरकार स्थापन झाले, त्यानंतर पहिल्यांदा ‘अपंग’ या संबोधनाच्या ऐवजी ‘दिव्यांग’ हे संबोधन वापरण्याचा आणि त्याला प्रचलित करण्याचा निर्णय घेतला.

खरे तर संबोधनातील हा बदल म्हणजे केवळ शब्दांची अदलाबदली नव्हती, तर त्या उलट या माध्यमातून समाजात दिव्यांगजनांची प्रतिष्ठा वाढली आणि त्यांच्या योगदानालाही मोठी मान्यता मिळू लागली. दुसऱ्या बाजूला या निर्णयातून आणखी एक महत्त्वाचा संदेशही सर्वदूर पोहोचला, तो म्हणजे की हे सरकार एक अशा प्रकारची सर्वसमावेशक परिसंस्था उभारू पाहते आहे, की जिथे कोणत्याही व्यक्तीसाठी त्यांच्यामधील शारीरिक कमतरता या त्यांच्यासाठी कधीच अडचणीचा डोंगर म्हणून उभ्या राहणार नाहीत आणि त्यांना स्वतःची प्रतिभा आणि कौशल्यानुसार पूर्ण सन्मानाने राष्ट्र निर्मितीच्या कार्यात योगदान देण्याची संधीही मिळेल. यामुळेच तर मी घेतलेल्या या निर्णयासाठी आपल्या दिव्यांग बंधु-भगिनींनी वेगवेगळ्या प्रसंगी मला आशीर्वादच दिले आहेत. त्यांनी दिलेले हे आशीर्वादच माझ्याकरिता दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी काम करण्याची सर्वात मोठी ताकद बनले आहेत. मला तुम्हाला आवर्जून सांगायचे आहे की, प्रत्येक वर्षी दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आपण देशभरात असंख्य कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. मला आजही आठवते, ९ वर्षांपूर्वी आपण याच दिवशी सुगम्य भारत अभियानाचा प्रारंभ केला होता आणि आता ९ वर्षांच्या या वाटचालीत या अभियानामुळे दिव्यांगजनांचे ज्या रितीने सक्षमीकरण झाले आहे, ते पाहून मला प्रचंड समाधान मिळाले असल्याचेही मला आवर्जून सांगावेसे वाटते. आपल्या १४० कोटी देशवासीयांनी दाखवलेल्या दृढ संकल्प शक्तीमुळे सुगम्य भारत अभियानाच्या माध्यामातून दिव्यांगजनांच्या जगण्यातील असंख्य अडचणी तर दूर झाल्याच आहेत; पण त्याचबरोबरीने या अभियानाने त्यांना सन्मान आणि समृद्ध जीवनही मिळवून दिले आहे.

या पूर्वी जी सरकारे होती, त्यांच्या धोरणांमुळे दिव्यांगजन सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहू लागले होते. पण आम्ही निर्धारपूर्वक ही परिस्थिती बदलली. आरक्षण व्यवस्थेला नवे स्वरूप मिळवून दिले. गेल्या १० वर्षांत आम्ही दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी खर्च होणाऱ्या रकमेची तरदूतही तीन पटीने वाढवली आहे. खरे तर आमच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे दिव्यांगजनांसाठी संधी आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले केले आहेत. त्यामुळेच तर आज आपले दिव्यांग सहकारी भारताच्या जडणघडणीच्या प्रक्रियेत समर्पण भावनेने योगदान देणारे सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचा गौरव वाढवत आहेत, हे समजून घ्यायला हवे. भारतातील तरुण दिव्यांगजनांमध्ये प्रचंड प्रमाणात असलेली सुप्त क्षमता मी अनुभवली आहे. पॅरालिम्पिक्समध्ये आपल्या खेळाडूंनी त्यांच्या चमकदार कामगिरीने भारताला मिळवून दिलेला सन्मान हे त्यांच्या विस्मयकारक ऊर्जेचेच प्रतीक आहे. देशाच्या प्रगतीसाठी या ऊर्जेचा वापर व्हावा, यासाठी आम्ही आमच्या दिव्यांग मित्रांना कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे भारताच्या विकासासाठी त्यांच्या क्षमतेचा योग्य रितीने विनियोग होण्यासाठी हातभार लागत आहे. हे प्रशिक्षण कार्यक्रम सरकारचे फक्त उपक्रम नाहीत, तर या उपक्रमांमुळे दिव्यांगजनांचा आत्मविश्वास वाढला आहे, तसेच त्यांना रोजगार शोधण्याचे बळ दिले आहे, आत्मसन्मानाने जगण्याची उमेद दिली आहे.

दिव्यांग बंधु-भगिनींचे जीवन अधिक सुलभ, अधिक सुखावह आणि सन्मानजनक करण्याची हमी देणे हे आमच्या सरकारचे मुख्य तत्त्व आहे. त्या तत्त्वानुसारच आम्ही Persons with Disabilities Act या कायद्याची अंमलबजावणी केली. या ऐतिहासिक कायद्याने दिव्यांगत्वाच्या व्याख्येची व्याप्ती वाढवली आहे. त्यामुळे आधी अपंगत्वाचे ७ प्रकार होते जे आता २१ झाले आहेत. ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या पीडितांचा समावेश पहिल्यांदाच दिव्यंगत्वाच्या व्याख्येच्या कक्षेत केला गेला आहे. हा कायदा म्हणजे दिव्यांगजनांना अधिक आत्मनिर्भर आणि सुकर आयुष्य जगता यावे, यासाठीचे एक शक्तिशाली साधन आहे. या कायद्यांमुळे दिव्यांगजनांच्या सामाजिक धारणाही बदलल्या आहेत. आज आपले दिव्यांग बंधू-भगिनी समृद्ध भारताच्या विकासात पूर्णपणे योगदान देत आहेत.

समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे कोणती ना कोणती तरी विशेष प्रतिभा असते, आपण फक्त ती प्रकाशात आणण्याची गरज असते, हे आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाने सांगितले आहे. दिव्यांग मित्रांच्या असामान्य क्षमतेवर मी नेहमीच विश्वास ठेवला आहे आणि गेल्या दशकभरात माझा हा विश्वास अधिक गाढ झाला आहे हे मी अभिमानाने सांगतो. पॅरालिम्पिक पदकांची लयलूट केलेले आपले खेळाडू जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून आला. मन की बात कार्यक्रमात जेव्हा जेव्हा माझ्या दिव्यांग बंधु-भगिनींच्या प्रेरणादायक यशोगाथा मी सांगतो तेव्हा प्रत्येक वेळी माझे मन आनंदाने भारावून जाते. शिक्षण, क्रीडा वा स्टार्टअप्स, कोणतेही क्षेत्र असो विकासाच्या मार्गातील अडसर दूर करत दिव्यांगजन नवी उंची गाठताना दिसतात आणि देशाच्या प्रगतीत सक्रिय वाटा उचलतात.

२०४७ मध्ये आपण स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करत असताना आपले दिव्यांगजन अवघ्या जगासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून समोर येतील. हे लक्ष्य गाठण्यासाठी आपण आताच काम करण्याचा निर्धार करूया. एकत्रितपणे असा समाज तयार करूया जिथे कोणतेही स्वप्न आणि कोणतेही ध्येय अशक्य वाटणार नाही. तसे झाले तरच आपण खऱ्या अर्थाने समावेशक आणि विकसित भारताची निर्मिती करू शकू. या ध्येयपूर्तीसाठी दिव्यांग बंधु-भगिनींचा निश्चितच सिंहाचा वाटा असेल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा या विशेष दिनानिमित्त दिव्यांगजनांना माझ्या मनापासून शुभेच्छा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -