‘अंधारापासून प्रकाशाकडे, अज्ञानापासून ज्ञानाकडे’

  38

प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


अशी यात्रा घडवून आणतं संतसाहित्य! यातील ‘गीता’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांचा आपण विचार करतो आहोत. हे केवळ ग्रंथ राहत नाहीत, ते ज्ञान देणारे साक्षात गुरू होतात. यात अर्जुनाच्या निमित्ताने माणसाच्या आयुष्यात अपेक्षित परिवर्तन दाखवलं आहे. पण हे परिवर्तन एकदम होत नाही, ते टप्प्याटप्प्याने होतं. या टप्प्याची सुंदर चित्र ज्ञानदेव साकारतात. याचं प्रत्यंतर देणाऱ्या अठराव्या अध्यायातील अद्भुत ओव्या आता पाहूया. ‘मी म्हणजे माझा देह नाही’ ही जाणीव साधकाला होते. मग त्याचा कर्तेपणाचा अभिमान नाहीसा होतो. हा ज्ञानमार्गाचा प्रवासी होय. देहाचा अभिमान नष्ट झाला तरी त्याच्याकडून कर्म होत असतात. हे तत्त्व स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवांनी असे अप्रतिम दृष्टान्त
दिले आहेत!


‘वारा वाहण्याचा जरी बंद झाला, तरी झाडांचे हलणे बंद होत नाही, अथवा कापूर जरी संपला तरी करंड्यात वास शिल्लक असतो.’ ‘गाण्याचा समारंभ संपला तरी गाणं ऐकून मनाला झालेल्या आनंदाचा भर जसा कमी होत नाही, किंवा पाण्याने जमीन ओली होऊन पाणी कमी झाले तरी जशी त्याची ओल मागे राहते.’ ‘अरे, सूर्य मावळल्यावर संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशात सूर्याच्या ज्योतीचे तेज (संधिप्रकाश) जसे दिसते.’ ओवी क्र. ४२३ ते ४२५


या प्रत्येक दाखल्यात किती अर्थ भरला आहे आणि सुंदरतादेखील! वारा हे एक तत्त्व आहे. ‘वाहणं’ हा त्याचा गुणधर्म आहे. पण झाडांतून वारा वाहायचा थांबला, तरी झाडांचे हलणे बंद होत नाही, कारण त्याने झाडाला गती दिलेली असते. त्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती झालेल्या माणसाचा ‘मी’ पणाचा वारा वाहायचा थांबतो, पण त्याच्याकडून कर्म होत राहतात. इथे माऊलींनी ‘वारा’ म्हणजे स्पर्श संवेदना वापरली आहे. यानंतर येते गंध संवेदना होय. कापूर जळून गेला तरी त्याचा गंध उरतो. त्याप्रमाणे साधकाचा देहाचा अभिमान नाहीसा होतो, तरी तो शरीराने कर्म करीत असतो.


यापुढील दृष्टान्तात येते ‘नाद’ ही संवेदना. गाण्याचा समारंभ संपला तरी त्यातून मिळालेला आनंद मागे राहतो. त्याप्रमाणे साधकाचं ‘मी’ पण सरलं तरी शरीराकडून व्यवहार / क्रिया होत राहतात. यापुढील दाखला अगदी अप्रतिम! पाण्याने जमीन ओली होणे याचा अर्थ साधकाचा जीवनप्रवाह सुरू असणे, पाणी कमी होणे म्हणजे त्याची आसक्ती नाहीशी होत जाणे, कर्म ‘मी’ केले हा अभिमान नाहीसा होणे. तरीही ओल कायम राहणे म्हणजे जीवनव्यवहार चालू असणे होय. ही अर्थपूर्ण ओवी अशी-


कां सरलेया गीताचा समारंभु। न वचे राहिलेपणाचा क्षोभु।
भूमी लोळोनि गेलिया अंबु। वोल थारे॥’ ओवी क्र. ४२४
‘क्षोभु’ शब्दाचा अर्थ भर, ‘न वचे’ म्हणजे जात नाही. ‘अंबु’ म्हणजे पाणी तर ‘वोल’ शब्दाचा अर्थ ओलावा असा आहे. ज्ञानदेवांनी या ओवीत किती सुंदरतेने परिवर्तनाचे चित्र रेखाटले आहे ‘भूमी लोळोनि गेलिया अंबु’ अशा शब्दांत! ‘लोळणं’ हे क्रियापद आपल्याला आठवण करून देते लहान मुलांची! ती जमिनीवर लोळतात. इथे लोळणारा आहे पाण्याचा थेंब.
‘ही ज्ञानदेवांची तरल कल्पनाशक्ती सुंदरतेने साकारते गीतेची उक्ती!’


manisharaorane196@ gmail.com

Comments
Add Comment

Horoscope: जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार या राशींचे अच्छे दिन, होणार प्रचंड धनलाभ

मुंबई: ३० जूनपासून नव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. हा आठवडा ३० जून ते ६ जुलैपर्यंत असणार आहे. ज्योतिष

Vastu shastra: ही कामे तुम्हाला बनवू शकतात कंगाल, कधीच करू नका

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या कर्मावर त्याला त्याचे फळ मिळत असते. काही कामे केल्याने नकारात्मक ऊर्जा

शरीर साक्षात परमेश्वर

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत रूपे अनंत वेषे अशी परमेश्वराची रूपे आहेत. अनंत कोटी

मंत्र वारीचा

ऋतुराज : ऋतुजा केळकर मंत्र वारीचा संतांच्या पायधूळीतून भिजतो मातीचा जीव... शब्दांच्या ओवाळणीतून गुंफतो भावाचा

स्वामी विवेकानंद : एक थोर युगपुरुष

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य ज्यांच्या विचारांनी सतत नवी ऊर्जा मिळते असे युवकांचे प्रेरणास्थान व आपल्या

ब्रह्मर्षी भृगू

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी महर्षींणा भृगुरहं गिरामस्येकमक्षरम्। गीता अ.१०,२५ भगवद्