हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई : सध्या हिवाळी मोसमाला सुरुवात झाली आहे. माञ काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे (Fengal Cyclone) राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी (Rain) कोसळल्या, अशातच अजूनही फेंगल चक्रीवादळाचा जोर कायम असल्याचे दिसून येत आहे. फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही (Maharashtra Weather) तडाखा दिला असून येत्या २४ तासांत कमी दाबाचा पट्टा कमकूवत होणार आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार (Rain Alert) असल्याचे हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होता. आता आज पावसाचा जोर काहीसा वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार असून पुणे व सातारा घाट परिसरात मुसळधार पाऊस येणार आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रात आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला असून बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे.