नाशिक : जिल्ह्यामध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे(Unseasonal Rain) मोठे नुकसान झाले असून त्याचा फटका द्राक्ष कांदा व इतर पिकांनाही बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागांमध्ये पाऊस पडला आहे.
दोन-तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. फेगान चक्रीवादळामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात येत होते. परंतु गुरुवारी मात्र नाशिक जिल्ह्यातील नाशिक सह इगतपुरी त्रंबक बागलाण सटाणा मालेगाव चा काही भाग नांदगाव येवला सह इतर काही भागांमध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अचानक पहाटेच्या वेळी आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली तर शहरांमध्ये सकाळी कामासाठी जाणाऱ्या आणि इतर व्यवसायिकांची चांगलीच धावपळ झाली.
आधीच परतीच्या पावसाने हाहाकार केला होता. त्यातून कसाबसा शेतकरी वर्ग सावरत असताना, वाचलेल्या पिकांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत यातून मार्ग काढत थोड्या प्रमाणात का होईना हातात दोन पैसे मिळतील, या आशेवर जगात असताना आज आलेल्या अवकाळी पावसामुळे हातचे आलेले पीक देखील वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
परतीच्या पावसामुळे जे अतोनात नुकसान झालेले होते त्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय सोपस्कार पूर्ण करून तत्परता दाखविण्यात आली, आचारसंहिताचे कारण दाखवून वेळ मारून नेण्यात आली, त्याचा एक रुपयांही मदत रुपी मिळालेला नसताना,पीक विमा कंपनीने डोळ्यांवर पट्टी बांधून घेतलेली दिसत आहे. पीक विमा कंपनीकडून काही मदत मिळेल अशी कोणतीच आशा दिसत नाही.
ज्या प्रकारे सर्वच शेतकरी वर्ग लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींच्या पाठीशी भक्कम पणे उभा राहिला. त्याची परतफेड करण्याची याहून मोठी संधी कुठलीच नसेल, याची जाण ठेवून लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी आवाज उठवून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पीक विमा कंपनीकडून लवकरात लवकर पीक विमा मंजूर घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
बागलाण तालुक्यात तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते. तसेच दिवस भर धुके पसरलेले असायचे मात्र उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात येत होते. हवामान विभागाचे सर्व अंदाज खोटे ठरवत आज गुरुवारी सकाळी सात वाजता अचानक मुसळधार स्वरूपात अवकाळी पावसाला सुरवात झाली. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची झोपच उडाली.
कांदा रोपांचे नुकसान होणार
आधीच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे कांदा, कांदे रोप, मका, पिकांचे नुकसान झाले होते. रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी महागड्या दराने बियाणे खरेदी करून कांदा रोप टाकले आहे.या अवकाळी पावसाने कांदा रोप खराब होऊन नुकसान होणार आहे.आधीच्या नुकसानग्रस्त पिकांची भरपाई मिळाली नसतांना पुन्हा नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे.
– सुनील बागुल , शेतकरी,पिंपळदर