टीव्ही आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावापुढे दिवसेंदिवस वाचन कमी होत आहे. विद्यार्थी व तरुणांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, वाचनाची सवय लागावी म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने वाचन महोत्सवासारखे उपक्रम सुरू केले. या उपक्रमात राज्यभरातून ऐंशी लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले असले तरी मुंबई, ठाणे, पुणे अशा महानगरात वाचन महोत्सवात सहभागी होणाऱ्या मुलांची टक्केवारी तुलनेने खूपच कमी असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे हा राज्यातील प्रगत पट्टा आहे. सर्वाधिक विकास या भागात आहे. सर्वाधिक सोयीसुविधा याच पट्ट्यात आहेत. सर्वाधिक दर्जेदार शिक्षणसंस्था, पायाभूत सेवा, सर्वाधिक गुंतवणूक व सर्वाधिक रोजगार या टापूत आहे. मग या भागात विद्यार्थ्यांना वाचनात फारसा रस का नसावा? केवळ व्हॉट्सअॅप, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम म्हणजे सर्व जग आहे व सोशल मीडिया म्हणजे जागतिक ज्ञानाचे भांडार आहे, अशा समजुतीत युवा पिढी असेल तर ती चुकीच्या मार्गावर जात आहे.
शिक्षक, पालक आणि समाजिक संस्थांनी वेळीच या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून विद्यार्थीदशेत वाचनाची सवय कशी लागेल, वाचनाची गोडी कशी वाढेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी वर्गात वाचनाची गोडी वाढावी यासाठी पालक, शिक्षकांनी व समाजातील घटकांनी जाणीवपूर्वक उपक्रम राबवले पाहिजेत. माध्यमांनीही म्हणजेच वृत्तपत्रांनीही अशा मोहिमेत सक्रिय सहभागी झाले पाहिजे. कोविड काळापासून राज्यात वृत्तपत्रांचे खप घसरले. कोविड काळ संपल्यावरही घरोघरी रोज सकाळी जाणाऱ्या पत्रांवरही परिणाम झाला. वृत्तपत्रे हवीत कशाला, जे वाचायचे ते सोशल मीडियावर सहज मिळते, अशी मानसिकता बळावली. अनेकजण क्रीडा, मनोरंजन, अध्यात्म, करिअर, विज्ञान, तंत्रज्ञान असे आवडीचे विषय सोशल मीडियावर शोधू लागले व त्यातच ते मश्गूल झाले. वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके यांचे वाचन कमी झाले तसेच पुस्तकांचे वाचन तर त्याहीपेक्षा कमी झाले. केवळ अभ्सासाची पुस्तके वाचायची म्हणजे वाचन नव्हे. विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन झाले पाहिजे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वाचनाची सवय लागली पाहिजे. विशेष म्हणजे शालेय जीवनातच वाचनाची गोडी लागली पाहिजे. शालेय शिक्षण विभागाने महावाचन उपक्रम सुरू केला तो स्वागतार्ह आहे. पण या उपक्रमात जास्तीत जास्त नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे, अशी तयारी झाली पाहिजे. मुंबईमध्ये सर्व सोयी, सेवा उपलब्ध आहेत, तरीही मुंबईच्या उपनगरातील अकरा लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेतीन लाख सहभागी होतात हे मुंबईला मुळीच भूषणावह नाही. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर जिल्हा महावाचन उपक्रमात ३०व्या क्रमांकावर आहे, हे लांच्छनास्पद आहे. मुंबई लगत असलेला ठाणे जिल्हाही महावाचन उपक्रमात २४ व्या क्रमांकावर आहे, या जिल्ह्यातील तेरा लाख विद्यार्थ्यांपैकी पाच लाखसुद्धा या उपक्रमात सामील झाले नव्हते. मुंबई शहराने मात्र पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये चौथा क्रमांक मिळवला आहे ही समाधानाची बाब आहे.
मुंबई शहरातील ७६ टक्के मुलांनी वाचन उपक्रमात भाग घेतला, अर्थात त्यावर आपण खूप काही साध्य केले असे न मानता ही टक्केवारी शतप्रतिशत कशी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महावाचन उपक्रमात राज्यातील एक लाखाहून अधिक शाळांनी सहभाग घेतला ही आनंदाची बाब असली तरी सर्व शाळा व सर्व विद्यार्थी वाचनाकडे आकर्षित होतील यासाठी सामाजिक खासगी संस्थांना बरोबर घेऊन शाळांनी प्रयत्न केले पाहिजेत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्याने महावाचन उपक्रमात पहिला क्रमांक पटकावला आहे ही कौतुकाची बाब आहे, पण पुणे जिल्ह्याने शेवटचा क्रमांक मिळवला याला काय म्हणावे? राज्यात या वर्षी लोकसभा व विधानसभा अशा दोन मोठ्या निवडणुका झाल्या. निवडणुकीच्या व राजकीय रणधुमाळीच्या धामधुमीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे अखंड वाचन यज्ञ उपक्रम पार पडला. मुलांमध्ये वाचनाची गोडी लागावी म्हणून अक्षरमंच, फ्रेंडस लायब्ररी किंवा राज्ञीसारख्या असंख्य समाजसेवी संस्था वर्षभर वेगवेगळे उपक्रम मुंबई परिसरात राबवत असतात. वाचनाची गोडी वाढावी म्हणून वाचन यज्ञ केवळ ठाणे, कल्याण-डोंबिवली पुरते मर्यादित असता कामा नये. मुंबईच्या उपनगरात तसेच राज्यात जिल्हा व तालुका पातळीवरील अखंड वाचन यज्ञ योजले पाहिजेत. कल्याण येथे अखंड वाचन यज्ञ ५० तास चालला, एकत्रित २०० तास वाचन झाले. जयवंत दळवी वाचन नगरी, वीणा देव किंवा सुधा करमरकर वाचन कट्टा अशा नामवंत लेखकांच्या नावाने उभारलेल्या मंचावर हे वाचन यज्ञ पार पडले. या वाचन यज्ञात १८ सामाजिक संस्था व २ शाळांनी भाग घेतला हे कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे भिवंडीच्या कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग अभिनंदनीय आहेच पण इतरांनाही त्यापासून स्फूर्ती मिळावी. शाळा-कॉलेजमधील तरुण मुले राजकीय नेत्यांच्या मागे धावताना दिसतात. त्यांच्या मिरवणुका, त्यांचे मोर्चे, त्यांच्यासाठी झिंदाबाद, मुर्दाबादच्या घोषणा, गुलाल उधळणे, गाण्यांवर नाचणे, यात हजारो मुलांचे करिअर कोणत्या दिशने जाते, याचा विचार करायला कुणाला वेळ नसतो. राजकीय नेत्यांना त्यांच्या पुढे-मागे नाचणारी व घोषणा देणारी तरुणांची फौज पाहिजेच असते. तरीही पालक, शिक्षक व सामाजिक संस्थानी सुसंस्कारीत व सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी वाचन संस्कृती कशी वाढेल यासाठी प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत.