सुमारे आठ हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत
मुंबई (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता पालिका सज्ज झाली असून. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान‘राजगृह’ यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अनुयायांकरिता जलप्रतिबंधक निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, निरीक्षण मनोरे, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वच्छता, आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार या अनुषंगाने सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून समाजमाध्यमांद्वारे देखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी आज आढावा घेतला.
मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी आवश्यक नागरी सेवा-सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही. आय. पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह मोबाइल चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून यासाठी सुमारे आठ हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे पायवाटांवर धूळ प्रतिबंधक आच्छादनाची व्यवस्था सुमारे १८ हजार ५०० चौरस मीटर इतक्या क्षेत्रात करण्यात आली आहे. तसेच जलफवारणी आणि स्वच्छतेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्यासोबतच स्वच्छता राखण्यासाठी वाहने आणि कर्मचारी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
शौचालये आणि स्नानगृहांचीही व्यवस्था मैदान परिसरामध्ये करण्यात आली आहे. ‘भीमा तुम्हा वंदना’ या या शीर्षकाखालील माहिती पुस्तिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित अभिवादनपर गीते ही यंदाच्या पुस्तिकेची मध्यवर्ती संकल्पना असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित अशा गीतांचा समावेश पुस्तिकेत करण्यात आला आहे.
जवळपास ८ हजार मनुष्यबळ या सर्व सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी कार्यरत असते. त्यासोबतच पालिकेतर्फे करण्यात आलेल्या वैद्यकीय चिकित्सा सुविधेमध्ये ३ कक्ष उभारण्यात येणार आहेत. तसेच ११ रूग्णवाहिकांची उपलब्धताही करून देण्यात आली आहे. मैदान परिसरात अनुयायांच्या सुविधेसाठी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण वैद्यकीय आणि सहायक वैद्यकीय कर्मचारी मिळून ५८५ मनुष्यबळ यंदा कार्यरत असणार आहे. गतवर्षी एकूण १३ हजार ८२४ अनुयायांनी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारांचा लाभ घेतला होता