१७ देशांत फैलाव, आजारामध्ये मृत्यू ओढवण्याची शक्यता ५० टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आफ्रिकेतील रवांडा या देशात ‘ब्लिडिंग आय’ नावाच्या एका विषाणूची साथ पसरली असून या आजारामुळे आतापर्यंत १५ लोकांनी जीव गमावला आहे. गंभीर बाब म्हणजे आफ्रिकेतील १७ देशांत हा आजार पसरला आहे. यातील सर्वाधिक चिंतेची बाब अशी की या आजारामध्ये मृत्यू ओढवण्याची शक्यता ५० टक्के इतकी जास्त आहे, त्यामुळे पृथ्वीवरील माणसांना प्रादुर्भाव होत असलेल्या विषाणूंतील हा सर्वांत घातक विषाणू मानला जात आहे. कोरोना महामारीतून सावरलेल्या जगासमोर नव्याने आव्हान उभे राहिले आहे.
या विषाणूचे नाव मारबर्ग असे आहे. हा आजार रवांडासह बुरांडी, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, काँगो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, गॅबॉन, केनया, युगांडा, बोलिव्हिया, ब्राझिल, क्युबा, डोमेनिकन रिपब्लिक, इक्वेडर, गयाना, पनामा आणि पेरू या देशात ही साथ पसरलेली आहे. ब्रिटनने या देशांत जाण्यासाठी प्रवास मार्गदर्शिक लागू केलेली आहे. मारबर्गच्या बरोबरीनेच या देशांत क्लेड वन आणि ओरोपाऊच फिव्हर हे दोन आजारही फैलावले आहेत.
जगात कोरोना सारख्या महामारीमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर कोरोनावरील वॅक्सीन येईपर्यंत जगभरातील लोकं जीव मुठीत घेऊन जगत होती. कोरोना विषाणू मुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. कोरोनामुळे आजही लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोना जरी गेला असला तरी इतर आजारांना तो देऊन गेलाय. त्यातच आता नव्या विषाणूने जगाच्या चिंता वाढवल्या आहे. डोळ्यातून रक्तस्त्राव होणारा हा विषाणू आहे. यामुळे डोळ्यांतून रक्तस्त्राव होतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. हा एक गंभीर आजार मानला जात आहे.
‘ब्लिडिंग आय’ म्हणजे काय?
मारबर्ग हा विषाणू आहे, यापासून माणसांना मारबर्ग हॅमरेज फिव्हर हा जीवघेणा आजार होतो. एक प्रकारच्या वटवाघळांत हा विषाणू नैसर्गिकरीत्या सापडतो. या आजारासाठी इनक्यूबॅटीनचा कालावधी २ ते २१ दिवस आहे. सुरुवातीला तीव्र ताप, डोकेदुखी आणि अस्वस्थ वाटणे ही लक्षणे दिसतात. तर पाचव्या दिवसांपासून रुग्णात रक्तस्रावाची लक्षणे दिसू लागतात. उलटी, शौचातून रक्त पडणे, नाक, कान, डोळे, तोंड आणि हिरड्यांतून रक्तस्राव होणे अशी लक्षण दिसू लागतात. सर्वसाधारणपणे आठव्या किंवा नवव्या दिवशी रुग्ण दगावण्याची शक्यता सर्वाधिक असते.
हा आजार कसा पसरतो?
‘ब्लिडिंग आय’ आजार माणसांकडून फैलवतो. बाधित व्यक्तीच्या शरीरातील स्रावांच्या संपर्कात आल्याने हा आजार होतो. ‘ब्लिडिंग आय’ या आजारावर कोणतेही व्हॅक्सिन किंवा विषाणूविरोधी उपचार उपलब्ध नाहीत. रुग्णांना दिसत असलेल्या लक्षणांनुसार उपचार केले जातात.