मुंबई: भारतीय क्रिकेट संघ यावेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारताने पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी हरवले होते. यासोबतच भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघादरम्यानचा दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरला अॅडलेडच्या ओव्हल मैदानात गुलाबी बॉलने खेळवला जाणार आहे. याआधी आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपबाबत भारतीय संघासाठी चांगली बातमी समोर आली आहे.
इंग्लंडने मालिकेच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला ८ विकेटनी मात दिली. यामुळेच भारताचे WTC फायनलचे समीकरण थोडे सोपे झाले आहे.मात्र या दरम्यान आणखी एक बातमी आली आहे यामुळे भारतीय चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
ख्राईस्टचर्च कसोटीत स्लो ओव्हर रेटचे प्रकरण समोर आले आहे. या नियमाच्या उल्लंघनामुळे आयसीसीने न्यूझीलंड-इंग्लंडवर सामन्याच्या फीच्या १५ टक्के दंड ठोठावला आहे. यासोबतच डब्लूटीसी अंतर्गत दोन्ही संघांचे ३ गुणही कापण्यात आले आहेत. यामुळेच भारतीय संघाला बंपर फायदा झाला आहे.
पर्थ कसोटीच्या सुरूवातीला भारतीय डब्लूटीसी फायनलमध्ये सहज पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असा विजय हवा होता. मात्र आता ते मालिकेत ३-० अशा विजयानेही पोहोचू शकतील. म्हणजेच भारतीय संघाचे लक्ष्य आता ४ पैकी कमीत कमी २ सामन्यांत विजय मिळवणे आहे.