
मुंबई (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. सध्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असून कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदावरून मोठं वक्तव्य केलंय. शिवसेनेइतकीच मंत्रीपदं आम्हाला मिळावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार यांच्या सोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत स्ट्राइक रेटबाबतचा विषय निघाला. राज्यात एक नंबर भाजप आहे तर दोन नंबरला आम्ही आहोत आणि तीन नंबरला शिंदेंची शिवसेना आहे. त्यामुळे स्ट्राइक रेट चांगला असून शिवसेनेइतकीच मंत्रीपदं आम्हाला मिळावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दोन दिवसात मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.
काही संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ यांचे नाव आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, हे मी तुमच्याकडून ऐकतोय. मला देखील काही जणांनी नाव पाठवलेत पण हे सगळं अंदाज आहेत. आमचे नेते अजित दादा आहेत, ते स्वतः फोन करून सांगतील तेव्हा ते खरं आहे.