Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीश्रीवर्धन हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना घेतले ताब्यात

श्रीवर्धन हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना घेतले ताब्यात

अलिबाग (प्रतिनिधी) : श्रीवर्धनजवळील आराठीतील रामदास गोविंद खैरे यांच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना घेतले ताब्यात घेतले आहे. या दोन आरोपींमध्ये हर्षल कचर अंकुश (वय ३२ वर्षे) आणि एका महिलेचा समावेश आहे.

श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक रिकामे यांना मिळालेल्या माहितीनुसार ते आपल्या पथकासह मृत रामदास गोविंद खैरे (वय-७२) हे ज्या कुंदन रेसिडन्सीत राहत होते. तेथे जाऊन पाहणी केली असता, मृताच्या डोक्यावर व कपाळावर गंभीर जखमा दिसून आल्या. त्यावरून सदर इसमाचा खून झाल्याचा अंदाज बांधला आणि श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केल्यानंतर त्याची माहिती त्यांनी प्रभारी पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबतच्या सुचना दिल्या.

दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी शाखेचे सपोनि भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक रूपेश नरे व अंमलदार असे दोन पथकासह घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, सायबर पोलीस ठाण्याची मदत घेऊन तांत्रिक तपास सुरु केला. या तपासामध्ये संशयित वाटणारे आरोपी कल्याण येथील कळवा येथे व मुंबईतील चेंबुर याठिकाणी असल्याचे आढळून आले. मुंबईत राहणारी आरोपी महिला असल्याने तिच्या शोधकामी पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर, महिला पोलीस अंमलदार रेखा म्हात्रे, अस्मिता म्हात्रे व पथकासह रवाना करण्यात आले, तर कळवा याठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नरे व पथक रवाना करण्यात आले. सदर दोन्ही पथकांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी नामे हर्षल कचर अंकुश (३२ वर्षे) याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय या ठिकाणावरून, तर महिला आरोपीस पोलीस उपनिरीक्षक सरगर व महिला अंमलदार रेखा म्हात्रे, अस्मिता म्हात्रे यांनी चेंबूर या ठिकाणावरून ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींची केलेल्या चौकशीतही मृत इसम हे बॅंकेत नोकरीस होते. त्यांच्या दोन्ही बायका मृत झाल्यानंतर आणि मुलाचे लग्न झाल्यामुळे ते निवृत्तीकाळात एकाकी श्रीवर्धन राहत होते. त्यांनी कविता नावाच्या महिलेशी विवाह करण्याचे ठरविले; परंतु तिच्या मागण्या अवास्तव असल्याने तो विवाह झाला नाही. काही दिवसांनी कविताने तिच्या मैत्रिणीला रामदास यांचा मोबाईल नंबर देत संपर्क साधण्यास सांगितले. तिने रामदास यांना लुबाडण्याच्या उद्देशाने विवाह करण्याचे आमिष दाखिवले आणि त्यांच्याबरोबर राहत त्यांच्या घरातील दागिने व काही पैसे घेऊन ती पसार झाली. रामदास यांनी या महिला आरोपीस फोन करून दिलेले पैसे व दागिने परत करावे म्हणून वारंवार मागणी केली. तिने त्याकडे दुर्लक्ष करीत दुसऱ्या नवऱ्याच्या मदतीने रामदास यांचा काटा काढून तेथून पोबारा केला. दोन्ही आरोपी श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून, या गुन्हयाचा तपास श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सविता गर्जे या करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -