मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पहिल्यांदाच धारावी पुनर्विकास प्रकल्पात आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे सर्वेक्षण व नोंदणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षमपणे होणे हाच या तंत्रज्ञानाच्या वापराचा उद्देश आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांचे सर्वेक्षण हे टोटल स्टेशन सर्व्हे आणि दस्तऐवजांची पडताळणी यांसारख्या पद्धतींवर अवलंबून होते. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणारा धारावी हा पहिला पुनर्वसन प्रकल्प आहे.
मात्र, धारावी पुनर्विकास प्रकल्पात ड्रोन, लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग (लायडार ) तंत्रज्ञान आणि मोबाईल ऍप्लिकेशन्सचा वापर करून माहिती डिजिटल पद्धतीने गोळा करण्यात येते आणि नंतर तिचे विश्लेषण केले जाते. यामुळे धारावीचे ‘डिजिटल ट्विन’ प्रारूप तयार होत आहे. म्हणजेच धारावीचे आभासी प्रतिरूप, जे माहितीचे सखोल विश्लेषण करण्यासाठी व निर्णय प्रक्रिया सुयोग्य करण्यासाठी उपयोगी पडणार आहे, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी संबंधित अधिकाऱ्याने दिली.
‘लायडार’ हे रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारलेले आहे. वेगाने भू-स्थानिक डेटा गोळा करण्यासाठी हे ओळखले जाते. यात लेसर लाईटद्वारे अंतर मोजले जाते आणि भूभाग, इमारती आणि वस्तूंचे अचूक ३डी प्रतिरूप तयार करण्यात येते. धारावीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये फिरण्यासाठी सध्या पोर्टेबल लिडार प्रणाली वापरली जात आहे. ड्रोनद्वारे आकाशातून दृश्यं टिपली जात आहेत. ज्यामुळे धारावीचे नकाशे तयार करणे आणि नियोजन सोपे होते. त्याचबरोबर, घरोघरी जाऊन डेटा गोळा करण्यासाठी मोबाईल ॲप्सचावापर केला जात आहे. या ॲप्समुळे माहितीची अचूकता वाढत असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहणे किंवा डेटा गमावण्याची शक्यता कमी झाली आहे.