Wednesday, January 15, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखबरे झाले, बाबा आढावांनी, उपोषण सोडले

बरे झाले, बाबा आढावांनी, उपोषण सोडले

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी लोकशाही वाचविण्यासाठी आत्मक्लेष म्हणून पुण्यात तीन दिवसांचे उपोषण केले, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला हळहळ जरूर वाटली. असे बाबांनी करायला नको होते, अशीच सर्वसामान्य जनतेत भावना होती. बाबांचे वय ९५ आहे. बाबा हे गोरगरीब जनतेचे आदर्श नेते आहेत. कामगार, मजूर, उपेक्षित जनतेचा आधार म्हणून बाबांकडे पाहिले जाते. गोरगरिबांना दोन घास सुखाने व हक्काने मिळावेत म्हणून, आजवर बाबांनी त्यांच्या जीवनात शेकडो आंदोलने केली. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने जो कौल दिला, तो बाबांना पसंत पडला नसावा. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाआघाडीचे ३१ खासदार निवडून दिले आणि महायुतीचे केवळ १७ खासदार लोकसभेवर पाठवले. या निवडणुकीत मतदारांनी भाजपाचे केवळ ९ खासदार विजयी केले व त्या पक्षावर आपला राग व्यक्त केला. मग त्याच भाजपाचे विधानसभा निवडणुकीत १३२ आमदार कसे निवडून येतात, भाजपाप्रणीत महायुतीचे २३५ आमदार कसे विजयी होतात, या प्रश्नाने अनेकांना भंडावले आहे तसेच बाबा आढावांनाही अस्वस्थ केले असावे. बाबा हे कट्टर समाजवादी विचारसरणीचे आहेत. त्यांनी आपले विचार कधी बदलले नाहीत. सत्ता बदलली म्हणून बाबांनी कधी आपल्या निष्ठा बदलल्या नाहीत. लढाऊ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस हे भाजपाप्रणीत एनडीए सरकारमध्ये सामील झाले होते. ते वाजपेयी यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते, एवढेच नव्हे तर एनडीएचे निमंत्रक म्हणून त्यांनी काम पाहिले. जॉर्ज यांनी कधी भाजपावर जातीयवादी म्हणून टीका केली नाही किंवा हिंदुत्ववादी म्हणून भाजपाची हेटाळणी केली नाही. एनडीएच्या काळात तर संकटमोचक हनुमानाच्या भूमिकेत ते मित्रपक्षांच्या नेत्यांचे रुसवे-फुगवे काढत असत. समता, ममता आणि जयललिता यांना संभाळून एनडीए सरकार चालविणे ही मोठी कसरत होती. पण निमंत्रक म्हणून समाजवादी विचारांचे जॉर्ज फर्नांडिस शांतीदूत म्हणून काम करीत असत. नितीशकुमार हेसुद्धा समाजवादी विचारांचे नेते.

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून मोठे झालेले नेते. ते अनेक वर्षे एनडीएमध्ये आहेत. मध्यंतरी ते काँग्रेस व लालू यादव यांच्यासोबत गेले होते; पण नंतर त्यांना पश्चात्ताप झाला व हे समाजवादी वीर पुन्हा मोदी-शहांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन एनडीएमध्ये आले. भाजपानेही त्यांच्या पक्षाचे आमदार कमी असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिहारमध्ये येऊ नका असे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सांगणारे नितीशकुमार आता जाहीर सभांतून त्यांना वाकून वंदन करतात. आपण एनडीए सोडून जाणार नाही, याची ग्वाही देतात. महाराष्ट्रात १९७८ मध्ये शरद पवारांनी स्थापन केलेल्या पुलोदमध्ये काँग्रेस, समाजवादी, तेव्हाचा जनसंघ, शेका पक्ष, डावे पक्ष सहभागी झाले होते. सरकारमध्ये अडीच वर्षे समाजवादी जनसंघाबरोबर आनंदाने नांदत होते. तेव्हा बाबांना काहीच खटकले नव्हते. आजही उत्तर प्रदेशात अखिलेश यादव व बिहारमध्ये लालू यादव व त्यांचे पुत्र समाजवादी विचाराची ढाल पुढे करून मुस्लिमांची व्होट बँक संघटित कशी राहील याची दक्षता घेत आहेत. दोन्ही समाजवादी नेते हिंदू विरोधी राजकारण खेळत आहेत. राम मंदिराला विरोध म्हणजे लोकशाही वाचविणे असा त्यांचा अजेंडा आहे. मुस्लीम व्होट बँक आणि भाजपाविरोध या दोन मुद्द्यांवर ते आपला पक्ष रेटताना दिसत आहेत. केवळ भाजपा व हिंदू विरोध म्हणजे समाजवादी विचार का?

बाबा आढावांनासुद्धा विधानसभेच्या निकालानंतर लोकशाही धोक्यात आली असे अचानक कसे वाटू लागले? लोकशाही वाचविण्यासाठी ते आत्मक्लेष करून घेण्याच्या विचारापर्यंत का गेले, हे सर्व अनाकलनीय आहे. बाबा आढावांसारखी अनुभवसंपन्न व वैचारिक बांधिलकी असलेली व्यक्तिमत्त्वे फारच थोडी आहेत. त्यांना पुरेशी माहिती न दिल्यामुळे ते लोकशाही वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले असावेत. विधानसभेच्या निकालानंतर मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली, भाजपाचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने कसे निवडून आले, राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण असताना महायुतीला अभूतपूर्व यश कसे मिळाले? अशा प्रश्नांनी महाआघाडीने राज्यात काहूर उठवले आहे. पण लाडकी बहीण व ओबीसी या दोन मोठ्या व्होट बँका महायुतीकडे एकजुटीने विधानसभा निवडणुकीत वळाल्या, हे कोणी समजून घ्यायला तयार नाही. ईव्हीएम नको, मतपत्रिका पुन्हा आणा अशी मोहीम महाआघाडीतील घटक पक्षांनी जोरदार सुरू केली आहे. ईव्हीएम मशीन काय भाजपाने आणले आहे काय? लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला या ईव्हीएमने भरघोस यश दिले तेव्हा ईव्हीएम चांगले होते. आता विधानसभा निवडणुकीत महाघाडीचे पानिपत झाले तेव्हा ईव्हीएम एकदम वाईट ठरवले जाऊ लागले. बाबा आढाव यांनी सार्वजनिक जीवनात सर्वाधिक लढे हे काँग्रेस सत्तेवर असताना दिले. त्याच काँग्रेसचा विधानसभेत दारुण पराभव झाला म्हणेज लोकशाहीचा पराभव झाला असा समज कोणी बाबांना करून दिला आहे का? १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार होते, त्याच काँग्रेस सरकारने देशावर आणीबाणी लादली होती, विरोधी पक्षांचे सर्व लहान-मोठे नेते तुरुंगात डांबले होते. स्वत: बाबा आढाव यांनाही काँग्रेस सरकारने जेलमध्ये टाकले होते. तेव्हा काँग्रेसने आणीबाणीच्या माध्यमातून संविधानावर व लोकशाहीवर घाला घातला. आणीबाणी लादणारे, आणीबाणीची अंमलबजावणी करणारे, आणीबाणीचे समर्थन करणारे व एकोणीस महिने तुरुंगवास भोगलेले असे सर्व एकत्र येऊन लोकशाही वाचवा असा टाहो फोडत आहेत, याचे मोठे आश्चर्य वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -