Friday, January 17, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखWinter Season : तापलेले राजकारण अन् गारठलेली जनता

Winter Season : तापलेले राजकारण अन् गारठलेली जनता

राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. निकालही जाहीर झाले. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला नाकारत महायुती सरकारला भरभरून मतदान केले. महायुतीला महाराष्ट्रीय जनतेने इतके भरभरून प्रेम केले आहे की, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदही मिळविणे शक्य झाले नाही. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची एकत्रितरित्या जागांची बेरीज केली तरी शिंदेंच्या शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे. महायुतीला सर्वाधिक जागा मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा घोळ सुरू असल्याने निकाल लागून आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्रीपदासाठी नाव अजून जाहीर झालेले नाही. केवळ शपथविधीची वेळ आणि स्थळ जाहीर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकारणात गरमागरमी सुरू असून अनेक आमदारांची मंत्रीपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

राज्यातील राजकारणात उकाडा असला तरी महाराष्ट्रातील जनतेला गुलाबी थंडीचे बोचकारे सहन करावे लागत आहेत. राज्यात ऑक्टोबर महिन्यात उकाडा वाढला होता. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे थंडी कधी पडणार असा प्रश्न सर्वांना पडत होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागात थंडीचा प्रभाव वाढला असून ठिकठिकाणी सकाळच्या वेळी शेकोट्याही पेटलेल्या दिसत आहेत. राज्यातील राजकारण तापलेलं असताना राज्यात थंडीने मार्केट जाम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून उभा, आडवा महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. राजस्थान व अन्य ठिकाणी बर्फ पडल्याने आपल्या राज्यात थंडीचे प्रमाणही वाढीस लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्री थंडीचा अंमल होताच, पण आता दिवसाही थंडीचा दरारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे घरामध्ये अडगळीत पडलेला स्वेटर आता दोन महिने भाव खावून जाणार आहे. राज्यात मुख्यमंत्री पदावरून राजकारण तापलेलं असताना थंडीने मार्केट जाम केले आहे. अवघा उभा-आडवा महाराष्ट्र थंडीच्या पट्ट्यात आला आहे. गावापासून ते शहरापर्यंत थंड हवेमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा अंमल होताच पण आता दिवसासुद्धा बोचरी, गुलाबी थंडी प्रत्येकाला जाणवत आहे. आता गेल्या आठ महिन्यांपासून अडगळीत पडलेल्या स्वेटरला आता भाव आला आहे. तर काही जणांनी ऊबदार कपड्यांसाठी बाजारपेठ जवळ केली आहे.

यंदा गारठा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वेटर, शाल, हातमोजे खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. बंगालच्या उपसागरावरील वादळी वाऱ्यांनी थंडीचा खलिता पाठवला आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींनी गारठ्याचे प्रमाण वाढवले आहे. बोचरी थंडी जाणवत असल्याने शुष्क, कोरडेपणा वाढत आहे. काहींना अंगाला खाज जाणवत आहे. या सर्व हवामान घडामोडींमुळे अनेकांचा वीकेंड एक तर उबदार कपड्यात अथवा पर्यटन स्थळी जाण्याची शक्यता आहे. या काळात हाडे गोठवणारी थंडी वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. महाबळेश्वर आणि इतर थंडीच्या ठिकाणांपेक्षा राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. यंदा थंडीचा कडाका दरवर्षीच्या तुलनेत लवकर जाणवत असून जानेवारीच्या मध्यापर्यंत थंडीचा तडाखा जास्त जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक शहरांमध्ये पारा घसरला असून थंडीत मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमानात घट होऊन ते एका अंकावरती आले आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या उर्वरित भागातही थंडीने जोर पकडला आहे. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरपेक्षाही अहमदनगर थंडीने गारठले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आता गारठा वाढला आहे. जळगाव, पुणे, सांगली, नागपूर, नाशिक आदि जिल्ह्यांत तापमान घसरले आहे. भारतात हवामानानुसार त्या त्या साहित्याची विक्री होत असते. अर्थात ही विक्री हंगामी असली तरी अर्थकारणातील आकडेवारी ही लाखोंच्या घरात असते. पावसाळ्यात छत्र्या, रेनकोट, पावसाळी चपला, बूट, गमबूट याची विक्री वाढते, तर हिवाळ्यात स्वेटर, हातमोजे, शाल व शहरी भागात शेकोटीसाठी लाकडे याची उलाढालमधील आकडेवारीदेखील अचंबित करणारी असते.

राज्यात तापमानामध्ये बदल झाल्याने काही भागात आजारांची साथ पसरली असून दवाखाने व रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दीही दिसत आहे. अनेकांना थंडी सहन होत नसल्याने घराघरामध्ये उकाडा निर्माण करणारे हिटरचे आगमन झाले आहे. ग्रामीण भागामध्ये मात्र बळीराजाला थंडी कितीही वाढली तरी पिकांना पाणी देण्यासाठी, खत टाकण्यासाठी, औषधांची फवारणी करण्यासाठी शेतामध्ये सकाळ, दुपार, सांयकाळी, रात्री-अपरात्री जावेच लागते. राज्यात थंडी कितीही वाढली तरी बळीराजाच्या इच्छाशक्तीला पराभूत करण्याची ताकद कोणत्याही थंडीमध्ये नसल्याचे आपणास वर्षानुवर्षे पाहावयास मिळत आहे, अनुभवयास मिळत आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा स्वत:च्या जीविताची पर्वा न करता ऊन, वारा, थंडीत जगाला अन्न-धान्य देण्यासाठी राबत असतो. पिकविलेल्या भाज्यांना, धान्याला बाजारभाव मिळेल की नाही याबाबत कोणतीही शाश्वती नसताना बळीराजा शेतात राबत असतो. राजकीय घडामोडींनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एकीकडे ढवळून निघालेले असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेवर वाढत्या थंडीमुळे गारठण्याची वेळ आली आहे. गुलाबी थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणारी मंडळी आता चहाच्या टपरीवर गर्दी करू लागली आहेत. थंडीमध्ये चहाचा आस्वाद घेणारी मंडळी राजकारणाच्या गप्पांमध्ये शाब्दिक वादविवाद करताना पाहावयास मिळत आहे. आपल्या देशात राजकारण हा असा एकमेव विषय आहे की, कडाक्याचे ऊन, मुसळधार कोसळधार, हाडे गोठविणारी थंडी असली तरी माणसे राजकारणाच्या विषयावर कित्येक तास बोलू शकतात. त्यांना वेळेचे बंधन नसते. सध्या महाराष्ट्रात वातावरणात गारठा आणि राजकारणात उकाडा असे दुहेरी चित्र निर्माण झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -