मुंबई: पर्थच्या मैदानावर झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं शानदार विजय मिळवला. आता ॲडलेड येथे ६ डिसेंबरपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. ही कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाईल. या सामन्यात भारतीय संघाला २०२० च्या पिंक बॉल कसोटीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल.
या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे(jasprit bumrah) मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराहनं २०२४ मध्ये आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले, ज्याच्या २० डावात गोलंदाजी करताना त्यानं ४९ बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी १५.२४ आणि स्ट्राईक रेट ३० एवढा राहिला. जसप्रीत बुमराह ५० कसोटी विकेटपासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यानं यावर्षी कसोटीमध्ये ४९ विकेट घेतल्या आहे. दुसऱ्या सामन्यात बुमराहनं एक विकेट घेताच तो २०२४ मध्ये ५० कसोटी विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनेल. या लिस्टमध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानं २०२४ मध्ये ४६ कसोटी विकेट घेतल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२०-२१ दौऱ्यात झालेल्या पिंक बॉल कसोटीत भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ३६ धावांवर ऑलआऊट झाली होती, जो भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोर आहे. त्यामुळे आता ॲडलेड येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटीत भारताला पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे.