रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa Highway) कोळंबे येथे संगमेश्वरपासून काही अंतरावर म्हात्रे कंपनीचा डंपर आणि दुचाकीमध्ये आज दुपारी अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार मुजीब सोलकर याचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकीला धडक बसल्यानंतर डंपरचालकाने तेथे न थांबता पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच कुरधुंडा गावासह परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मृत मुजीबचे कुटुंबीय तसेच नातेवाईक अपघातस्थळी जमा झाले. ही घटना दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडली. जे. एम. म्हात्रे कंपनीचा डंपर असून कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली.
डंपरचालक पळून गेला आणि कंत्राटदार कंपनीचे अधिकारी वेळीच घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे संतप्त जमावाने वाहतूक रोखून धरली. दोन तासानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.