प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
एका लहान मुलांच्या चित्रकलेच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गेले होते. ‘निसर्ग’ हा विषय त्यांना दिलेला होता. त्यांना A4 या आकाराचा कागद दिला गेलेला होता. एका बाजूला कंपासपेटी उघडून त्यातील पेन्सिल, पट्टी, रबर वापरत मुले चित्रे काढत होती आणि त्या कंपासपेटीच्या खाली वेगवेगळ्या आकाराच्या रंगपेट्या होत्या. रंगपट्यांमध्ये इतके प्रकार आलेत? आमच्या लहानपणी तर फक्त दोनच प्रकारच्या रंगपेट्या होत्या. कोरडे क्रेऑन खडू आणि ओले रंग असलेल्या काचेच्या बाटल्या, असा काहीसा विचार करत मी कुतूहलाने चित्रांपेक्षा जास्त या रंगीबेरंगी रंगपेट्या पाहण्यात रंगून गेले होते.
हळूहळू मुलांची चित्रे काढून झाली आणि मुले चित्र रंगवू लागली. लहानपणी चित्रकलेच्या स्पर्धेत मला एकमेव पारितोषिक मिळाले होते ते मी आजतागायत कसे जपून ठेवले आहे, हे माझ्या मैत्रिणीकडे कुजबुजले. प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलांनी त्या स्पर्धेत भाग घेतलेला होता. त्यातली काही निवडक चित्रे आणून माझ्यासमोर आणून ठेवण्यात आले.
“साधारण पंधरा कागद आहेत, मॅडम. यातून आपण तीन चित्रे निवडायची आहेत. कोणीतरी बोलून निघूनही गेले. मी विचार करत राहिले. आता ही कागदं कागदं राहिलेली नाहीत, तर ही कागदं जणू जिवंत झाली आहेत, निसर्गातल्या सजीवांसारखी! त्या कागदावर आता प्राणी चरत होते, पक्षी उडत होते, सूर्य उगवत होता, झाडे डुलत होती, फुले उमललेली होती, पाणी वाहत होते, आणखी काय काय… मला जणू एखाद्या सहलीला आल्यासारखे वाटत होते. मी रंगून गेले, दंगून गेले. बराच वेळ झाला तरी कोणते चित्र निवडावे हे कळेचना. सगळी चित्रे मी खाली वर करत होते. इतक्यात आयोजकांपैकी कोणीतरी आले आणि मला म्हणाले,
“मॅडम तुम्ही इतरही चित्रे पाहिलीत तरी चालतील!”
जणू या वाक्याची मी वाटच पाहत होते. ताबडतोब उठले. त्याच्या मागची दोन कारणे आहेत. एक कोणालाही असे वाटू नये की मी सर्व चित्रे न पाहताच कोणाचे तरी चित्र निवडले किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पंधरा चित्रांकडे पाहून मला इतर इतक्या मुलांनी नेमके काय काढले आहे, कोणत्या कल्पना रंगवल्या आहेत, हेही पाहण्याची उत्सुकता मनात निर्माण झाली होती. खूप दाटीवाटीने मुले बसली होती. त्याच्यातून वाट काढत मी फिरून आले. एका कोपऱ्यात जवळजवळ वज्रासन घालून पुढे साठ अंशात वाकलेली एक मुलगी काही तरी काढत होती. आम्ही बाजूला आल्याचे, बोलत असल्याचे तिचे लक्षच नव्हते. मी खाली बसले, वाकले तरी तिने ढुंकूनही माझ्याकडे पाहिले नाही. ती मन लावून चित्र काढत होती. मी तिला विचारले,
“मी बघू का हे चित्रं?
ती म्हणाली, “अजून पूर्ण झालेले नाही.”
मला हसू आले. किती निरागसता. आयोजकांपैकी कोणीतरी म्हटले, या बाई, तुमच्या चित्रांना बक्षीस देण्यासाठी आलेल्या आहेत.” कदाचित ही भाषा तिला थोडीफार समजली असावी. तेव्हा तिने थोडेसे नाराजीनेच ते चित्र माझ्या हातात दिले. खाली वाकून माझ्या पाठीला रग लागली होती. मी ताठ बसले आणि आता चित्र घेऊन निरखून पाहू लागले. माझ्या लक्षात आले की हे वेगळे चित्र आहे. तिने A4 आकाराच्या कागदाच्या मध्यभागी रेषा ओढून दोन भाग केले होते. वरच्या भागामध्ये एका भिंतीच्या दोन बाजूला दोन माणसे दोन झाडे लावताना दाखवलेली होती. झाडे छोटी होती आणि त्यांची पाने तिने पोपटी रंगाची रंगवली होती. त्यानंतरच्या दुसऱ्या भागातील चित्रात ही दोन माणसे एकमेकांना शेकहँड करताना दाखवलेली होती आणि त्यांच्यातील भिंत पडून, त्याच्या विटा काही खाली पडलेल्या दाखवल्या होत्या. ती झाडे इतकी मोठी झालेली होती की, त्यांची मुळे ही एकमेकांच्या मुळांमध्ये पक्की अडकलेली होती. झाडे इतकी उंच झालेली दाखवली होती. म्हणजे चित्रात तिने फक्त जाड खोडं दाखवलेली होती. गंमत म्हणजे त्या दोघांच्याही डोक्यावर पहिल्या चित्रामध्ये काळे केस, तर दुसऱ्या चित्रामध्ये पांढरे केस दाखवले होते. मला एकंदरीतच हे निसर्ग चित्र खूप आवडले. शेवटी काय तर निसर्गाने माणसाला जोडले होते. त्यांना विभागणारी भिंत झाडांनी मोडून टाकली होती.
त्यांना ‘निसर्ग’ हा विषय वेळेवर दिला गेलेला होता त्यामुळे त्याविषयी तिला काही आधी माहिती असायची तशी शक्यता कमी होती; परंतु कोणाकडून मिळालेली माहिती असो, एखाद्या कथेतून ऐकलेली माहिती असो त्या चित्रांमध्ये तिची कल्पना पूर्णतः एकवटलेली होती. चित्र अर्धवट रंगवलेले होते. फार आकर्षक नव्हते तरी त्या चित्राला पहिले बक्षीस द्यायचा मोह मला झाला. मी तिच्यासमोर काहीच बोलले नाही. तसा वेळ काही संपलेला नव्हता स्पर्धा संपायला वेळ उरलेला होता. मी आयोजकांना म्हटले,
“त्या मुलीच्या चित्राला मला पहिला क्रमांक द्यायचा आहे.” तोपर्यंत वेळ संपल्याची बेल वाजली ते चित्र माझ्यापर्यंत कोणीतरी आणून दिले. २५% चित्र अजूनही रंगवायचे बाकी होते. त्या चित्रावरचे रंग अजून ओले होते. कदाचित बाहेरच्या रखरखीत उन्हाने हे सर्व रंग इतरत्र पसरून १००% कागद रंगीत होईल, मला असे उगीचच वाटले.
आयुष्यामध्ये २५% आपल्यात काही कमतरता, उणिवा असतील तरी काही हरकत नाही. उर्वरित ७५ % भाग नक्कीच चांगला असला पाहिजे, सच्चा असला पाहिजे तो या वाईट असलेल्या २५% भागावर मात करून त्याला सुधरवायचा प्रयत्न करेल, हे निश्चितच! आपल्या आयुष्यात ‘रंग जेव्हा ओला असतो’, तेव्हाच हे आपल्या लक्षात आले पाहिजे, स्वतःच्या बाबतीत आणि इतरांच्याही बाबतीत!
pratibha.saraph@ gmail.com