कथा – प्रा. देवबा पाटील
एके दिवशी जयश्रीकडे पाहुणे आले. ते रात्रभर मुक्कामी राहिले व दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेले; परंतु ते रात्री झोपेत घोरत होते.
“आई, झोपेत काही माणसे कशी काय घोरतात गं?” जयश्रीने दुसऱ्या दिवशी आईला विचारले.
“घोरणे ही अनैच्छिक क्रिया आहे. मनुष्य हा नेहमी नाकाने श्वासोच्छवास करीत असतो. त्यावेळी टाळूची त्वचा ही जीभेच्या वरच्या भागाला टेकलेली असते. त्यामुळे ती फडफडत नाही. काहीजण झोपल्यानंतर त्यांच्या नाकातील पोकळीचे स्नायू शिथिल होतात, त्यामुळे ती पोकळी खूप अरुंद होते, कधी-कधी बंदही होते. अशा वेळी नाकावाटे पूर्णपणे हवा आत घेतली जात नाही व त्या व्यक्तीचे तोंड आपोआप उघडते व तोंडाने श्वासोच्छवास सुरू होतो. तोंड उघडे पडल्यामुळे व श्वासनलिकेच्या मर्यादेपेक्षा जास्त हवा तोंडाने आत घेतल्यामुळे टाळूची कातडी सैल पडते. हवेच्या आतबाहेर जाण्यायेण्यामुळे ती फडफडते व कंप पावते. त्यासोबत पडजीभसुद्धा थरथरते. टाळूच्या फडफडण्याने व पडजीभेच्या थरथरण्याने जो आवाज निर्माण होतो त्यालाच घोरणे असे म्हणतात. यावर उत्तम उपाय म्हणजे उपडे पोट जमीनीला टेकून झोपणे हा आहे.” आईने सांगितले.
“पण मग जागे असताना का नाही घोरत माणसं?” जयश्रीने शंका उकरली.
“जागेपणी टाळू घट्ट असते, तिच्यात सैलपणा नसतो. त्यामुळे ती फडफडत नाही. म्हणून जागेपणी माणूस घोरत नसतो.” आईने उत्तर दिले.
“बाबा, काही जणांचे दात झोपेत करकर का वाजतात हो” जयश्रीने प्रश्न केला.
“झोपेत दात चावण्याची बऱ्याच जणांना सवय असते. त्यालाच दात खाणे असेही म्हणतात. कधीकधी झोपेत काही विशिष्ट कारणाने खालच्या जबड्याचे काही स्नायू सतत अगदी थोडे थोडे आकुंचन व प्रसरण पावत असतात व त्यामुळे तो जबडाही सतत हालत राहतो. त्यामुळे त्या जबड्याची एका विशिष्ट तऱ्हेने हालचाल होत असते. त्यामुळे खालच्या जबड्यातील दात वरच्या दातांवर एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सतत घासले जातात. त्यामुळे दात खाल्ल्याचा आवाज होतो. या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणावर त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष ताबा नसतो. ती हालचाल जवळजवळ आपोआपच होत असते. ती नियंत्रित करण्याचे केंद्र मेंदूत असते. दात खाण्याचे कारणे म्हणजे त्या व्यक्तीला काही कारणास्तव शांत झोप न लागणे, कधीकधी शारीरिक व मानसिक स्थिती ठीक नसणे अशी आहेत. त्यामुळेच त्या व्यक्तीचे दात बऱ्याचदा झोपेत करकर वाजतात.” बाबांनी सांगितले.
“बाबा, तुम्हाला कसे हो हे एवढे माहीत? तुम्ही तर रोज शेतात कामाला जाता.” जयश्रीने विचारले. “अगं ताई, मीसुद्धा फावल्यावेळी तुझ्या आईने आणलेली पुस्तके वाचत असतो. म्हणून मलाही काही गोष्टी माहीत झाल्यात. तुझ्या आईजवळ प्रा. देवबा पाटील या लेखकांचे “अनैच्छिक प्रतिक्षिप्त क्रिया” हे अतिशय सुरेख व सहजगम्य असे पुस्तक आहे. त्या पुस्तकात ही सारी माहिती छानपणे समजावून सांगितली आहे. आईने व मी ते पुस्तक बऱ्याचदा वाचले व त्यावर आम्ही दोघांनी मिळून खूपदा चर्चाही केली आहे.” तिचे बाबा म्हणाले.
“ असे आहे का. मलासुद्धा ते पुस्तक वाचायला द्याल बरं.” जयश्री म्हणाली.
“ हो बाळा, आईने ते पुस्तक कपाटात व्यवस्थित ठेवलेले आहे. उद्या ती काढून तुला ते पुस्तक जरूर देईल. तू लक्षपूर्वक ते पुस्तक वाचून घे. तुला खूप कामी पडेल ते ज्ञानवर्धक पुस्तक.” बाबा म्हणाले.